esakal | मुंबई बाजार समितीत हापूसला उठाव नाही;कोरोनाच्या प्रभावाने ग्राहकांची पाठ 
sakal

बोलून बातमी शोधा

hapus-mango

कोरोनाच्या प्रभावाने बाजारात आंब्याला आता उठावही नाही, निर्यातही कमी ठप्प असल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

मुंबई बाजार समितीत हापूसला उठाव नाही;कोरोनाच्या प्रभावाने ग्राहकांची पाठ 

sakal_logo
By
प्रतिनिधी

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात फळांच्या राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने यावर्षी हापूस आंब्याची बाजारातील आवक नेहमीच्या मानाने घटलेली आहे. त्यातच कोरोनाच्या प्रभावाने बाजारात आंब्याला आता उठावही नाही, निर्यातही कमी ठप्प असल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याचा फटका हापूस आंबा बागायतदारांनाही बसत आहे. हापूसच्या सुमारे हजारो पेट्या सध्या कोकणात पडून आहेत. त्यामुळे आंबा विक्रीबाबत आत्ताच निर्णय न झाल्यास येत्या काळात कोकणातील आंबा बागायतदार भीषण संकटात येण्याची भीती आहे. कोकणात साधारण ४ लाख एकरावर हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यावर जवळपास ३ ते ४ कोटी डझन आंबा तयार होतो. त्यापैकी काही लाख पेट्या मुंबई, पुणे व नाशकात विक्री करण्यासाठी बागायतदारांनी सज्ज केल्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला हापूसला महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही मागणी नाही. 

हापूसच्या एकूण उत्पादनाच्या ४० टक्के आंबा आखाती देशात निर्यात होतो तर ६० टक्के हापूस स्थानिक बाजारात विक्री होतो. मुंबई बाजार समितीमध्ये साधारणपणे ७० ते ८० निर्यातदार आहेत. हे व्यापारी एअर कार्गोमधून परदेशात भाजीपाला, फळे पाठवतात. यांच्या माध्यमातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडचे हापूस बागायतदार आंब्याच्या निर्यातीसाठी सज्ज असतानाच सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. आता तर संपूर्ण आशिया खंडात कोरोनाने हाहाकार घातला असल्याने त्याचा हापूस आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. 

मोहन डोंगरे हे निर्यातदार गेल्या ४० वर्षापासून मुंबई बाजार समितीतील फळ बाजारात हापूस आंब्याची निर्यात करतात. त्यांच्या मते आतापर्यंतच्या कारकिर्दीत इतका मोठा फटका कधीच बसला नव्हता जो आता कोरोनामुळे बसला आहे. दुबईसारखी मोठी बाजारपेठ हातची गेल्याने निर्यातक्षम हापूस आंब्याचे दरही घसरले आहेत. तसेच निर्यात होणारा आंबा स्थानिक बाजारपेठेतही विकला जात नाही. जो काही आंबा घाऊक बाजारात येत आहे, त्यालाही उठाव नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील आंबा पडून असल्याचे चित्र बाजारात आहे. परिणामी आंबा व्यापारी, बागायतदारांची चिंता वाढली आहे. बाजार समितीत सुमारे तीस हजार हापूसच्या पेट्या पडून असल्याचे सांगितले जाते. 

एकाधिकार योजनेसारखी आंब्याची खरेदी करावी 
जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा साधारण १५ मार्चनंतर बाजारात येतो आणि १५ मेपर्यंत विक्रीस असतो. यादरम्यान मागणी पूर्णपणे थांबल्याने सरकारने कापूस एकाधिकार योजनेसारखी आंब्याची खरेदी करावी. रेशनच्या दुकानात किंवा अन्य मार्गाने हे आंबे सरकारने सर्वसामान्यांना विक्री करावे, असे कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव म्हणाले. 

loading image