esakal | युवा कौशल्य विकासातून होईल शेतकरी कंपन्यांची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

युवा कौशल्य विकासातून होईल शेतकरी कंपन्यांची निर्मिती

युवा कौशल्य विकासातून होईल शेतकरी कंपन्यांची निर्मिती

sakal_logo
By
टीम ॲग्रोवन

‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केले. 

‘कृिषकल्चर’ कार्यक्रमाच्या दुपारच्या चर्चासत्रात गोयल बोलत होते. ते म्हणाले, की  ‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरणारा असेल. त्याद्वारे प्रशिक्षित झालेल्या युवकांनी तीन गावे मिळून एक कंपनी स्थापन केल्यास पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतील. त्यातून पुन्हा ७०० मूल्यवर्धित साखळी कंपन्या तयार होतील. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असेल. राज्यात तयार होऊ शकणाऱ्या या सुमारे १५ हजार कंपन्यांना पायाभूत सुविधा द्याव्या लागतील.  देशातील रिटेलर्स, रिलायन्स, आयटीसी यांसारख्या कंपन्यांनी भविष्यात या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडूनच शेतमालाची खरेदी करावी, यासाठी प्रयत्न करावे लागतील. अर्थात, मूल्यवर्धन साखळीतील सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम अॅग्रोवनने करावे, असे आवाहनही श्री. गोयल यांनी या वेळी केले.  

"व्हॅल्युचेनसाठी कर्ज देणारी प्रणाली आता आपण तयार केली पाहिजे. कृषी गुंतवणूक मंडळदेखील स्थापन करावे लागेल. त्याद्वारे गुंतवणूक वाढू शकते. मृदा आर्द्रता सुरक्षादेखील पाहावी लागेल. उपग्रह छायाचित्रांचा (सॅटेलाइट इमेजेस) आधार घेऊन वैयक्तिक विमादेखील काढता येईल. शेतीसाठी अनेक संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करावी लागेल. 

" राज्यातील शेतक-यांना आपले स्वप्न साकार करण्यासाठी समूहातूनच पुढे जावे लागेल. शेती समस्या भरपूर आहेत. पण, आपल्याला विलास शिंदे यांच्यासारखे व्हायचे आहे. त्यातून राज्यात दोन हजारांपर्यंत असलेल्या कंपन्यांची संख्या १४ हजारांपर्यंत करणे शक्य नाही का, असा सवालही श्री. गोयल यांनी या वेळी उपस्थित केला.
********************************************

शेतकऱ्यांनी मार्केटिंग करायला शिकावे - लोखंडे
शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग करायला शिकले पाहिजे. ग्राहकांची मानसिकता न एेकणाऱ्यांची आहे, त्यांना जागे करण्यासाठी आपल्या दर्जेदार उत्पादनाचे मार्केटिंग करावे लागेल, त्यासाठी उत्पादनाचा ब्रॅन्ड तयार करावा, तरच शेतकऱ्यांना किफायतशीर दरही मिळविणे शक्य होईल, असे मत रुरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. 

कृषी कल्चर कार्यक्रमात ‘ग्रामीण विकासामध्ये मार्केटिंगचे महत्त्व’ या विषयावर लाखंडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,  शेतमालाच्या प्रभावी मार्केटिंगसाठी डेटाबेस तयार करावा लागेल. फेसबुक, यूट्यूब, व्हाॅट्‌सअपचे ग्रुप हा तुमचा डेटाबेसच आहे. त्यावर इतर गोष्टी शेअर करण्यापेक्षा स्वत:चे मार्केटिंग करा. एकच गोष्टीत अडकून न पडता सोशल मीडियाच्या विविध माध्यमांचा, तंत्रज्ञानाचा वापर करावा. जोपर्यंत उत्पादनाकडे ‘ब्रॅंन्ड व्हॅल्यू’ पाहून मार्केटिंग करणार नाही, तापर्यंत अधिकचा दर मिळणार नाही.  मार्केटिंग केले तरच आपला शेतमाल विकून चांगले पैसे मिळता येतील, हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

********************************************
शेतकऱ्यांनी चक्रव्यूह भेदून मार्ग काढावा 
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे. पण आपल्याला एकत्र येऊन जिद्दीने या चक्रव्युहातून बाहेर पडायचे आहे. आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीने तेच केले. असे उद्गगार देशातील आघाडीच्या नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी काढले. 

एपी ग्लोबाले समूहातर्फे पुण्यात आयोजित केलेल्या ‘कृषी कल्चर’ या ज्ञानसोहळ्यात ''शेतकरी उत्पादक कंपनी एक चळवळ, सद्यस्थिती आणि पुढील आव्हाने'' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ''सह्याद्री''ने प्राप्त केलेल्या वाटचाली यशोगाथा श्री. शिंदे सांगत असताना उपस्थित शेतकरी अवाक झाले होते. राज्यात १२ कोटी लोक असून त्यातील सहा कोटी लोक शेतीत आहेत. शेतीत प्रचंड समस्या आहेत. पण आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यावर उपाय केले. आपल्याला त्याशिवाय तरणोपाय नाही असे शिंदे म्हणाले.  

