खास मिरचीसाठी जगभरात प्रसिद्ध गुंटूरची बाजारपेठ

गणेश काेरे 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मिरची या एकमेव शेतमालासाठी आंध्र प्रदेशातील गुंटूर बाजार समिती देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अाहे. वर्षाला सुमारे ५ हजार काेटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजार समितीत हंगामात दररोज तीन हजार शेतकरी मिरची विक्रीस घेऊन येतात. आता ‘आॅनलाइन’ लिलाव, बारकोडिंग आदी पारदर्शक पद्धतींमुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा करून देण्यात येत आहे. 

आंध्र प्रदेशातील हवामान मिरचीला पाेषक अाहे. गुंटूर जिल्ह्यातील प्रमुख पाच नगदी पिकांमध्ये मिरची प्रमुख असून, तिचे क्षेत्र सुमारे दीड लाख एकर आहे. साहजिकच या भागातील शेतकरी मिरची पिकाकडे वळाला. दिवसेंदिवस मिरचीचे क्षेत्र आणि उत्पादनही वाढू लागले. परिणामी गुंटूर बाजार समितीत मिरचीच्या आवकेतदेखील वाढ झाली. यामुळे बाजार समिती मिरचीसाठी प्रसिद्ध झाली. केवळ मिरची या एकमेव शेतमालासाठी अाशिया खंडात व कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी असा गुंटूर बाजार समितीचा लौकिक आहे. विविध राज्यांतील व्यापारी आणि निर्यातदारही येथे मिरची खरेदीसाठी येतात.   

मिरचीचे सर्वाधिक क्षेत्र
अन्य पिकांमध्ये कापूस, भात, हळद, तंबाखू आदी पिकांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील १३ जिल्ह्यांमध्ये मिरचीचे क्षेत्र सुमारे ५ लाख एकरपर्यंत आहे. कापसाचे सुमारे सव्वा लाख एकर क्षेत्र असून, त्याखालाेखाल भात, हळद आणि तंबाूचे क्षेत्र आहे. 

आॅनलाइन लिलावगृह
आॅनलाइन लिलावगृह असून, प्रत्येक व्यापाऱ्याला ‘युजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ दिला आहे. व्यापारी किंवा त्याचा प्रतिनिधी संबंधित लॉटच्या मिरचीची पाहणी करून त्यानुसार दर भरतात. ही प्रक्रिया सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तीन टप्प्यांमध्ये सुरू असते. त्यानंतर सर्व दर ‘लॉक’ केले जातात. सर्वाधिक दर अंतिम ठरवला जातो. लिलाव झालेल्या गाेणींना ‘बार काेडिंग’ होते. गाेणी गाडीत भरल्यानंतर गेट पास बनविला जाताे. ‘गेट’वर बारकाेडिंगची पडताळणी होऊन वाहन बाहेर साेडले जाते. लिलाव शेतकऱ्याला मान्य झाल्यानंतर त्याची माहिती शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या माेबाईलवर दिली जाते. यानंतर व्यापारी मिरची गरजेनुसार विकतो किंवा शीतगृहात ठेवताे. लिलाव मान्य नसल्यास तो नाकारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना असतो. 

शीतगृहांची साखळी 
बाजार समितीच्या परिसरात सुमारे ८१ तर जिल्हा परिसरात ११५ शीतगृहे आहेत. प्रति शीतगृहाची साठवणूक क्षमता एक ते दीड लाख गाेणींची आहे. प्रति गाेणीसाठी प्रति वर्ष १३० ते १५० रुपये दर आकारला जाताे. या सुविधेमुळे एेन हंगामात शेतकरी दरानुसार मिरची विक्री करू शकतो तर व्यापारी साठवणूक करू शकतो. शीतगृहांचा लाभ शेतकऱ्यांना तर होतोच; शिवाय व्यापारी आणि निर्यातदारही त्याचा लाभ घेतात. शीततगृहांमध्ये ८ ते १० अंश से. तापमानात मिरची संरक्षित ठेवली जाते.  शीतगृहचालकाला यातून चांगला आर्थिक फायदा हाेतो. 

प्रक्रिया उद्याेगाला चालना 
मिरचीच्या मोठ्या उलाढालीमुळे पावडर निर्मितीलाही चालना मिळाली अाहे. परिसरात सुमारे ६० पावडरनिर्मिती आणि दाेन मिरची तेल करणारे उद्याेग विकसित झाले आहेत. याद्वारे सुमारे ६० हजार राेजगार निर्मिती झाली आहे. प्रक्रियेपूर्वी मिरचीचे देठ काढावे लागतात. यासाठी कारखान्याच्या परिसरात माेठी शेडस अाहेत. एक किलाे देठ काढण्यासाठी प्रति किलाे १२ रुपये मजुरी दर आहे. एक महिला दिवसभरात जास्तीत जास्त दाेन पाेती (८० किलाे) मिरची निवडते. त्यातून तिला चांगले उत्पन्न 
मिळते. 

