उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला हायटेक डेअरी प्रकल्प

विनोद इंगोले
सोमवार, 13 मे 2019

गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे उभारलेला हा प्रकल्प दुग्धोत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे उभारलेला हा प्रकल्प दुग्धोत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

सहकारी तत्त्वावरील दुग्ध व्यवसाय व प्रक्रिया उद्योगातील भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून अमूलकडे पाहिले जाते. गुजरात राज्यातील आणंद (जिल्हा ठिकाण) हा भाग त्यासाठीच प्रसिद्ध आहे. इथून सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या गोपालपुरा परिसरात दुग्धोत्पादकांची संख्या अधिक आहे. हेच कारण अमूलची चळवळ या भागात वाढीला प्रोत्साहन देणारी ठरली. दुग्धक्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन यांनी पहिल्यांदा या भागात दूध खरेदी केली. त्यानंतर गोपालपुरा दूध उत्पादक सहकारी मंडळ अस्तित्वात आले. गोपालपुरा गावाची लोकसंख्या साडेतीन हजार असून दूध संघाचे सुमारे २०० सदस्य आहेत. गावात सुमारे १४०० गायी व ४५० म्हशी आहेत. यातील काही पशुपालक संघाला दूध देतात. या माध्यमातून संघाचे चार हजार लिटर दूध संकलन असल्याची माहिती संघाचे कर्मचारी मुकेश ऊर्फ लालाभाई पटेल यांनी दिली. 

रबारी यांचा डेअरी फार्म
गोपालपुरा भागात रबारी समाजाची वस्ती आहे. पारंपरिक पद्धतीने गीर गायींच्या माध्यमातून दुग्धोत्पादन करणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. येथील संजय रबारी यांनी या भागात ‘हायटेक’ तंत्राचा वापर सुरू केला. शिवम डेअरी फार्म नावाने त्यांचा प्रकल्प आहे. संजय यांचा जुना छोटा फार्म आहे. मात्र उच्च तंत्रज्ञानावर आधारीत त्यांनी गावाच्या दुसऱ्या बाजूस नव्या फार्मची उभारणी केली आहे. सुमारे ३२० बाय ८५ फूट आकाराचे व सुमारे ५०० गायींच्या क्षमतेचे शेड आहे. मुक्‍त गोठा पद्धतीने जनावरांचे व्यवस्थापन होते. विस्तारीत फार्मची उभारणी साडेतीन एकरांवर आहे. ही जागा तब्बल दीड कोटी रुपयांत खरेदी करणात आली. त्याकरीता बॅंकेकडून कर्ज घेण्यात आले. 

मूरघास तंत्र 
संजय यांची शेती नाही. मात्र वर्षभर चाऱ्याची सोय करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांसोबत करार शेती केली आहे. मक्‍यापासून मुरघास तयार करून शेतकरी त्याचा पुरवठा करतात. त्याची पावणेचार रुपये प्रति किलो दराने खरेदी होते. त्यावरील प्रक्रियेचा खर्च वेगळा असतो. दररोज सुमारे दोन टन चारा लागतो. माती व ताडपत्रीचा वापर करून मूरघास हवाबंद ठेवण्यात येतो. 

चाऱ्यासाठी यंत्र
मूरघास ‘लोड’ करणे आणि त्यातील घटक एकजीव होण्यासाठी स्वयंचलित रोटर असलेले यंत्र घेतले आहे. दीड टन क्षमतेच्या या यंत्राची किंमत चार लाख रुपये आहे. एक टन क्षमतेचे अन्य लोडरही असून त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. लोडरमधील टॅंकमध्ये किती चारा आहे 
हे त्यावरील ‘डिजिटल डिस्प्ले’च्या माध्यमातून समजते. शिल्लक चाऱ्याचेही प्रमाण कळते.

मोबाईल ॲपचा वापर 
मिल्किंग मशिनद्वारे दूध काढतेवेळी गायीने साथ दिली नाही आणि दूध काढण्याची प्रक्रिया अपूर्ण झाल्यास मोबाईल ॲपवर त्याची त्वरीत माहिती मिळते. त्यासंबंधीची स्क्रिनिंग यंत्रणा मिल्किंग मशिनवर बसवली आहे. 

