गारपीट, वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  

पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  

जुन्नर तालुक्यातील येडगाव- भोरवाडी येथील गोठ्यावर वीज पडून शेतकरी महेश दत्तात्रेय भोर यांचा पहाटेच्या वेळी वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शिरोली बुद्रुक परिसरातील गावांना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. कांदे काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. ओतूर आणि परिसरातील गावामध्ये वादळी पावसासह गाराही पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नारायणगाव परिसरात मंगळवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने वादळी पाऊस झाला. वीटभट्टी व्यावसायिक, कांदा, आंबा व टोमॅटो पिकांना पावसाचा फटका बसला आहे. पेमदरा वादळी पावसासह गारपीट झाल्याने अनेक कौलारू घरांची कौले फुटली. तसेच फळबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. 

चिंचोशी (ता. खेड) येथे हरिदास गोकुळे या शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गोकुळे यांच्या पत्नी व अन्य एक महिला यात जखमी झाल्या. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिके व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कलिंगड, चिकू, केळी, गहू, कडवळ, डाळिंब आदी पिकांना फटका बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hailstorm in the pune district