शेतकऱ्याने केली दुष्काळी परिस्थितीवर मात

onion crop
onion crop

बावी (ता. आष्टी, जि. बीड) येथील वैभव आबासाहेब गोल्हार या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करत कांदा लागवड पद्धतीत बदल करून विविध प्रयोगांतून उत्पादनात वाढ केली आहे. हवामान बदलानुसार खत, पाणी व्यवस्थापनात बदल केल्यामुळे त्यांचा कांदा उत्पादनात हातखंडा तयार झाला आहे. वैभव यांनी तूर, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रयोगातून वाढ करत शेतीतील उत्पादनातून कुटुंबाची आर्थिक बाजू बळकट केली आहे. 

नगर जिल्ह्यालगत असलेल्या आष्टी (जि. बीड) तालुक्यात कायम पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे या भागातील शेतकरी सातत्याने दुष्काळाला तोंड देत असतात. अशा परिस्थितीतही तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बावी (ता. आष्टी) येथील वैभव आबासाहेब गोल्हार हे बीए. बीएड शिक्षण झालेले तरुण शेतकरी. वडील पंधरा वर्षांपासून शेतीसोबत गावात दूधसंकलनाचा व्यवसाय करतात. वैभवचे भाऊ वैष्णव फिलिपाइन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत असून, दुसरे भाऊ नामदेव आळंदीत आध्यात्मिक शिक्षण घेतात, तर बहीण नगरमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. गोल्हार कुटुंबाची वडिलोपार्जित पंधरा एकर शेती आहे. वैभव यांच्यावर शिक्षणानंतर घरची जबाबदारी पडल्याने त्यांनी नोकरी न शोधता शेती करण्याचा निर्णय घेतला. 

पीकपद्धती 
हलक्या प्रतीची जमीन, डोंगराळ आणि दुष्काळी भाग असल्याने या ठिकाणी कायम पाण्याचे दुर्भिक्ष असते. यामुळे वैभव पूर्वी ज्वारी, बाजरी, हुलगे, उडीद यासारखी पिके घेत. मात्र फारसे उत्पादन मिळत नसल्याने पाच वर्षापूर्वी वैभव कांदा लागवडीकडे वळले. त्या वेळी कांद्याला दर मिळत नसल्याने कुटुंबाने कांदा पीक घेण्याला विरोध केला. मात्र विरोध डावलून एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. यंदा पाच एकरावर कांद्याची लागवड केली आहे. कांद्यासह सोयाबीन, कापूस, तूर ही हंगामी पिके घेतली जातात. तीन वर्षापूर्वी कापसाचे एकरी वीस क्विंटल, गेल्या वर्षी तुरीचे एकरी १८ क्विंटल उत्पादन घेतले. सोयाबीचे या वर्षी एकरी चौदा क्विंटल उत्पादन घेतले.  

लागवडीत बदल  
वैभव यांनी गेल्या पाच वर्षापासून कांदा उत्पादनात सातत्य ठेवले आहे. कांदा लागवडीत विना खुपरणीचा प्रयोग राबवला. सर्वसाधारणपणे सरी अथवा वाफे पाडून कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र वाफे, सरी न पाडता वैभव यांनी थेट जमिनीला पाळी घालून आॅगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड केली. लागवडीनंतर चार दिवसांनी तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे खुरपणी करण्याची गरज भासत नाही आणि साठ दिवस गवत येत नाही. बेड, सरी न पाडता थेट लागवड केल्याने शेतातून पाण्याचा निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते तसेच कांदा पोसण्याला मदत होते. कांदा पिकात सुरवातीपासूनच ठिबकचा वापर केला. त्यानंतर लागवडीत सातत्य ठेवत क्षेत्रातही वाढ केली. 

अर्थकारण
कांद्याचे पहिल्या वर्षी एकरी सहा टन उत्पादन मिळाले आणि प्रति किलोला साधारण वीस रुपयांचा दर मिळाला. दुसऱ्या वर्षी एकरी सात टन उत्पादन मिळाले आणि प्रति किलोला पस्तीस रुपये दर मिळाला. तिसऱ्या वर्षी एकरी ९ टन उत्पादन मिळाले आणि पंधरा ते वीस रुपये दर मिळाला. यंदा एकरी तब्बल तेरा टनाचे उत्पादन मिळाले आणि किलोला ५० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

रोपनिर्मिती, बीजोत्पादन
वैभव चार वर्षापासून दरवर्षी १० गुंठे क्षेत्रावर कांदा बिजोत्पादन घेतात. त्यातून मिळणारे ३० किलो बियाण्यांपैकी पंधरा किलो बियाण्यांपासून रोपनिर्मिती करतात तर १५ किलो बियाणे एक हजार रुपये किलो दराने विकले जाते. कांद्याचे बियाणे कमी प्रमाणात टाकल्यावर रोपांची उगवण चांगली होत असल्याचा अनुभव आला. पहिल्या वर्षी दाट बियाणे टाकल्याने साधारण पंधरा टक्के बियाणे वाया गेले. त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून बियाणे टाकण्यातही बदल केला. 

दुष्काळाचा फटका 
वैभव यांनी गेल्या वर्षी ५ एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. मात्र पाणी नसल्याने तीन एकरावरील कांद्याचे पीक जळून गेल्याने आर्थिक नुकसान झाले. याशिवाय उडीद, मूग यासह इतर पिकेही जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. 

शेतकऱ्यांनी वापरले तंत्र
विना खुरपणी केलेली कांदा लागवड पहायला परिसरातील शेतकरी वैभव यांच्या शेतीला भेटी देऊन माहिती घेतात. वैभव यांच्या मार्गदर्शनातून दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विना खुरपणी तंत्रानुसार कांद्याची लागवड केली आहे. वैभव कांदा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांनी राज्य, देशातील कांदा उत्पादनाचा अंदाज बांधून कांद्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरला. 

काटेकोर व्यवस्थापनाला प्राधान्य 
या भागातील अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक रोग आणि बदलत्या हवामानामुळे वाया गेले. मात्र, वैभव यांनी लागवड पद्धतीत बदल करून खत आणि पाण्याच्या योग्य नियोजनातून यशस्वीपणे कांदा पीक घेतले आहे. कांदा पिकात रोगाचा प्रादुर्भाव नसला, तरी काही शेतकरी रोग पडू नये म्हणून फवारणी करतात. मात्र, रोग नसेल तर फवारणी करू नये, असा सल्ला वैभव देतात. पिकाच्या गरजेनुसार ८ ते १२ दिवसांनी ठिबकने पाणी देतात. गरज नसतानाही पाणी दिले, तर पात वाढते आणि कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

स्वातीताईंचा आधार 
वैभव यांचे ७ सदस्यांचे कुटुंब. वडील आबासाहेब, आई मंगल, पत्नी शेतात राबतात. पत्नी स्वाती यांची वैभव यांना खंबीर साथ असते. वैभव शेतीकामासाठी ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा वापर करतात. गरजेच्या वेळी स्वाती ट्रॅक्टर चालवण्यासह शेतीची सर्व कामे लीलया पार पाडतात. शेतीतील बहुतांश कामे स्वातीच पाहतात. 

 वैभव गोल्हार, ९४२०४१२९००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com