शेतकऱ्यांची भेट
संजय यांच्या डेअरी फार्मला केव्हीके दुर्गापूर (अमरावती) येथील तज्ज्ञ प्रतापराव जायले, डॉ. व्ही. बी. शिरभाते यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांनी भेट दिली. आत्माअंतर्गत अभ्यास दौऱ्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.  

पाण्यासाठी अल्युमिनियम टॅंक  
म्हैसागड प्रकल्प आणि परिसरातील नदीमुळे पाण्याची पातळी या भागात चांगली आहे. सुमारे ८० फुटांवरच पाणी लागते. बोअरवेलचा पर्याय आहे. या पाण्याचा उपसा करून ते साठविता यावे यासाठी सिमेंट टॅंक बांधण्याचा विचार होता. परंतू हे काम जास्त खर्चिक असल्याचे लक्षात आले. अन्य पर्यायाच्या शोधात असताना अल्युमिनियम टॅंकची माहिती मिळाली. आतून प्लॅस्टिक व वरील भागात अल्युमिनियम लेअर अशा प्रकारचा ५० हजार लिटर क्षमतेचा टॅंक बसविला आहे. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला. 

नोकरीऐवजी दुग्धव्यवसाय
संजय यांचे वडील आणंद कृषी महाविद्यालयात प्रक्षेत्र व्यवस्थापक होते. संजय यांनीही एम.एस.सी.(ॲग्री)पर्यंत शिक्षण घेतले. कृषी अधिकारी पदाची परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. मात्र नोकरीऐवजी घरच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सन २००४-०५ पासून दुग्ध व्यवसायात पाय रोवण्यास सुरवात केली. पूर्वी जेमतेम १६ पर्यंत असलेली गायींची संख्या आता २०० च्या पुढे गेली आहे.

दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात 
    उत्तम प्रतीच्या एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन) गायींची खरेदी.
    पंजाबहून सुमारे ७० हजार रुपये दराप्रमाणे पहिल्या टप्प्यात १५० गायी आणल्या. 
    सद्यस्थितीत दोन्ही फार्म तसेच जर्सी गायी व एचएफससह व लहान-मोठी धरून सुमारे ३०० गायी. 
    सर्व मिळून दोन्ही वेळचे मिळून दररोजचे दूध संकलन- २७०० लिटर, नव्या फार्ममधील दूध संकलन- १९०० लिटर.
    अमूल (आनंद मिल्क युनियन लिमिटेड) कंपनीला दुधाचा पुरवठा. कंपनीचे टॅंकर दूध संकलनासाठी फार्मवर येतात. 
    नव्या फार्ममध्ये इस्त्राईलच्या धर्तीवर प्रकल्प. 
    मिल्किंग मशिनद्वारे दूध काढले जाते. दूध काढल्यानंतर प्रति गायीच्या दुधाची नोंद ठेवली जाते.  त्यासाठी प्रक्षेत्र व्यवस्थापकाची नियुक्‍ती केली आहे. 
    दुधाला फॅट व एसएनएफनुसार प्रति लिटर २८ रुपये दर.
    सुमारे १५ ते २० मजूर कायमस्वरूपी. 
    शेडमधील तापमान नियंत्रित राहावे याकरिता फॉगर, फॅनची व्यवस्था. 
    उत्तम प्रतीच्या वळूचे संगोपन.  
    साधारण १५ मार्चपर्यंत गाय गर्भार राहावी असाही दंडक आहे. गाय सरासरी ६० ते ७० दिवसांत माजावर येते. त्यासाठी आहाराचे नियोजन काटेकोर करावे लागते. 
    वर्षाला एका गाईपासून एक वासरू मिळाले तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो असे संजय यांनी सांगितले. 
    व्याल्यानंतर वासराला बॉटलच्या साहाय्याने दूध पाजले जाते. गोऱ्हा झाल्यास तो जीवदया ट्रस्ट किंवा अमूलला निशुल्क दिला जातो.  

- संजय रबारी, ०९८७९५८७१७७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Educated Agriculture Graduate Hitech Dairy Projecy Sanjay Rabari