आरोग्यदायी कारले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

टीप - कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही, अशा वेळी खडीसाखर अथवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.

कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून, ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. यामुळे आरोग्य सुधारते.

औषधी गुणधर्म 
खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी.
कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते.
कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. पचन क्रिया सुधारते.
आयुर्वेदानुसार कारले पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहे. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. 

उपयोग
कारल्याच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबू रस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते. पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.
 मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्याचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५ ग्रॅम (अर्धा चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.
जंत-कृमी झाले असतील तर कारल्याच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.
रसामुळे रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.

प्रक्रियायुक्त पदार्थ
रस  
   कारली स्वच्छ करावीत.
   १ किलो तुकड्यांमध्ये ७५० मिलि पाणी मिसळावे.
   तुकड्यांचा स्क्रू टाइप एक्सट्रॅक्टर यंत्राने रस काढावा.
   रस ७० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला तापवावा.
   थंड करून २४ तास स्थिर ठेवून गाळणीने रस गाळून घ्यावा.
स्क्वॅश 
   २५ टक्का रस, ४० टक्के टीएसएस आणि आम्लतेचे प्रमाण १.५ टक्के असते.
   १ लिटर गाळून घेतलेल्या रसामध्ये १ लिटर पाणी, १.८ किलो साखर, ०.६ ग्राम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट आणि ५ ग्राम सायट्रिक आम्ल मिसळावे.
   मिश्रण विरघळेपर्यंत हलवत राहावे, चांगले ढवळून तयार स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.
लोणचे  
   १ किलो कारले पाण्याने धुऊन कापून घ्यावे.
   अर्धा लिटर तेल गरम करून त्यात २ ग्रॅम बारीक चिरलेले लसूण परतून घ्यावेत.
   २५ ग्रॅम मोहरी, ५  ग्रॅम हिंग, ५ ग्रॅम जिरे आणि मेथी भाजून त्याची पावडर बनवून मिसळावे.
   पावडर केलेले घटक ८०  ग्रॅम मिरची पावडर, १० ग्रॅम धने पावडर, २०० ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम हळद घालून उकळावे आणि शिजवावे.
   काही प्रमाणात व्हिनेगर मिसळून निर्जंतुक बाटलीमध्ये साठवून ठेवावे.

 मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७
(शिवरामजी पवार ग्रामीण  अन्नतंत्र महाविद्यालय, कंधार, जि. नांदेड)

टीप - कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही, अशा वेळी खडीसाखर अथवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Bitter gourd