घरपोच चारा विक्रीतून मिळविले कोट्यवधींचे उत्पन्न  

विनोद इंगोले
सोमवार, 17 जून 2019

चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. 

चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. 

नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे सहा हजार लोकसंख्येचे गाव. पूर्वी गाव केळी, नंतर हळद लागवडीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. पुढे भातशेतीसोबत मिरची, वांगी, चवळी यांसारख्या भाजीपाला पिकांचाही पर्याय शेतकऱ्यांनी निवडला होता. मात्र उत्पादन खर्च वाढत गेल्याने या पीक पद्धतीतून फारसे काही हाती लागत नसल्याचे अनेकांना जाणवत होते. याच गावातील डॉ. उल्हास निमकर यांनी १९७९ मध्ये एमव्हीएससी केल्यानंतर सात वर्षे पशुवैद्यक म्हणून काम केले. पुढे एका विमा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकपदी निवड झाली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गावाच्या आर्थिक विकासासाठी काम सुरू केले. या ध्येयाने झपाटलेल्या डॉ. निमकर यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. सरतेशेवटी त्यांचा शोध चारा पिकावर येऊन थांबला. 

...अशी केली तयारी 

दुधाची खरेदी कमी अधिक प्रमाणात दैनंदिन केली जाते. बहुतांश शहरांमध्ये ही दुधाची गरज परिसरातील ग्रामीण भागातून भागवली जाते. पहाटे सहा वाजता दुधाचा रतीब डेअरीवर पोचविणाऱ्या दुग्धोत्पादकांची भेट घेत, अडचणींची चर्चा केली. चाऱ्याची नियमित उपलब्धता ही मोठी समस्या होती. त्यांच्यासमोर गावपोच चाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली. त्याला दुग्धोत्पादकांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर परस्परांच्या सोयीने पद्धती ठरवली. कोणता चारा किती प्रमाणात याचे गणित बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

 झांशी, हैदराबाद येथील चारा संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी बोलून पोषक व अधिक उत्पादनक्षम चारा वाणांची माहिती घेतली. त्यांनी शिफारस केलेल्या हायब्रीड नेपियरच्या डी.एच.एन.-१० या प्रजातीची निवड केली. हे बहुवार्षिक असून, दर दीड ते दोन महिन्यांनी कापणीस येते. प्रति वर्ष पाच कापण्या मिळतात. एकरी दीडशे ते दोनशे टन प्रति वर्ष चारा मिळतो. 

 आर्वी येथे पशुसंवर्धन विभागाने डॉ. सतीश राजू, डॉ. अनिरुद्ध पाठक यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या चारा बागेला (फॉडर कॅफेटेरिया) भेट दिली.

लागवडीपूर्वी खरेदीदारांसोबत बैठक 
चारा लागवडीपूर्वी शेतकरी व खरेदीदार यांची संयुक्‍त बैठक नागपुरात घेण्यात आली. त्या वेळी ४५ शेतकऱ्यांनी चारा लागवडीस सहमती दर्शविली. दुग्धोत्पादक आणि चारा खरेदीदार यांना घरपोच चारा पोचविण्याची योजना मांडली गेली. वीस किलोच्या बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याची कुटी पाठविण्याचे नियोजन होते. ही कुट्टी फ्रेश राहील, असा विश्‍वास खरेदीदारांना दिला गेला. सहायक पशुधन आयुक्‍त डॉ. जगदीश कुरळकर यांनीही सेवानिवृत्तीनंतर या प्रकल्पात योगदान दिले आहे. 

जबाबदारीचे केले विभाजन 
चारा लागवड असलेल्या या गावात चारा शेती व्यवस्थापन, कापणी आणि पुरवठा, तसेच मार्केटिंग या कामांसाठी तीन व्यवस्थापन गट तयार केले. प्रत्येक गटामध्ये १२ ते १७ सदस्यांचा समावेश असून, त्याचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे बंडूजी कोहदरे, अर्जून डहारे आणि डॉ. उल्हास निमकर हे काम पाहतात. एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे जबाबदारीचे विभाजन केले गेले. या चारा उत्पादकांचा ‘वैज्ञानिक सहकारी शेती विकास अरोली संघ’ (विश्वास) ही स्थापन केला. ‘आत्मा’अंतर्गत या शेतकरी गटाची नोंदणी केली आहे. शेतकरी कंपनीत याचे रूपांतर करण्याचे नियोजन आहे. गटामध्ये कार्य करणारे विविध पदाधिकारी व शेतकरी सर्वश्री बंडू पोहदरे, अर्जुन डहारे, सदानंद निमकर, सुनील अडघुळकर, लिलाधर उमप, प्रकाश आपतुरे, प्रशांत भुरे, शैलेश निमकर, अरविंद कडबे, सौ माहतलत शेख, सुरेश होले असे असून, गटाचे प्रवर्तक म्हणून डॉ. निमकर काम पाहतात.