विविध वाणांना मागणी
बाजारात १० विविध वाणांच्या मिरचींची आवक हाेते. 
रंग आणि जास्त तिखट चवीच्या वाणाला विशेष मागणी राहते. 
मिरच्यांचे दर 
यंदा विविध टप्प्यांत झालेल्या पावसामुळे मिरची क्षेत्राबरोबरच उत्पादनात वाढ हाेण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीचे 
सचिव दिवाकर म्हणाले. मिरचीला सरासरी १० हजार रुपये प्रति 
क्विंटल दर मिळताे. हा दर १५ हजार रुपयापंर्यंतदेखील पोचला होता. सध्या गुंटूर ३३४ वाणाला ८० ते ९० रुपये तर तिखट वाणाला ११० 
ते १२० रुपये दर मिळत आहे. एेन हंगामात आवकेनुसार दर 
कमी- जास्त होतात असे ते म्हणाले.   
पुण्यात १०० काेटींची उलाढाल 
पुणे बाजार समितीमध्ये मिरचीची दर वर्षी सुमारे १०० ते १२५ काेटींची वार्षिक उलाढाल आहे. यात ६० टक्के वाटा गुंटूर मिरचीचा आहे. यात ब्याडगी मिरचीची माेठी उलाढाल आहे. उर्वरित आवक नंदुरबार, खामगाव, वालसा आदी ठिकाणांहून हाेते. पुण्यातून 
काेकण, नाशिक, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रात पुरवठा होते अशी माहिती मिरचीचे ज्येष्ठ व्यापारी बाळासाहेब काेयाळीकर (कर्नावट) यांनी सांगितले.
 : श्री. दिवाकर- ०७३३११५४८२५
सचिव, गुंटूर बाजार समिती

दृष्टिक्षेपात गुंटूर बाजार समिती
 स्थापना - २ जून १९६९, क्षेत्र- ४९.७३ एकर
 ठिकाण - गुंटूर शहरापासून सुमारे ५ किलाेमीटर
 वार्षिक उलाढाल - सुमारे ५ हजार काेटी
 समितीचे वार्षिक उत्पन्न - ५० काेटींच्या आसपास
 सुमारे २० देशात निर्यात. (यात अमेरिका, श्रीलंका, आखाती देश, बांगला देश, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, पाकिस्तान, जर्मनी आदींचा समावेश)
 निर्यातीतून सुमारे अडीच हजार कोटी रुपये परकीय चलन 
 हंगाम - जानेवारी ते जुलै
 हंगामातील आवक- दरराेज सुमारे एक ते दीड लाख गाेणी (प्रति गाेणी ४० ते ४३ किलाे)
 हंगामात दरराेज सुमारे ३ हजार शेतकरी मिरची घेऊन येतात
 बिगर हंगामात सुमारे ६०० शेतकरी मिरची (शीतगृहातील) विक्रीसाठी आणतात   
 खरेदीदार १००० तर तर निर्यातदार सुमारे ३७२
 कामकाज - साेमवार ते शुक्रवार  
 शेतकऱ्यांकडून अडत- २ टक्के तर, भाजीपाल्यासाठी (नाशवंत शेतमाल) ४ टक्के वसुली
 शेतकऱ्यांना माेफत जेवण, निवास आणि वैद्यकीय सुविधा. 

आॅनलाइन विक्री पद्धत
 बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर मिरचीची आवक झाल्यावर संगणकीकृत पावती तयार केली जाते. यात शेतकऱ्याचे नाव, पत्ता, माेबाईल क्रमांक, आधार कार्ड, बॅंक खाते क्रमांक आदी माहिती संगणक प्रणालीत भरण्यात येते.  शेतकऱ्याला बाजार समितीचा कायमस्वरूपी काेड क्रमांक दिला जाताे. यानंतर पावतीवर शेतकऱ्याचे नाव, गाडीचा क्रमांक, ड्रायव्हरचे नाव माेबाईल क्रमांकासह, पाेत्याची संख्या, (आवक स्रोत- शीतगृह वा थेट शेतातून), काेणत्या व्यापाऱ्याकडे माल विक्रीस जाणार त्याचा गाळा तसेच परवाना क्रमांक आदी माहितीची संगणकीय बारकाेड असलेली पावती दिली जाते. यासाठी दाेन गाेणी नमुना म्हणून काढल्या जातात. त्यांना बॅच क्रमांक दिला जाताे. सर्व माहिती संगणक प्रणालीत भरली जाते.

शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा यासाठी 
सर्व व्यवहार पारदर्शी करण्यासाठी ‘आॅनलाइन’ पद्धतीचा अवलंब केला आहे. यासाठी सुमारे तीन काेटी रुपये खर्च केले. पहिल्या टप्प्यात या व्यवहारासाठी आवश्‍यक इंटरनेटसह १०० इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी केले. स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित केली. आवकेपासून ते विक्री व्यवहारातील सर्व टप्प्यांवर ‘आॅनलाइन’ लक्ष ठेवले जाते. यात कोणाचीही फसवणूक हाेत नाही. पहिल्या टप्प्यातील आॅक्टाेबर २०१५ पासून प्रायाेगिक तत्त्वावरील प्रयाेग यशस्वी झाला आहे. टप्प्याटप्पाने पुढील तीन वर्षांत सर्व व्यवहार ‘आॅनलाइन’ होतील. 
- मन्नावर सुब्बाराव, अध्यक्ष, गुंटूर बाजार समिती

Web Title: Guntur chilli famous worldwide for the market