मिश्र फळबाग, वनशेती ठरतेय किफायतशीर...

डॉ. रवींद्र भताने
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

रामवाडी (ता. चाकूर, जि. लातूर)  येथील डॉ. नागनाथ शंकरराव नागरगोजे आणि डॉ. बाळासाहेब शंकरराव नागरगोजे या डॉक्टर बंधूंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिश्रफळबाग आणि वनशेतीचे नियोजन केले. व्यवस्थापनास सोपे जाण्यासाठी डॉ. नागरगोजे यांनी लागवड क्षेत्राचे विभाग पाडून लिंबू, पपई, ॲपल बेर, चंदन, मिलिया डुबियाची लागवड केली. या मिश्र फळबाग क्षेत्रात तूर, सोयाबीनचे आंतरपीकही घेतले जाते.

रामवाडी (ता. चाकूर, जि. लातूर)  येथील डॉ. नागनाथ शंकरराव नागरगोजे आणि डॉ. बाळासाहेब शंकरराव नागरगोजे या डॉक्टर बंधूंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिश्रफळबाग आणि वनशेतीचे नियोजन केले. व्यवस्थापनास सोपे जाण्यासाठी डॉ. नागरगोजे यांनी लागवड क्षेत्राचे विभाग पाडून लिंबू, पपई, ॲपल बेर, चंदन, मिलिया डुबियाची लागवड केली. या मिश्र फळबाग क्षेत्रात तूर, सोयाबीनचे आंतरपीकही घेतले जाते.

नागरगोजे कुटुंबाची रामवाडी शिवारात २४ एकर शेती आहे. पूर्वी त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. परंतु, बाजारपेठ आणि व्यवस्थापनासाठी सोईचे होण्यासाठी नागरगोजे बंधुंनी फळबाग आणि वनशेती लागवडीचे नियोजन केले. 

डॉ. नागनाथ नागरगोजे हे रामवाडी येथून जवळच असलेल्या सताळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर डॉ. बाळासाहेब हे अहमदपूर येथे स्वतःचा दवाखाना चालवतात. वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असताना देखील नागरगोजे बंधूंनी वडिलोपार्जित जमिनीत फळबाग उभी केली. दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी दोन कायमस्वरूपी मजूर आहेत.

दर दोन दिवसांनी तसेच सुटीच्या दिवशी नागरगोजे बंधू शेती नियोजनासाठी शेतावर जातात. सन २०१६ मध्ये त्यांनी फळबाग आणि वनशेतीच्यादृष्टीने जमिनीची आखणी केली. चंदन आणि मिलिया डुबिया लागवडीपूर्वी डॉ. नागनाथ नागरगोजे यांनी बंगळूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अॅड टेक्नोलॉजी या संस्थेत प्रशिक्षण घेतले. 

पाणी नियोजन 
एक विहीर व दोन कूपनलिका आहेत. कूपनलिकेचे पाणी विहिरीत साठविले जाते. तेरा एकर क्षेत्रात पाइपलाइन करून पाणीपुरवठा केला जातो. ठिबक सिंचनाद्वारे पपई, चंदन, मिलिया डूबिया, अॅपल बेर झाडांना पाणी पुरवठा तसेच पिकाच्या गरजेनुसार विद्राव्य खतांचा वापर होतो.

लिंबू ,चंदन आणि पपई लागवड 
   चार एकर क्षेत्रावर मे २०१६ मध्ये दहा फूट बाय दहा फूट अंतरावर खड्डे घेऊन खत,माती मिश्रणाने भरले.
   जुलै महिन्यात २० फूट बाय २० फूट अंतरावर लिंबाच्या प्रमालिनी आणि विक्रम जातीची लागवड. दोन लिंबांच्या ओळीत एक चंदनाची ओळ. काही क्षेत्रात चंदन रोप लागवड  वीस फूट बाय दहा फुटांवर केली आहे. 
   जून २०१७ मध्ये चंदनाच्या ओळीतील दोन झाडांच्यामध्ये पपई रोपांची लागवड, एप्रिल १८ मध्ये पपईचे उत्पादन सुरू.
   चार एकरात लिंबू ४५०, चंदन १५०० आणि पपईची १२०० झाडे.
   या क्षेत्रामध्ये तूर, सोयाबीनचे आंतर पीक. यातून ३० क्विं. तूर आणि सोयाबीनचे ३० क्विं. उत्पादन. दुसऱ्यावर्षी देखील सोयाबीनचे आंतरपीक. आंतर पिकातून झाडांच्या लागवडीचा खर्च काही प्रमाणात निघाला. 
   पपईचे १२ टन उत्पादन. सरासरी प्रति किलो नऊ ते दहा रुपये असा दर मिळाला. व्यापाऱ्यांनी जागेवरच पपईची खरेदी केली. खर्च वजा जाता लाख रुपयाचे उत्पन्न पपईतून झाले.  
   बांधावर पाच फूट अंतरावर बांबू आणि मिलीया डूबियाची लागवड करून नैसर्गिक कुंपण.