राज्यात सहकाराच्या माध्यमातून लाखो संस्था उभ्या केल्या गेल्या. विविध कार्यकारी सोसायट्या, सुतगिरण्या, साखर कारखाने, सहकारी बॅंका सहकारातून तयार झाल्या. मग आमची सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी वेगळे काय सहकारात सांगणार असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात त्यासाठी सह्याद्रीने कंपनी अनेक वर्षे संघर्ष केला. मी स्वतः कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर १९९५ पासून शेतीत काम करू लागलो. मी प्रथम हेच शिकलो की शेतकऱ्याची स्थिती अभिमन्यूसारखी आहे. त्याला बाहेर पडण्याचा उपाय सापडत नाही. पहिली दहा वर्षे शेतीमधून अपयश पाहिले. पन्नास हजार रुपये कर्ज काढून मी कृषी व्यवसायाला सुरवात केली. पहिले पीक तोट्यात गेलेच. पण सलग बारा वर्षांत ७५ लाखांचे कर्ज डोक्यावर करून घेतले. त्याच सापळ्यात अडकलो. पण जिद्द होती की त्यातून बाहेर पडायचे. त्यातून ताकदवान यंत्रणा उभी करायची. त्यातूनच २०११ मध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली असे शिंदे यांनी स्पष्ट केले.  

 "आज साडेसहाशे शेतकरी कंपनीचे भागधारक असून अजून साडेसहा हजार शेतकरी सह्याद्री परिवाराचे घटक होणार आहेत. आमच्या कंपनीने ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी निर्यात व देशांतर्गत बाजारव्यवस्था तयार केली. याच समूहशक्तीतून देशातील १७ टक्के द्राक्ष निर्यात सह्याद्रीकडून केली जाते आहे. आमचे भागभांडवल ९० कोटी रुपयांचे तर मालमत्ता १४० कोटींची तयार झाली आहे. त्यासाठी सरकारची कोणतेही मदत घेतलेली नव्हती. ‘सीड टू प्लेट’ अशी सर्व यंत्रणा आम्ही उभी केली. त्यातून २५ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचलो असेही ते म्हणाले. 

********************************************

बाजारसमित्यांमधील व्यवहार संशयास्पद 
देशाच्या शेतमाल बाजार समित्यांमधील सध्याचे व्यवहार संशयास्पद आहेत. त्यातून शेतक-यांना मोठे तोटे हातात. त्यासाठीच ‘व्हर्च्युअल एपीएमसी’चा ‘ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ विकसित करण्याचा प्रयत्न आमची कंपनी करणार आहे अशी माहिती विलास शिंदे यांनी या वेळी दिली. सह्याद्री कंपनीने गेल्या सात वर्षांचा प्रवास करून १२५ उत्पादने बाजारात आणली आहेत. शेतकऱ्यांना आता व्यावसायिकतेने एकत्र यावे लागेल. सहकारातून आपण शेतकरी वर्गाला एकत्र केले गेले. पण तो गाडा राजकीय दिशेने भ्रष्टाचाराकडे गेला. आता व्यापार रणनिती ठेवून आपल्याला भांडवलाची शर्यत करावी लागेल. नेतृत्वदेखील चांगले उभे करावे लागेल. त्यासाठी नेतृत्वाचा हेतू चांगला हवा. दृष्टी हवी. बाजारातील सर्व टप्पे समजायला हवेत. त्यात तंत्रज्ञान,व्यवस्थापन, आर्थिक क्षमता हवी, असेही ते म्हणाले. 

विलास शिंदे म्हणाले...
शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपये जगण्यासाठी मिळवून देणे हे आमचे ध्येय  शेतमालाला, प्रक्रिया, निर्यातीची जोड देणे, संशोधनाची जोड, बाजारपेठांचा अभ्यास, ग्राहक व्यवस्थेसाठी स्टोअर्स उभी करणे अशी आम्ही निती ठेवली आहे. 

सह्याद्रीने २०० स्टोअर्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कौशल्यवर आधारित प्रशिक्षण आम्ही पूर्वीपासून घेत राहिलो. आता कार्पोरेट कंपन्यादेखील आमच्यासोबत येत आहेत. युरोपातील ग्राहकाला हवा असणारा माल राज्यात तयार करण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी तंत्रज्ञान, प्रमाणीकरण, ट्रेसेबिलीटी अशा सर्व क्षेत्रात आमच्या कंपनीने काम केले आहे. 

loading image