गडचिरोलीत ॲपल बोरांची चव!

गडचिरोलीत ॲपल बोरांची चव!

गडचिरोली - जिल्ह्यात अनेक सुविधांचा अभाव असला; तरी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर अशक्‍य ते शक्‍य करून दाखविणाऱ्यांची मुळीच कमतरता नाही. अशातीलच एक असलेले प्रयोगशील व्यक्‍तिमत्त्व राजेश इटनकर यांनी आपल्या शेतात परदेशात किंवा महानगरात मिळणारी अनोखी ॲपल बोरे उगवण्याची किमया साध्य केली आहे.

सफरचंदाच्या आकाराचे आणि काहीशा सफरचंदासारख्याच आंबट, गोड चवीचे ॲपल बोर काही वर्षांत देशात विविध बाजारपेठेत भाव खात आहेत. महानगरात मुबलक प्रमाणात मिळत असले; तरी हे फळ गडचिरोलीच्या बाजारात क्‍वचितच दिसते. शिवाय हे अनोखे बोर गडचिरोलीच्या मातीत रुजू शकेल, याचा कुणीही विचार केला नाही. पण, शेतीत अनेक प्रयोग करणारे इटनकर यांनी हे शिवधनुष्य पेलले. कृषी विभागाकडून वाटप करण्यात आलेली या बोरांची रोपे त्यांनी जपली. आता या रोपांचे वृक्षात रूपांतर झाले असून सध्या या वृक्षांच्या फाद्यांवर चविष्ट ॲपल बोरे लगडली आहेत. विशेष म्हणजे या वृक्षाला सामान्य बोरांप्रमाणे मोठे, असंख्य आणि तीक्ष्ण काटे नाहीत. या वृक्षाला काही प्रमाणातच काटे असतात. त्यामुळे थेट हात घालून बोरे तोडता येतात. यातील काही वृक्षांच्या फांद्या फळांच्या वजनाने वाकल्या असून आपल्यालाही वाकूनच फळे तोडावी लागतात. सध्या इटनकर यांच्या आरमोरी मार्गावरील गोगावजवळच्या आय-फार्म या शेतात ही नवलाई बोरे बघण्यासाठी आणि खाण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे.

विशेष म्हणजे राजेश इटनकर यांच्या शेतात विविध प्रकारच्या आंब्याच्या प्रजाती, चिकू आणि कलिंगडाच्या आकाराचे महालिंबू आहेत. या महालिंबूची बातमी सर्वप्रथम ‘सकाळ’नेच प्रकाशित केली होती. त्यामुळे त्यांचे राज्यभरात कौतुक झाले. ॲपल बोराचे शास्त्रीय नाव झिंझिफस मॉर्टियाना आहे. ही बोरे अतिशय चविष्ट असून ही उष्ण कटिबंधीय वातावरणात, दुष्काळी प्रदेशातही तग धरून राहतात. यांच्या फाद्यांचा उपयोग शेताच्या कुंपणासाठी होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रजातीची लागवड करावी. शिवाय जिल्ह्यात ही बोरे फार कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बाजारपेठेत चांगला भाव मिळू शकतो. 

फळ दाखवा, फळ मिळवा
कृषी पर्यटनाच्या संकल्पनेवर काम करत असलेले आणि छंद म्हणून विविध प्रजातींची लागवड करणारे इटनकर यांनी अद्यापही आपल्या शेतातील फळे विक्रीसाठी बाजारात नेली नाही. फळांना हात न लावता फक्‍त तुम्हाला आवडतील ती फळे दाखवायची. तुम्हाला हवी असलेली फळे येथे तोडून मिळतील. हा आपला छंद असल्याने फळांच्या किमती माफक असल्याचे इटनकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com