शेतीसह ग्रामविकासात गावडेवाडीचे पाऊल पडते पुढे...

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्‍यातील गावडेवाडीने लोकसहभागाच्या जोरावर दुष्काळ हद्दपार केला आहे. पावसाचे पडणारे पाणी शिवारात अडविण्याचे काम ग्रामस्थांनी प्रभावी केले आहे. शेती व दूध उत्पादनात गाव अग्रेसर आहे. ग्रामसभेतील निर्णयाची गावकरी काटेकोरपणे अंमलबजावणी करतात. लोकवर्गणीतून माध्यमिक शाळा उभी केली असून, प्राथमिक शाळेचाही कायापालट केला आहे. गावाला जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवरील चौदा पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील विविध मान्यवरांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या कामाची प्रसंशा केली आहे. 

पुणे जिल्ह्यात मंचरच्या पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याला आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी गावात पाण्याचा टॅंकर मागवावा लागे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून होती. त्यामुळेच रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबईला स्थलांतरित झाली होती. गावची परिस्थिती बदलणे गरजेचे होते. ग्रामस्थांनाही तसे वाटत होते. मात्र सर्वांनी एक होणे आवश्यक झाले होते. गावातील (कै.) शंकरराव पिंपळे, (कै.) बाळासाहेब जिजाबा गावडे, ज्ञानेश्‍वर गेणूजी गावडे, तत्कालीन ग्रामसेवक मनोहर थिटे यांनी बदलासाठी पुढाकार घेतला. विकासात आघाडी घेतलेल्या व राज्यात प्रसिद्ध पावलेल्या नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे ग्रामस्थांच्या सहलीचे आयोजन त्यातून झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबरोबर ग्रामस्थांनी संवाद साधला. त्याचबरोबर  वनराईचे संस्थापक अध्यक्ष (कै.) मोहन धारिया यांनीही गावकऱ्यांना दुष्काळावर मात करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची माहिती दिली. त्यावेळी गावकऱ्यांची एकजूट व लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले. वनराई संस्थेने वेळोवेळी गावात बैठका घेतल्या. कृषी विभागानेही चांगली साथ दिली. महिलांच्या ग्रामसभा झाल्या. त्यातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा'' ही मोहीम गावात यशस्वीपणे राबविण्यात आली. पाच पाझर तलाव, पाच सिमेंट बंधारे, गॅबियन, वनराई व माती बंधारे तसेच सलग समतल चराची कामे झाली. शिवारात पाणी मुरण्यास मदत झाली. शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली. सन २००४ मध्ये उजव्या कालव्याच्या पाण्याचा फायदा झाला. सिमेंट बंधाऱ्यात पाण्याची साठवण झाली. 

गावात झालेले बदल
गावाला पाण्याची संरक्षित सोय झाली. मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून ठिबक, तुषार सिंचन व मल्चिंग पेपर या तंत्रांचा वापर शेतकऱ्यांनी सुरू केला. सन १९९० मध्ये दूध संकलन दिवसाला २०० लिटरपर्यंत होते. आज ते १२ हजार लिटरपर्यंत पोचले आहे. गांडूळ खत प्रकल्प, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन आदी व्यवसाय तरुणांनी सुरू केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केला जात आहे. शेतकऱ्यांनी कांदाचाळी उभारल्या आहेत. गावातच हक्‍काचा रोजगार मिळू लागल्याने सुमारे दीडशे कुटुंबे पुन्हा गावी येऊन स्थायिक झाली आहेत. 

पुरस्कारांचे गाव
गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते असे. आदर्शगाव, वनराई गाव, स्वच्छ सुंदर गाव, ऊर्जा ग्राम, विमा ग्राम, तंटामुक्‍त, ग्राम अभियान, यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, आदर्श कृषीग्राम, पर्यावरण संतुलन ग्राम समृद्धी, केंद्र सरकारचा निर्मल ग्राम, इंदिरा गांधी वृक्षमित्र व नुकताच जाहीर झालेला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार. 

