‘जुन्नर हापूस`ला मुंबई बाजारपेठेची पसंती

गणेश काेरे
बुधवार, 4 जुलै 2018

मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे.

मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे.

साधारण फेब्रुवारीनंतर तळ काेकणातून मुंबई, पुणे बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या आवकेला सुरवात हाेते. टप्प्याटप्प्याने आंब्याचा हंगाम बहरात आल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस काेकणातील हापूसचा हंगाम संपताे. त्यानंतर मुंबई बाजार समितीमध्ये दाखल होतो ‘जुन्नर हापूस.` कोकणातील हापूसच्या तोडीची चव या आंब्याला आहे. मुंबई शहरात जुन्नर हापूसचा विशेष ग्राहक तयार झाला आहे.

जुन्नर पट्ट्यात फुलली आमराई 
मुंबईच्या फळ बाजारात जुन्नर (जि. पुणे) भागातील आडते मोठ्या प्रमाणात आहेत. या आडत्यांकडे अनेक वर्षांपासून काेकणासह गुजरातमधील शेतकरी आंबा विक्रीसाठी पाठवतात. यामुळे शेतकरी आणि आडत्यांंमध्ये ऋणानुबंध जुळले. या ओळखीतूनच सत्तर वर्षांपूर्वी या आडत्यांनी चांगल्या गुणवत्तेची हापूस, लंगडा आणि राजापुरी आंब्याची कलमे जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिमेच्या डाेंगराळ भागातील कुसुर, काटेडे, येणेरे, काले, निरगुडे, बेलसर, शिंदे, राळेगण, बाेतार्डे, आपटाळे, माणिकडाेह आदी परिसरात लावली. काेकणासारखाच हा प्रदेश असल्याने कलमे चांगल्या पद्धतीने रुजली. काेकणातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जुन्नर पट्ट्यात आंबा बागा बहरल्या. काही वर्षांनंतर या ठिकाणचा आंबा मुंबई बाजारात दाखल हाेऊ लागला. या आंब्यालादेखील ग्राहकांची पसंती मिळाली. यातूनच ‘जुन्नर हापूस` ही विशेष आेळख तयार झाली. 

येणेरे येथील आंबा बागायतदार बाजीराव ढाेले म्हणाले, की माझ्या आजाेबांची मुंबई बाजार समितीमध्ये (जुना क्राफर्ड बाजार) ‘भाऊ मारुती` नावाने आडत हाेती. आमचे आजाेबा प्रामुख्याने आंब्याचा व्यापार करायचे. आमच्याबराेबर इतरही आडते हाेते. आमच्याकडे काेकण आणि गुजरात येथून माेठ्या प्रमाणावर हापूस आणि केसर आंबा विक्रीसाठी येत असे. या वेळी बागायतदारांशी आंबा लागवड, व्यवस्थापनाबाबत चर्चा व्हायची.

यामुळे काेणाच्या बागेतील हापूस चांगला येतो, कोणत्या बागायदाराला चांगला दर मिळतो, हे लक्षात आले. आमच्या गावाकडील वातावरणदेखील काेकणासारखे असल्याने आजाेबांनी आंबा बागायतदारांशी चर्चा करून सत्तर वर्षांपूर्वी गुजरातमधून हापूसची दर्जेदार शंभर कलमे आणून लावली.

आमच्याप्रमाणे निरगुडे येथील निरगुडकर, बाेडके आणि माणिकडाेह येथील ढाेबळे कुटुंबीयांनी गुजरात, तसेच कोकणातून हापूस कलमे आणून बागा तयार केल्या. काेकणातील  बागायतदारांच्या सल्ल्यानुसार बागांचे संगाेपन करत, परिससरात आमराया वाढू लागल्या. शेतकऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनातून फळांचे उत्पादन सुरू झाले. मुंबई मार्केटमध्ये काेकण, गुजरातमधून येणाऱ्या हापूसचा हंगाम संपल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुन्नरचा हापूस दाखल होऊ लागला. काेकणचा हंगाम संपला, तरी हा आंबा काेणता? अशी विचारणा ग्राहक कररू लागले. आम्ही ‘जुन्नर हापूस` असे ग्राहकांना सांगू लागलो आणि अल्पावधीत हा ब्रॅंड तयार झाला. जूनचा पहिला आठवडा ते तिसरा आठवडा, असा विक्रीचा हंगाम असतो.

