जातिवंत १३२ गीर गायींचे संगोपन; सेंद्रिय दुधाचा गौशक्ती ब्रँड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली.

व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर व्यवस्थापनातून दररोज १८० ते २०० लिटर सेंद्रिय व उत्कृष्ट दर्जाची दूधनिर्मिती करून २०० पर्यंत ग्राहकांचे नेटवर्क तयार करण्यात यश मिळविले आहे. गौशक्ती या ब्रॅंडने दूध व तुपाला ओळख मिळवली आहे.   

अलीकडील काळात देशी गोसंगोपन करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. दूध, तूप विक्री, गोमूत्र-शेणापासून विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू लागल्याचेच ते द्योतक आहे. पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या दांपत्याने मात्र केवळ आवडीतून देशी गोपालनाचा ध्यास घेतला. अभियांत्रिकी क्षेत्रातील मुख्य व्यवसाय सांभाळून नऊ वर्षांपासून कष्ट, सातत्य, चिकाटी व अभ्यासूवृत्ती जोपासली. एका खिलार गाईपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज तब्बल १३२ गीर गाईंच्या संख्येपर्यंत येऊन विस्तारला आहे.    

गीर गाईंचे गोकूळ 
पुणे-सातारा रस्त्यावर पुण्यापासून सुमारे ३० किलोमीटरवर करंदी गाव लागते. इथे डोंगराळ, माळरान स्वरूपाचे सुमारे २५ एकर क्षेत्र खानापुरे यांनी खरेदी केले आहे. क्षेत्राचे दोन भाग आहेत. रस्त्याच्या एका बाजूला सहा एकरांत देशी गाईंचा अद्ययावत फार्म वसला आहे. लहान-मोठ्या मिळून सुमारे १३२ गीर गाईंचे गोकूळ तेथे सुखासमाधानाने नांदते आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोंगराळ क्षेत्र आहे. 

गोसंगोपनातून मिळवला आनंद 
खानापुरे व्यवसायाने इंजिनियर. ‘टू व्हीलर्स’ उद्योगासाठी लागणारे गीयर्स, केमशाप्ट आदी भाग बनवण्याचा त्यांचा कारखाना आहे. स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी उत्पादनांची ‘क्वालिटी’ जपणे, वेळेत पुरवठा, कंपनी व्यवस्थापन, त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या, रोजचे ताणतणाव या सर्व बाबींमधून प्रत्येक उद्योजकाला जावेच लागते. खानापुरेदेखील त्यास अपवाद नाहीत. मात्र, २८ वर्षांपासून उद्योगात कार्यरत राहताना खानापुरे यांनी गोपालनाची विशेष आवड जोपासली. आपल्या गोशाळेत आल्यानंतर स्वतःमधील उद्योजकाला ते विसरून जातात. गाईंसोबत लडिवाळपणा करण्यात रममाण होतात. या गाई तुमचं आयुष्य आनंदी, ताजंतवानं करून सोडतात, असं ते म्हणतात. त्यांना या वाटचालीत समर्थ साथ मिळाली ती पत्नी सौ. सुप्रिया यांची. साधारण २०१०-११ मध्ये दोघांनी एका खिलार गाईच्या संगोपनाद्वारे आपल्या आवडीला खतपाणी घालण्यास सुरवात केली.  

गीरच्या जंगलात भटकंती 
गोठ्यात जातिवंत गाईच असाव्यात, याबाबत खानापुरे दांपत्य आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गीर गाईंचे माहेरघर असलेले गुजरात गाठले. तेथे दहा-बारा दिवस मुक्काम ठोकला. गीरच्या जंगलात ते वेड्यासारखे भटकले. सकाळी सात वाजता शोधमोहीम सुरू व्हायची. ती संध्याकाळीच संपायची. तेथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याकडून अस्सल गाई घ्यायच्या, असा दिनक्रम असायचा. जुनागढचा भागही पिंजून काढला. गुजरातला अशा सहा-सात खेपा झाल्या. प्रत्येक खेपेत सहा-सात गाई आणल्या जायच्या. दुसरीकडे गोठ्यातही पैदास सुरू होती. सध्याच्या एकूण गाईंपैकी सुमारे ५० टक्के पैदास आपल्याच फार्मवर झाल्याचे सांगताना खानापुरे दांपत्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते.  

