
पुणे - लॉकडाऊनच्या काळात बाजार समित्या बंद राहिल्याने शहरांतील नागरिकांना शेतकऱ्यांमार्फत थेट भाजीपाला, फळे विक्रीची व्यवस्था कृषी विभाग, पणन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या पुढाकारातून राबवण्यात आली. अनेक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व काही ठिकाणी थेट शेतकऱ्यांनीही या व्यवस्थेचा फायदा मिळाला. मात्र बहुतांश ठिकाणी शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेते या व्यवस्थेत अडथळे आणत मोठी मलई मिळवत आहेत. हे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात खरेदी करून दुसरीकडे ग्राहकांकडून दामदुपटीपेक्षा अधिक पैसे कमावत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
लॉकडाऊन झाल्यानंतर शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा आक्रसला. त्यामुळे कृषी खात्याने पुढाकार घेऊन बागायतदार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या जिल्हानिहाय याद्या बनवून भाजीपाला, फळांचा पुरवठा करायला सुरवात केली. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असला तरी शहरांची गरज त्यातून हळूहळू भागत होती. बाजार समित्यांमधून भाजीपाला, फळे घेऊन शहराच्या कानाकोपऱ्यांत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही नंतर थेट विक्रीत शिरकाव केला. त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी करून सोसायट्यांमध्ये किंवा आपल्या दुकानात त्याची चढ्या दराने विक्री सुरू केली. त्याचबरोबर थेट विक्रीसाठी आपल्या भागात येणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे या व्यापाऱ्यांनाच मिळेल त्या किमतीत माल विकून परतीचा रस्ता धरणे शेतकऱ्यांना भाग पडू लागले. पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत हे चित्र दिसते आहे.
संधी म्हणून शेतकऱ्यांनी पहावे - विलास शिंदे
शेतकऱ्यांकडून कमी दरात माल घेऊन जास्त दारात विक्री ही अडचण कायम आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः किंवा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभी करणे गरजेचे झाले आहे. सद्य परिस्थितीत आव्हाने अनेक असली तरी त्याकडे संधी म्हणून पाहावे. सध्या बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यावर संघटित होऊन विक्री व्यवस्था निर्माण करणे, शेतमालाची विक्री करणे महत्त्वाचे आहे. सुरुवात करताना आव्हान तर आहेच मात्र संधी म्हणून सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास शेतकऱ्याच्या फायद्याचे राहील व दीर्घकालीन व्यवस्था उभी राहील, असे मत सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (मोहाडी, जि.नाशिक)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या शहरांमध्ये चढ्या दराने शेतमाल विक्री होत असल्याचे वास्तव आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा शहरातील भाजीपाला विक्री करणारे व्यापारी घेत आहेत. यामध्ये काही प्रमाणात प्रशासकीय पातळीवरील विसंवाद देखील कारणीभूत आहे.
- नरेंद्र पवार, स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी
शहरांमधील भाजीपाला विक्रीचे दर कायद्याने ठरवता येत नाहीत. त्यामुळे कोरोना लॉकडाऊनचा फायदा व्यापारी घेत आहेत. सध्या शेतमालाची वाहने पोलीस अडवत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
- वरिष्ठ अधिकारी, पणन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.