आमची एकत्रित कुटुंबाची १०० कलमे असून, माझी ३५ कलमे आहेत. गेल्या पस्तीस वर्षांपासून आम्ही हापूस आंब्याचे उत्पादन घेत आहोत. साधारणपणे दोन ते अडीच डझनाचा एक बॉक्स ५०० ते हजार रुपयांपर्यंत जातो. प्रतवारीकरून आंबा पॅकिंग केले जाते. त्यामुळे चांगला दर आम्ही मिळवितो. त्यामुळे आंबा बागायती फायदेशीर ठरली आहे.
- बाजीराव ढाेले - ९७६६५५०७९७

‘जुन्नर हापूस`ची चव न्यारी 
काही आंबा बागायतदार  थेट व्यापाऱ्यांना बागा करायला देतात. यामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचे प्रमाण वाढले अाहे. आंबा उत्पादनासाठी पॅक्लोब्युट्राझोल, तसेच विविध कीडनाशकांचा वापर वाढला आहे. काही वेळा अपरिपक्व फळे विक्रीसाठी पाठविली जातात. त्यामुळे दर्जा घसरतो, दरही कमी मिळतो.  आमच्या जुन्नर परिसरातील हापूसच्या बागांचे स्वतः शेतकरी व्यवस्थापन करतात. रसायनांचा कमीत कमी वापर होतो. फळांचा दर्जादेखील चांगला मिळतो. त्यामुळे जुन्नर हापूसला ग्राहकांची पसंती मिळते, अशी माहिती बाजीराव ढाेले यांनी दिली.

मुंबई बाजारपेठेचा आढावा 
 वाशी बाजार समितीमध्ये फळ विभागात आंबा विक्री करणारे जुन्नर परिसरातील ६० आडते.
 १ जून ते २२ जून या कालावधीत ‘जुन्नर हापूस`ची विक्री. दरराेज वीस हजार बॉक्सची आवक. दोन डझन, तीन डझन आणि चार डझनाचा बॉक्स.
 काेकणचा हंगाम संपल्यावर जुन्नर हापूसला पहिल्या टप्प्यात प्रतिडझन साधारण १५० ते ५०० रुपये दर.
 गुजरात, देवगड, रत्नागिरीबराेबर ‘जुन्नर हापूस`ला वेगळी चव असल्याने ग्राहकांकडून खास मागणी. 
 जुन्नर पट्ट्यातून हापूस बरोबरीने राजापुरी, केसर आणि लंगडा आंब्यांची आवक. केसर ४० ते ८० रुपये, राजापुरी ३० ते ४० रुपये आणि लंगडा ४० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री.

शरद पवार यांच्याकडून ‘जुन्नर हापूस`चे काैतुक  
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नुकतेच जुन्नर तालुक्याच्या दाैऱ्यावर हाेते. या वेळी जुन्नर परिसरातील आंबा बागायतदारांनी त्यांना आंबापेटी भेट दिली. या वेळी त्यांनी जुन्नर हापूसची चव चाखली. आंबा बागायतीबाबत सविस्तर चर्चा देखील केली, अशी माहिती बाजीराव ढाेले यांनी दिली.
  
जुन्नरमध्ये भरतो आंबा बाजार
मुंबईप्रमाणेच जुन्नर शहरामधील सदाबाजार पेठेत जून महिन्यात दरराेज पहाटे आंबा बाजार भरताे. या बाजारात जुन्नरच्या पश्‍चिम घाट परिसरातील शेतकरी आंबा विक्रीसाठी आणतात. यामध्ये हापूस, केसर, लंगडा, राजापुरी यांसह रायवळ आंबा विक्रीला येतो. पहाटे पाच वाजता भाेसरी, चाकण, खेड, मंचर येथील खरेदीदार या बाजारात येऊन थेट खरेदी करतात. शेतकरी किरकाेळ विक्रीतूनदेखील उत्पन्न मिळवितात. सकाळी दहा वाजता बाजार संपताे. 

‘जुन्नर हापूस‘ला जीआय घेणार...
मुंबई बाजारपेठेत देवगड, रत्नागिरीप्रमाणे ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. यास ग्राहकांची पसंती मिळाली आहे.  ‘जुन्नर हापूस`ची वेगळी आेळख निर्माण करण्यासाठी भाैगाेलिक निर्देशांक घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. 
- संजय पानसरे, ९८२०८०६०६७ (अध्यक्ष, वाशी बाजार समिती फळे व्यापारी संघटना)

काेकणातील हापूस हा पुणे, मुंबईला प्रामुख्याने विक्रीसाठी पाठवला जाताे. हा आंबा जुन्नराला उशिरा दाखल हाेताे. त्यामुळे आम्हाला जुन्नर हापूसवरच अवलंबून राहावे लागते. सदाबाजार पेठेत माेठ्या प्रमाणावर स्थानिक आंबा विक्रीसाठी येतो. यामध्ये हापूस, केसर, राजापुरी, रायवळ आंबा असताे. सरासरी १५० ते २५० रुपये डझन या दराने हापूस आंबा मिळताे. याची चवही सुंदर आहे.
- रमेश पांडव, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapus Mango Mumbai Market