जातिवंत गाईंची ओळख  
खानापुरे म्हणाले, की जातिवंत गाय ओळखण्याच्या मुख्य खुणा अभ्यासल्या. तिचे डोके गोल हवे. शिंगे खाली वळलेली असावीत. वशिंड मोठे, शेपटी लांब म्हणजे जमिनीला टेकलेली हवी. गाईंच्या शोधमोहिमेत आमच्यासोबत गुजरातमधील पशुवैद्यकही असायचा. त्याने जातिवंत, सशक्त गाईंबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले. 

जातिवंत वळूची निवड  
खानापुरे म्हणाले, की गुजरातमध्ये स्वामीनारायणाची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची गोशाळा असते. तेथे जातिवंत, सुदृढ जनावरे पाहण्यास मिळतात. जातिवंत वळू त्यातीलच एका मंदिरातून आणला. त्या वेळी तो ३३ महिन्यांचा होता. तो घेण्यापूर्वी त्याची ‘हिस्ट्री’, त्याच्या आईची किंवा त्या पिढीतील गाईंची दूध देण्याची क्षमता तपासली. वळू सुपूर्त करण्यापूर्वी मंदिर ट्रस्टकडूनही खरेदी करणाऱ्या व्यक्तीची माहिती, त्याचा उद्देश या सर्व बाबींची शहानिशा केली जाते. 

दुधाचे मार्केटिंग  
अलीकडील काळात आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेले ग्राहक जास्त पैसे मोजूनही देशी दूध घेण्यास तयार आहेत. त्यातूनच ब्रॅंड तयार करून दुधाची विक्री करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी मार्केटिंग करणे महत्त्वाचे होते. सकाळच्या वेळेस फिरायला येण्याऱ्या लोकांची संख्या अधिक असलेली पुण्यातील काही ठिकाणे शोधली. त्यानुसार तळजाई टेकडी, गंगाधाम सोसायटी परिसरात खानापुरे यांनी स्टॉल उभारला. याबाबत सौ. सुप्रिया म्हणाल्या, की त्याद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना सांगू लागलो की आमच्याकडे जातिवंत गीर गाई आहेत. त्यांच्या काटेकोर, सेंद्रिय व्यवस्थापनातून आरोग्यदायी, उत्तम गुणवत्तेचे दूध आम्ही तयार करतो आहे. देशी गोपालनांसबंधीशी प्रशिक्षण प्रमाणपत्रे, माहितीपत्रके आम्ही स्टॉलवर उपलब्ध केली. ग्राहकांना दुधाचा स्वाद मोफत द्यायचो. 

ग्राहकांचा विश्‍वास जिंकला 
ग्राहकांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे होते. कुणीही आले, काहीही विकतेय, असा दृष्टिकोन तयार होऊ नये, हा प्रयत्न होता. दरम्यान, मुलगा सोहम लंडनहून ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकून नुकताच परतला होता. स्टॉलद्वारे दुधाचं प्रमोशन करण्यात त्याचाच मुख्य वाटा राहिला. दुधाच्या पाऊचचे ‘डिझायनिंग’ त्यानेच केले. मार्केटिंगसाठी तैनात केलेल्या जीपमधून तो फिरायचा. त्यापूर्वी गीरचा प्रदेश पाहण्याबरोबर दुधाच्या उपयोगीतेचा अभ्यास केला. आम्ही फार्मचे व्हिडिओ यू-ट्यूबवरही अपलोड केले. व्हॉट्स ॲपचा आधार घेतला. सर्व प्रयत्नांना हळूहळू यश येत गेलं. 

मागणी वाढली 
खानापुरे म्हणाले, की दुधाचा दर ८० रुपये प्रतिलिटर असल्याने काही ग्राहक सुरुवातीला फक्त मुलांसाठीच हवे, असे सांगून दररोज अर्धा लिटरच दूध घ्यायचे. पण हळूहळू आपल्याही आरोग्याला ते पोषक ठरू लागल्याचे अनुभव आल्यानंतर ही मागणी तीन लिटरपर्यंत होऊ लागली. आम्ही ग्राहकांचे ‘फीडबॅक’ घेण्यास सुरुवात केली. स्वतःची बेवसाइट तयार करून त्यावर ते उपलब्ध करू लागलो. त्यातून ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत झाली. विक्रीव्यतिरिक्त आमच्या इंजिनिअरिंग कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही देशी ताक, तूप पिण्यासाठी देतो. त्यातून त्यांचाही उत्साह व ऊर्जा वाढते.  

