माती विना शेती

राजेंद्र घोरपडे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

शेती आणि माती हे एक समीकरणच आहे. माती शिवाय शेती होऊ शकते हा विचारही न पटणारा आहे. पण शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी हे करून दाखवले. हे करत असताना त्यांनाही हे शक्‍यच नाही असे अनेकांनी म्हटले. उगाच वेळ आणि पैसा वाया घालवत आहात, असेही म्हटले गेले. पण करण्याची हिम्मत, जिद्द असेल तर यश निश्‍चित मिळते. असेच यश गणपतराव पाटील यांनी मिळवले. त्यांच्या या प्रयोगाविषयी...

गणपतराव पाटील यांची कोंडिग्रे येथे शेती आहे. माळरान, निव्वळ खडकाळ जमीन या जमिनीत शेती करणे महाकठीण होते. पूर्ण अभ्यासानंतर त्यांनी तेथे ग्रीन हाऊन उभारले. द्राक्ष बाग फुलवली. नदी काठची माती आणून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. पण मातीसाठीही मर्यादा होती. यातूनच त्यांनी माती विना शेती करण्याचा निर्णय घेतला.

१९९८ साली त्यांनी माती विना शेतीचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगासाठी त्यांना सुमारे एक लाख कुंड्याची आवश्‍यकता होती. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात कुंड्या मिळणार कोठे? हा मोठा प्रश्‍न होता. त्यांनी स्थानिक कुंभारांना विचारले, पण त्यांनी इतक्‍या कुंड्या तयार करणे अशक्‍य असल्याचे सांगितले.

कुंड्यांसाठी माहिती गोळा करत असताना बेळगाव जिल्ह्यातील खानापूरात कुंड्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात, अशी माहिती त्यांना मिळाली. खानापूरला जाऊन त्यांनी चौकशी केली. पण, तेथील कुंभार त्यांना विश्‍वासात घेत नव्हते. शेवटी गणपतराव यांनी त्याच्या या प्रयोगाविषयी कुंभारांना सांगितले. तेव्हा तर त्यांनी हा प्रयोग यशस्वी होणे अशक्‍य आहे, असेच सांगितले. तरीही गणपतराव यांनी जिद्द सोडली नाही. काहीही करून एक दोन कुंभारांना विश्‍वासात घेऊन कुंड्या मिळवायच्याच असे त्यांनी ठरवले. अखेर एक वयस्कर कुंभार महिलेने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला व कुंड्या देण्याचे कबूल केले. सहा रुपयांना एक कुंडी या प्रमाणे त्यांनी तीन महिन्यात एक लाख कुंड्या देण्याचे मान्य केले. या महिलेने त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने प्रत्येक आठवड्याला चार-पाच हजार कुंड्या देत तीन महिन्यात एक लाख कुंड्या दिल्या. 

माती विना शेती या प्रयोगात माती ऐवजी कोकोपीटचा वापर केला जातो. कुंड्यामध्ये कोकोपीट भरून त्यामध्ये रोपांची लागवड केली जाते. गणपतराव यांनी प्रथम गुलाबाची लागवड यामध्ये केली. ती यशस्वीही झाली. पण या कुंड्यातील रोपांना खते, पाणी देण्यात अडचण होती. ठिबक सिंचन केले होते तरीही योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नसल्याने रोपांवर याचा परिणाम जाणवत होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी गणपतराव यांनी हॉलंडच्या शास्त्रज्ञाची मदत घेतली. या संशोधकाने खत व पाणी नियत्रणात पुरवठा करणारे ईसीपीएच या मशिनची माहिती दिली. हे  मशिन साडेचार लाख रुपयांना होते.

