हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवर

बाभळगाव, जि. परभणी - शिवारातील उसाचे हुमणीमुळे नुकसान झाले आहे. (इन्सेक्टमध्ये) उसाच्या मुळात आढळलेली हुमणी कीड.
बाभळगाव, जि. परभणी - शिवारातील उसाचे हुमणीमुळे नुकसान झाले आहे. (इन्सेक्टमध्ये) उसाच्या मुळात आढळलेली हुमणी कीड.

पुणे - राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल हवामानामुळे हुमणीने मोठे आव्हान निर्माण केले. राज्यातील सर्वच ऊस उत्पादक पट्ट्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पुणे विभागात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत तर उर्वरित राज्यात ५ ते २० टक्के हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पुणे विभागात जवळपास अडीच लाख हेक्टरवर तर उर्वरित भागांमध्ये दीड लाख हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील जवळपास चार लाख हेक्टरवर हुमणीचा विळखा असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

यंदा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून दुष्काळाचा फटका बसलेल्या ऊस पिकाला हुमणीनेही विळखा घातल्याने उत्पादनात घट होऊन साखर कारखान्यांना तुटवडा निर्माण होऊ शकतो. लाखो हेक्टवर या कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत. 

कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले की कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी हुमणी प्रादुर्भाव झालेला आहे. हुमणी काही ठिकाणी प्रथमच पण काही ठिकाणी दरवर्षी आढळून येते. या भागात दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यात नदीकाठावर (लिकोफोलिस) आणि माळावर (होलोट्राकिया) असे संबोधले जाते. आता जी हुमणी आढळते ती माळरानाची हुमणी (होलाट्राकीया) असे नामकरण आम्ही केले आहे. आम्ही नवीन हुमणीची जात शोधून काढली आहे. त्यामध्ये भुंगे होलोट्राकिया पेक्षा लहान आहेत आणि नर भुंग्याला गेंड्यासारखे शिंग आहे. सर्वेक्षणामध्ये होलोट्राकीया ७० टक्के आणि नवीन हुमणी (फायलोग्यथस डायोनासिस) ३० टक्के असे हुमणीचे प्रमाण वारणा कारखान्याच्या परिसरात आढळून आले आहे. या हुमणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भात, भुईमूग आणि उभा उसाचे पिकामध्ये नुकसान झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात ४० हजार एकरवर प्रादुर्भाव
सोलापूर जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार एकर इतके ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात जवळपास ४० हजार एकर क्षेत्राला हुमणीचा फटका बसला आहे. पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, करमाळा या ऊस पट्ट्यातच त्याचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याची अडचण झाली असाताना, त्यात आता हुमणीमुळे शेतकऱ्यांना हैरान केले आहे. मुळासकट ऊस हुमणीमुळे पोखरला जात असल्याने उत्पादनात मोठी घट येणार आहे. एकीकडे ऊस दराबाबत अजूनही काहीच ठरत नसताना, त्या आधीच आता हुमणीमुळे नवेच संकट उभे ठाकले आहे.

मराठवाड्यतही प्रादुर्भाव
दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत हुमनीच्या प्रादुर्भावानेही जवळपास १७ हजार ४३७ हेक्‍टरवरील ऊस उलथवून टाकण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्यात हुमनीच्या प्रादूर्भावाची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातही १० टक्‍क्यांपर्यंत हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे.

नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरला फटका
नगर जिल्ह्यामध्ये सुमारे ३५ हजार ३०७ हेक्‍टर क्षेत्राला बाधा झाली असल्याचा प्रशासकीय अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात पन्नास हजार हेक्‍टर क्षेत्राला हुमणीने घेरले असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आणि उसाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदा हा जिल्हा उसावरील हुमणीच्या गंभीर हल्ल्याने हतबल झाला आहे. प्रतिकूल हवामान, सतत ढगाळ वातावरण, पाण्याचा अति वापर अशा कारणांमुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. हुमणीने उसाची पांढरी मुळे खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उसाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला फटका बसेल, असे शेतकरी सांगत आहेत.

साताऱ्यात अडीच हजार हेक्टरवर कीड
सातारा जिल्ह्यात विविध पिकांना हुमणीचा विळखा बळल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील २४५५ हेक्टर क्षेत्राला प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. उसासह इतर पिकांस हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे. 

पाथरी तालुक्यातील उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कीटकशास्त्राज्ञांच्या पथकाने प्रादुर्भावग्रस्त उसाची पाहणी केली असून, नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगिल्या जात आहेत.
- डाॅ. पी. आर. झंवर, कीटकशास्त्र, विभागप्रमुख, वनामकृवि, परभणी

पुणे विभागात जास्त प्रादुर्भाव
कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा जवळपास १४ लाख हेक्टरवर ऊस पीक आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, नगर, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साधारणतः सहा लाख हेक्टरवर ऊस आहे. त्यापैकी ४० टक्के क्षेत्रात, म्हणजेच अडीच लाख हेक्टरवरील उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर उर्वरित राज्यतील आठ लाख हेक्टरपैकी सुमारे दीड लाख हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. अगदी आठ ते दहा फूट उंचीच्या ऊस हुमनीमुळे वाळत आहे. आडसाली ऊस लागणीसही प्रादुर्भाव झाल्याने वाढीवरही परिणाम झाला आहे. 

हुमणीचा जून ते ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. नोव्हेंबर ते मे या कालावधीत हुमणी कोशाच्या अवस्थेत जात असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र, चालू वर्षी कमी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला. परंतु हुमणीचा प्रादुर्भाव सार्वत्रिक नसून, परिसरानुसार आहे. नगर, पुणे, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि नागपूर भागांत ३० ते ७० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला आहे. 
- डॉ. दादासाहेब पोखरकर, विभागप्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com