लोकवर्गणीतून शाळांचा कायापालट 
दीड कोटी रुपये लोकवर्गणीतून हिरकणी माध्यमिक विद्यालय उभारले आहे. लीला पूनावाला फाउंडेशन संस्था दरवर्षी सातवीच्या वर्गातील मुलींनी दत्तक घेते. त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च करते. संस्थेने अद्ययावत शौचालय व संगणक प्रयोगाशाळा बांधून दिली असूून ४० लाख रुपये खर्चाची कामे केली आहे. प्राथमिक शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार सलग दोन वेळा मिळाला आहे. पाबळ विज्ञान आश्रममार्फत उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देणारा प्रकल्प हिरकणी विद्यालयात राबविला जात आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत ई-लर्निंग सुविधा असून थ्रीडी प्रिंटरमार्फत विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 

विविध क्षेत्रांत कार्यरत 
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यात गावडेवाडी यशस्वी झाली आहे. येथे शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या तर गावात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या तेराने जास्त आहे. गावातील काही युवक व युवती परदेशात नोकरीला आहेत. तीन राजपत्रित अधिकारी अाहेत. उद्योजकांची संख्याही मोठी आहे. सुमारे १५ तरुण देशाच्या सीमेवर देशाचे संरक्षण करीत आहेत. गावातील वाद तंटामुक्‍त समितीमार्फत मिटविले जातात. 

दृष्टिक्षेपात गावडेवाडी
कुटुंब संख्या-६४० 
लोकसंख्या-३१५६ 
एकूण भौगोलिक क्षेत्र- एक हजार २४३ हेक्‍टर, त्यापैकी ५७ हेक्‍टर क्षेत्र गायरान व ४१३ हेक्‍टर वनक्षेत्राखाली 
लागवडीलायक क्षेत्र-८३० हेक्‍टर. पैकी ७२८ हेक्‍टर बागायती 
पिके- बाजरी, भुईमूग, गहू, हरभरा, बटाटा, टोमॅटो

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला 
आदर्शगाव गावडेवाडीत जलसमृद्धी नांदली. आज विविध तंत्रज्ञानाच्या वापरातून एकरी उत्पादनात वाढ करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे. सुमारे ८५.३४ हेक्‍टर क्षेत्रात आंबा, सीताफळ, नारळ, चिकू, आवळा आदी फळबागा आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर याद्वारे उंचावला अाहे. गावात बंगल्याची संख्या सुमारे ७० ते ७५ पर्यंत आहे. घरोघरी मोटारसायकली असून, दीडशे कुटुंबांकडे चारचाकी वाहने आहेत. दुष्काळाचा शिक्‍का गावाने पुसून टाकला आहे. 
- देवराम बाळासाहेब गावडे,  ९९६०८७१३८८

विविध विकासकामे व लोकसहभागातून असंख्य वृक्षांची लागवड झाली आहे. चौदा पुरस्कार गावाला मिळाले आहेत. विकासकामात राजकारण न करता सर्व गावकरी एकजूट दाखवितात. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चंद्रशेखर, राज्यपाल पी. सी. अलेक्‍झांडर, एस. सी. जमीर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आदी मान्यवरांनी भेट देऊन गावकऱ्यांचे कौतुक केले आहे. दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. सौरऊर्जेवर गावाला वीजपुरवठा करण्याचा मानस आहे. गावात सीसीटीव्ही, मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. 
- छाया आनंदराव गावडे, सरपंच,  : ९९७०६५०७७१ 

ग्रामसभांच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी 
 गावडेवाडी शंभर टक्‍के गाव हागणदारीमुक्‍त आहे. गावात गटाराची व्यवस्था नाही. प्रत्येक कुटुंबाने शोषखड्‌डे घेतले असून, त्याद्वारे सांडपाणी सोडले जाते. गावात ३२ महिला बचत गट, एक शेतकरी बचत गट कार्यरत आहे. ग्रामपंचायतीची करवसुली १०० टक्‍के आहे. दर महिन्याला ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठका होतात. ग्रामसभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी गावकरी काटेकोरपणे करतात.
- अर्चना पाटोळे, ग्रामसेविका  : ७३५०९२२०९१

Web Title: Gavadewadi in rural development along with agriculture