शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे नवे स्रोत

Farmer-Company
Farmer-Company

पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात गावांतील ५०० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. निविष्ठा विक्री, तांदूळ विक्री या पारंपरिक बाबींसह शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाकडे वळवत उत्पन्नाचे नवे स्रोत तयार केले आहेत.

पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक. भाताचा हंगाम संपल्यानंतर शेतीऐवजी अन्य कामांमध्ये रोजगार शोधला जातो. अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन व निविष्ठांचा पुरवठा करत माळशेज ॲग्रिकल्चर प्रोड्यूसर कंपनीने हळूहळू भाजीपाला पिकांकडे वळवले आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीने पुरवलेल्या सल्ला व सेवांमुळे सात गावांत सुमारे ५०० एकरवर भाजीपाला लागवड होत आहे. खरिपातील पारंपरिक भात पिकाला रब्बीमध्ये भाजीपाला पिकांची जोड मिळाल्याने वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. माळशेज शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली असून, ५०० सदस्य आहेत. गेल्या पाच वर्षात सुमारे दीड कोटींची उलाढाल केली आहे. भविष्यामध्ये सदस्यांची संख्या ५०० ने वाढवण्यासोबत प्रक्रिया उद्योग आणि गोदाम उभारणीद्वारे  शेतमाल तारण, ‘ई-नाम’ योजना राबविण्याचा कंपनीचा मानस आहे. 

कंपनीच्या वाटचालीची माहिती देताना अध्यक्ष विनायक चकवे म्हणाले,‘‘ मढ पारगाव आणि परिसरातील गावे डोंगराळ भागात पसरलेली असून, आदिवासी शेतकरी प्रामुख्याने भात पिकावर अवलंबून होता. भात काढणीनंतर अनेक शेतकरी कुटुंबीयांसह रोजंदारीच्या कामाला ओतूर, आळेफाटा येथे जात असत. लुपीन ह्युमन वेलफेअर ॲण्ड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने गावसमृद्धी योजनेअंतर्गत तळेरान गावात फळबाग लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यानिमित्ताने फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गावांत बैठका घेत फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांना नवीन पिकांची लागवड, पद्धतींसाठी फाउंडेशनने मार्गदर्शन सुरू केले. याच दरम्यान शेतकऱ्यांना संघटित करून सामूहिक प्रयत्नातून विविध समस्या सोडवण्याची संकल्पना मांडण्यात आली. यानंतर परिसरातील खैरे, खटकाळे, निमगीरी, तळेरान, बगाडवाडी, सितेवाडी आणि पारगाव या सात गावांतील शेतकऱ्यांची कंपनी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

या गावांत बैठका घेत सलग तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर ५०० शेतकरी सभासद गोळा केले. त्यातून माळशेज ॲग्रिकल्चर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. प्रति शेतकरी सभासदांकडून एक हजार रुपये भागभांडवल या प्रमाणे ५ लाख रुपयांचे भांडवल जमा झाले. कंपनी नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर १४ ऑक्टोबर २०१५ रोजी कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना रास्त दरात आणि गावातच कृषी निविष्ठांची उपलब्धता होण्यासाठी खते आणि बियाणाचे दुकान २६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केले. 

पूर्वी परिसरातील शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदीसाठी ओतूर किंवा आळेफाटा येथे जावे लागे. यात वेळेवर खते बियाणे न मिळणे, जास्त दर द्यावा लागणे, प्रवास वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय होत असे. म्हणून कंपनीमार्फत उभारलेल्या कृषी सेवा केंद्राचा थेट फायदा कंपनीच्या ५०० सभासदांसह परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. सदस्यांना बाजारभावापेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने खते व बियाणे उपलब्ध होत आहे.  