दोनशेपर्यंत ग्राहकसंख्या 
सौ. सुप्रिया सांगतात, की आजमितीला १९० ते २०० ते २२० पर्यंत ग्राहक तयार करण्यापर्यंत आम्ही मजल मारली आहे. दुधाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यानेच ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली. त्यामुळे ग्राहकांचे नेटवर्क वाढण्यास मदत झाली. आम्ही पद्मावती (सातारा रोड) येथे राहात असल्याने परिसरातील ग्राहकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले. मात्र, पुणे शहरातील कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, टिळक रोड, शुक्रवार पेठ, प्रभात रोड, भांडारकर रोड, कोंढवा, लुल्लानगर आदी उपनगरांपर्यंत ग्राहकवर्ग तयार केला. मागणी भरपूर आहे. पण, पुरवणे शक्य नाही, अशी स्थिती आहे. ग्राहकांमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे.  

जर्मनीपर्यंत पोचले देशी तूप 
जर्मनीच्या काही विद्यार्थ्यांनी भारतीय श्‍लोक, वेदांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या होत्या. त्यांच्यासोबत भारतीय विद्यार्थिनीही होती. त्यांना या अभ्यासात गीर गाईंचा संदर्भ व तुपाचे महत्त्व कळले. त्या माध्यमातून त्यांचे आमच्या घरी येणे झाले. आमचे देशी तूप त्यांना आवडले. मग जर्मनीला जाताना या मुली ते सोबत घेऊन गेल्या. अन्य काही लोकही आमचे तूप जर्मनीला घेऊन जातात, असे सौ. सुप्रिया यांनी सांगितले.  

प्रशिक्षणाचे बळ 
सौ. सुप्रिया यांनी ‘ॲग्रोवन व एसआयआयएलसी’ तर्फे आयोजित देशी गोसंगोपनाची दोन शास्त्रीय प्रशिक्षणे घेतली. महाराष्ट्रासह गुजरातेतही काही गोशाळांना भेटी दिल्या.  गुजरातमध्ये एक संस्थानिकाकडे तब्बल दोन हजार गीर गाई असून, त्यांनी जातिवंत गाईंचे संवर्धन केल्याचे खानापुरे यांनी सांगितले. 

घरीसुद्धा ॲलोपॅथी नाही
खानापुरे सांगतात, की आम्ही घरच्या मंडळींसाठीदेखील ॲलोपथीची औषधे वापरत नाही. तोच नियम गाईसाठीदेखील असतो. सौ. सुप्रिया यांनी इलेक्र्टो होमिओपथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. साहजिकच औषधेदेखील त्याच पद्धतीने जनावरांना दिली जातात.  

उदासीनता दूर करणारी जीवनशैली  
एखादी व्यक्ती उदासीन स्थितीत (डिप्रेशन) असेल किंवा ‘ब्लडप्रेशर’ त्रास असेल, तर त्यास गोठ्यात किंवा गाईंच्या सान्निध्यात ठेवल्यास या अवस्थेतून ती व्यक्ती पूर्ण बरी होऊन समाधानी जीवन जगू लागतो, असे म्हटले जाते. गोसंगोपनाची हीच किमया आहे. गाईंसोबत दोन घोडे व श्‍वानाचेही पालन आम्ही केले आहे. या सर्वांच्या संगतीत राहताना सर्व समस्यांचा आम्हाला विसर पडतो. जगण्याची ऊर्मी वाढते, अशी भावना खानापुरे दांपत्य व्यक्त करते. गोसंगोपन ही आमची आवड आहे. आम्ही त्यातील व्यवसायाकडे वळलो असलो, तरी केवळ पैसा कमावत राहणे हा प्रमुख उद्देश नसल्याचेही खानापुरे स्पष्ट करतात.    