अपेक्षित उत्पादन 
   मिलिया डूबियाची लागवडीनंतर सात वर्षांनी कापणी. काड्यापेटी, कागद निर्मितीसाठी मागणी. एका झाडापासून दीड ते दोन टन लाकूड उत्पादनाची अपेक्षा. छाटणी केल्यानंतर परत फुटवे मिळतात.
   चंदनाची सात बाऱ्यावर नोंदणी. साधारणपणे बाराव्यावर्षी एका झाडापासून पंधरा किलो गाभा मिळण्याची अपेक्षा. बाजारपेठेत चांगली मागणी.
   लिंबाचे किफायतशीर उत्पादन लागवडीनंतर चार वर्षांनी मिळण्यास सुरवात. उन्हाळ्यात सरासरी ७० रुपये प्रती किलो दर.
   अॅपल बेरच्या एका झाडापासून ४० किलो उत्पादन. सरासरी २० ते ३० रुपये प्रति किलो दराची अपेक्षा.

फळबाग व्यवस्थापनाची सूत्रे 
   जातिवंत रोपांची लागवड. फळबागेत आंतरपिकांचे नियोजन. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर.
   मे महिन्यात शेणखत, गांडूळखत देऊन झाडांना मातीची भर. त्याचबरोबरीने बोर्डेपेस्टही लावली जाते.
   ठिबक सिंचनाने पाणी नियोजन. विद्राव्य खतांचा वाढीच्या टप्यानुसार वापर. फळझाडांना पालापाचोळ्याचे आच्छादन.
   प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्याने फळझाडांची हलकी छाटणी. खतांचे व्यवस्थापन. कीड, रोग नियंत्रण. 
   संपूर्ण क्षेत्राला सौर कुंपणाचे नियोजन. त्यामुळे फळबागेचे संरक्षण.
   परागीकरणासाठी फळबागेत मधमाशाच्या सात पेट्या. चांगल्या परागीकरणामुळे फळांच्या उत्पादनवाढीला चालना. 

ॲग्रोवन ठरला मार्गदर्शक 
डॉ. नागरगोजे हे दररोज अॅग्रोवनचे वाचन करतात. त्यातून त्यांना फळबाग, वनशेतीची संकल्पना पटली. त्याचबरोबरीने प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत फळबागेत आंतरपिकांचेही नियोजन केले. त्यामुळे फळबाग व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यात त्यांना यश आले. फळबाग लागवडीसाठी त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. पीक वाढीच्या टप्प्यानुसार तज्ज्ञांचे सल्ले व अॅग्रोवनमधील माहितीचा त्यांना पीक व्यवस्थापनात उपयोग होतो.

मिलिया डूबिया, चंदन आणि लिंबू  लागवड 
   एकूण क्षेत्र सहा एकर. मे,२०१६ मध्ये दहा फूट बाय दहा फूट अंतरावर खड्डे घेऊन खतमाती मिश्रणाने भरले. जून महिन्यात २० फूट बाय २० फूट अंतरावर लिंबू लागवड. यानंतर लिंबाच्या मधल्या पट्यात एक ओळ चंदन आणि दुसऱ्या पट्यात एक ओळ मिलिया डुबियाची लागवड. काही क्षेत्रावर लागवडीचे अंतर २० फूट बाय १० फूट.
   या क्षेत्रात मिलीया डूबिया १५००, चंदन १५०० आणि लिंबाची ८५० रोपांची लागवड.

अॅपल बेर लागवड
   अडीच एकरांत जून १७ मध्ये  दहा फूट बाय दहा फूट अंतरावर अॅपल बेर लागवड.
   पहिला बहर फारसा घेतला नाही. जे काही फळांचे उत्पादन मिळाले त्याची विक्री स्थानिक बाजारपेठेत सरासरी २५ ते ३० रुपये किलो प्रमाणे केली. त्यातून ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. सध्याच्या काळात फळधारणा झाली असून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा. यावर्षी  पुणे, नागपूर, हैद्राबाद बाजारपेठेत विक्रीचे नियोजन.  

दीड एकरवर पपई लागवड
   दीड एकरावर जून २०१७ मध्ये सहा फूट बाय सहा फूट अंतरावर गादी वाफ्यावर पपई रोपांची लागवड.
   एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत सात टन उत्पादन. खर्च वजा जाता ८० हजाराचे उत्पन्न. 

- डॉ. नागनाथ नागरगोजे, ९४२१९३२०४४ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horticulture Forestry Agriculture