बागेची आवश्‍यकता लक्षात घेऊन गणपतराव यांनी कर्ज काढून ईसीपीएच मशीन खरेदी केले. या मशीनद्वारे पूर्ण नियंत्रणात खते व पाणी कुंडीतील रोपास देता येणे शक्‍य झाले. त्यामुळे उत्पादनावर याचा मोठा परिणाम जाणवला. माती विना शेतीमध्ये गुलाबाच्या उत्पादनात मिळालेले यश पाहून गणपतराव यांनी जरबेरा व सिमला मिरचीच्या लागवडीचाही प्रयोग सुरू केला व त्यात मोठे यशही मिळवले. 

सेंद्रिय खत वापरास प्रोत्साहन
दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माती परीक्षण केंद्र आहे. कारखान्याकडूनही माती परीक्षण करण्यात येते. त्यानुसार रासायनिक खतांचा वापर होत होता, पण उत्पादनात फारसा फरक जाणवत नव्हता. उलटे उत्पादनात घटच होताना आढळत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गणपतराव यांनी कृषी अधिकारी, ऊस विकास अधिकारी, तज्ज्ञ यांची बैठक बोलावली. या वेळी माती परीक्षणाचे अहवाल निरखून पाहताना, असे लक्षात आले की मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे.

काही ठिकाणी ०.३० टक्के इतके कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्याचे आढळले. प्रत्यक्षात पाच टक्के इतके सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मातीमध्ये असायला हवे असते, पण तितके नसल्याने याचा परिणाम निश्‍चितच उत्पादकतेवर होत होता. कमीत कमी एक ते दोन टक्के तरी सेंद्रिय कर्ब जमिनीत असायला हवे. यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने गणपतराव यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. पाचट कुजवणे, हिरवळीची खते, ताग ढेंच्या याचा वापर करण्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर आता या भागातील शेतीमध्ये एक टक्‍क्‍यांच्यावर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गेले आहे. या प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. शेणखताचा वापरही वाढवला आहे. देशी गायीच्या गोमूत्राचा वापर करण्यासही काही शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. यामुळे काही ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा असा की पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आहे. कमी पाणी झाले, जास्त पाणी झाले तरीही पिकाच्या वाढीवर याचा फारसा परिणाम होत नाही. असे निदर्शनात येत आहे.

या चळवळीला प्रोत्साहन मिळण्यासाठी गणपतराव यांनी सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस प्रथम गाळप करण्याचा निर्णय घेतला. यंदा दोन दिवस सेंद्रिय ऊस गाळप करण्यात आले. यातून सेंद्रिय साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. साखरेचे उत्पादन घेताना यामध्ये गंधकाचा वापरही केला नाही. फक्त चुन्याचा वापर केला आहे.

ग्रीन हाऊसमध्ये मातीवर केलेल्या लागवडीतून मिळालेल्या उत्पादनापेक्षा माती विना शेतीमध्ये मिळालेले उत्पादन हे २० टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पण माती विना शेतीला मर्यादा आहे. फक्त गुलाब, जरबेरा, सिमला मिरची यांचेच उत्पादन आपण यामध्ये घेऊ शकतो. तसे छोट्या प्रमाणात गच्चीवर भाजीपाला व इतर फळ पिके घेतली जाऊ शकतात. पण मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेणे अशक्‍य आहे. यातून हवा असलेला नफाही मिळवणे शक्‍य नाही.
- गणपतराव पाटील, 

चेअरमन, दत्त साखर कारखाना, शिरोळ 

जरबेरा
 एका वर्षात एका स्केअर मीटरमध्ये - २५०  फुले 
 त्यासाठी लागणारा खर्च - १ रुपये ८० पैसे
 फुलांची विक्री - ३ रुपये

गुलाब
 एका वर्षात एका स्केअर मीटरमध्ये - १५०  फुले 
 त्यासाठी लागणारा खर्च - १ रुपये ९० पैसे
 फुलांची विक्री - ३ रुपये

कोकोपिट
 चेन्नई, बंगळुरू येथून विकत घेतले जाते. 
 सरासरी नऊ रुपये किलो दराने मिळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpatrao Patil Kondigre success story