अन्य शेतकरी कंपन्यांच्या कामातून प्रेरणा
शेतकरी उत्पादक कंपन्या कशा प्रकारे कामे करतात, कंपनीची आणि सदस्यांची प्रगती कशी होऊ शकते, हे सर्वांना दाखवण्यासाठी गेल्या दोन वर्षात सह्याद्री फार्मस (नाशिक) आणि अंबोजोगाई येथील सोयाबीन प्रक्रिया उद्योग येथे भेटी दिल्या.

याबाबत बोलताना संचालिका शोभा मोजाड म्हणाल्या, ‘‘संघटितपणे कामे केल्यास सर्वांची प्रगती होऊ शकते. आपल्या कंपनीप्रमाणेच छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या शेतकरी कंपन्यांनी कशी गरुडझेप घेतली, हे दाखवण्यासाठी आम्ही सह्याद्री फार्मसला भेट दिली. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीप्रमाणे सुरू असलेल्या कामाने आम्ही शेतकरी प्रभावित झालो. असेच काम आपल्याकडे करण्याविषयीचे विचार तेव्हापासून आमच्या मनामध्ये घोळू लागले. कसे करता येईल, असा विचार किमान आमच्या डोक्यात घोळू लागला आहे. सध्या कंपनीकडे स्वतःची जागा नाही. आम्ही जागा खरेदीचा विचार सुरू केला आहे.’’ 

भात विक्री आणि हिरडा खरेदी सुरू 
कंपनीमार्फत आम्ही तांदूळ आणि हिरडा खरेदी सुरू केली आहे. गेल्या वर्षी मोठा हिरडा ७ टन आणि बाळ हिरडा २ क्विंटल थेट बांधावर खरेदी केला. त्यासाठी शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा ३ ते ५ रुपये दर अधिक दिला. बांधावरील खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात किलोमागे किमान १ ते २ रुपये बचत झाली. यावर्षी हिरडा खरेदी वाढवण्याचा विचार आहे. २ टन इंद्रायणी तांदळाची थेट विक्री केली. यामधून शेतकऱ्यांना किमान पाच रुपये दर अधिक मिळाला. 

थेट भाजीपाला विक्रीचे प्रयत्न
शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले असले तरी त्यातील चढउतार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट मंत्रालयात विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक खर्च आणि अन्य किरकोळ खर्च यामुळे सध्या त्यातून फारसा फायदा झाला नाही. अर्थात, कंपनीने हार मानलेली नाही. थेट भाजीपाला विक्रीसाठी पणन मंडळाद्वारे वाहन मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजीपाला विक्रीसाठी कल्याण, मुंबई येथील काही गृहनिर्माण संस्थांशी करार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातून थेट विक्रीची स्वतःची यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे. 

भविष्यातील वाढीसाठी संकल्पना
सध्या कंपनीच्या मालकीची स्वतःची जागा नाही. पहिल्या टप्प्यात जागा खरेदीसह गोदाम आणि शीतगृह उभारणीचे नियोजन आहे. गोदाम बांधणीनंतर आम्ही तांदळू, हिरडा आणि सोयबीनची खरेदी वाढवता येईल. गोदामात शेतमाल ठेवून शेतमाल तारण योजनेसह ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारात सहभागी होण्याचे आमचे प्रयत्न राहतील. या ‘ई-नाम’चे प्रशिक्षणही आम्ही घेतले आहे. कंपनीचे गांडूळ खत प्रकल्प उभारणार आहोत.  
- विनायक चकवे, ७३७३५८६७७७
अध्यक्ष, माळशेज ॲग्रिकल्चर प्रोड्यूसर कंपनी. 

मी शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असून कंपनीच्या स्थापनेनंतर गावांमध्येच विविध खते, बियाणे, कीटकनाशके यांची स्वस्तामध्ये उपलब्धता होत आहे. वेळ आणि उत्पादन खर्चामध्ये बचत झाली आहे. कंपनीच्या विविध प्रशिक्षणांमुळे भाजीपाला पिकांकडे वळलो आहे. परिणामी उत्पन्नामध्ये वाढ झाली.    
- दत्ता घोडे, ८५५४८१०५६७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com