खानापुरे यांचे गोसंगोपन दृष्टिक्षेपात
  सध्या गोठ्यातील गाई- सुमारे १३२ (लहान-मोठ्या धरून) 
  दूध देण्याची प्रति गाय क्षमता- ८ लिटर- दोन्ही वेळचे मिळून
  काही गाई १४ लिटरपर्यंतही दूध देतात.  
  वर्षभराचा विचार करता दररोजचे एकूण दूध संकलन- १८० ते २०० लिटर
  काही काळात कमाल दूध संकलन- २५० लिटर- प्रतिदिन 
  चार कायमस्वरूपी गवळी. त्यांची फार्ममध्ये राहण्याची व्यवस्था
  शेताचे काम पाहायला दोन व्यक्ती. 
  सशक्त गाई. मुक्त संचार पद्धत. त्यांना हवे तेव्हा हवे तेथे बसण्याची व्यवस्था. 
  शुद्ध, स्वच्छ वातावरणात ठेवल्याने त्वचेचे किंवा अन्य आजार होत नाहीत. 
  फार्ममध्ये सर्वत्र शेण व मूत्रापासून दोन फूट उंचीचा थर. (गादी). त्यावर गाईंना बसायला खूप आवडते. 
  पाण्याची, खाण्याची जागेवरच सोय.  
  २५ एकरांतील डोंगराळ माळरानात भरपूर झाडी, ओढे, वन्य भागाप्रमाणे वावर करण्याचे वातावरण.  
  दूधवाढीसाठी सरकी वा आंबोण, गव्हाचा भुस्सा, मक्याची चुनी यांचा वापर 
  गीर गाईंची प्रतिकारक्षमता अत्यंत चांगली. खूप थंडी किंवा खूप उष्णतेला (४२ अंश सेल्सिअस) त्या अनुकूल झाल्या आहेत.  
  शेणखत भरपूर मिळते. सेंद्रिय उत्पादक ते ४००० रुपये प्रतिट्रॉली दराने घेऊन जातात. त्या उत्पन्नातून चारा खरेदी शक्य होते. 
  फार्ममध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे. मोबाईलच्या माध्यमातून देखरेख करण्याची सुविधा 
  एक बोअर, विहीर. एप्रिल व मेमध्ये पाणी कमी पडते. अशा वेळी किंवा दुष्काळात दररोज एक टॅंकर -एक डेअरी व्यवस्थापक. दूध, खाद्य, चारा, औषधे, दूध संकलन, पशुवैद्यकाशी संपर्क, गाईंच्या अवस्थांची नोंद, अशा सर्व तांत्रिक बाबींची त्याकडे जबाबदारी.

दुधाची ‘क्वालिटी’, वितरण व्यवस्था
  शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीचे, स्वच्छ दूध 
  कोणत्याही रासायनिक प्रतिजैविकांचा, 
औषधांचा वापर नाही
  आधुनिक यंत्राद्वारे दूध पाऊच पॅकिंग करण्याची सुविधा  
  दुधातील खनिजे, व्हिटॅमीन्स, प्रोटिन्स, फॅट, एसएनएफ आदी घटकांची प्रयोगशाळांमधून वेळोवेळी तपासणी. ग्राहकांनाही त्याचा ‘फीडबॅक’ देण्यात येतो. त्यामुळे त्यांच्यात विश्‍वासार्हता  तयार होते.    
  दूध व तुपासाठी फूड सेफ्टी अर्थात ‘एफएसएआयआय’चा परवाना 
  दुधाची फ्री होम डिलिव्हरी
  वितरणासाठी पाच डिलिव्हरी बॉईज 
  थोडे दूध मार्जिन म्हणून घरी ठेवण्यात येते. 
दही व विरजण लावून घरगुती स्वरूपाने तूपनिर्मिती. 
  सौ. सुप्रिया यांच्या सासू आयुर्वेदिक डॉक्टर असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तूप तयार होते.  
  दुधाचा दर- ८० रुपये प्रतिलिटर. 
दूर अंतरानुसार ९० रुपयांपर्यंत.
  तुपाची विक्री महिन्याला अंदाजे १५ ते २० किलो. 
दर प्रतिकिलो ३२०० रु. 
  त्याचे पॅकिंग सीलबंद काचेच्या बाटलीतून 
   गौशक्ती नावाने दुधाचा ब्रॅंड, 
फार्मचे नाव- ए के ऑरगॅनिक फार्म
  सुप्रिया खानापुरे, ९८२३१८८८७६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: geer cow Organic Milk