...आणि झाली सुरवात 
जुलै २०१७ मध्ये ओडिशा राज्यातील संबलपूर येथून चारा बेण्याची खरेदी केली. मात्र हे पाच लाख ५० हजार बेणे खराब निघाले. न डगमगता पुन्हा पुरवठादाराशी चर्चा केल्यानंतर उरळी कांचन येथील प्रकल्पातून बेणे खरेदीचा निर्णय झाला. प्रति बेणे एक रुपये प्रमाणे पाच लाख ५० हजार बेण्याची नव्याने खरेदी झाली. २५ हजार रु. वाहतूक खर्च आला. ५५ एकरांवर सामूहिकपणे याची लागवड केली. लागवडीनंतर पहिली कापणी ३० ऑक्‍टोबर २०१७ रोजी केली. पहिल्या टप्प्यात सात टन चाऱ्याचा पुरवठा केला. त्यानंतर मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालत प्रति दिन १० ते १२ टन चाऱ्याचा पुरवठा केला जातो. 

कापणी, कुट्टी व वाहतूक व्यवस्था 
शेतकऱ्याच्या शेतातून कुशल मजुरांच्या साह्याने कापणी केली जाते. त्यानंतर चाफ कटरवर त्याची कुट्टी केली जाते. पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून हे चाफ कटर खरेदी केले आहे. आता ४५ पैकी ३६ शेतकऱ्यांकडे चाफ कटर असून, त्यासाठी प्रत्येकी आठ हजार रुपयाचे अनुदान मिळाले. धांडा कापणीनंतर त्याची कुट्टी करून नंतर ते वजनाअंती २० किलोच्या पॅकिंगमध्ये भरले जातात. प्रत्येक पोत्यावर संबंधित शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी लावलेली असते; त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा होणार हे त्वरित लक्षात येते.  

बेणे विक्रीतून मिळाले ७५ लाख रुपये  
गेल्या वर्षीच्या दुष्काळात राज्यात चारा बेण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अमरावती, चंद्रपूर, जालना, नागपूर, बुलडाणा या जिल्ह्यांतून चारा बेण्याची मागणी होती. चारा उत्पादक अरोली या गावाविषयी माहिती समजल्यानंतर अनेकांनी गावात येऊन चारा बेण्याची मागणी नोंदविली. त्या वर्षी प्रति बेणे एक रुपये प्रमाणे  बेण्याची विक्री करण्यात आली. यातून गटातील शेतकऱ्यांना ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

...असा आहे ताळेबंद 
नागपूर परिसरातील पशुपालकांना सध्या अरोलीतील चाऱ्याचा पुरवठा होतो. रोज सुमारे १० ते १२ टन चारा पुरविला जातो. या माध्यमातून गावात रोज ५० हजार रुपयांचे उत्पन्न होते. चारा विक्रीनंतर पुरवठादाराकडून संस्थेला पैसे पोचते होतात. दर महिन्याला हिशेब केल्यानंतर चारा उत्पादकांच्या थेट खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी संपूर्णपणे पारदर्शी व्यवस्था उभी केली आहे. २०१८-१९ या वर्षात पावणेदोन कोटींची उलाढाल या माध्यमातून झाली. २०१९-२० या वर्षात तीन कोटी रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठण्याचा मानस संस्थेचा आहे. 

- ४५ शेतकऱ्यांच्या ५५ एकर चारा लागवडीपासून झालेली सुरवात आता ७५ एकरांपर्यंत पोचली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत १०० एकरांवर पोचेल, असे डॉ. निमकर यांनी सांगितले. 

-किमान अर्धा एकर ते कमाल तीन एकरांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांची लागवड आहे. स्वतः निमकरांची दीड एकर चारा लागवड आहे. शेतकऱ्यांना एकरी एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. 

-संस्थेकडून चारा कापणीसाठी नेमलेल्या मजुरांची मजुरी संस्था देते, तसेच वाहतुकीचा खर्चही संस्थेकडून केला जातो. हिशेबामध्ये महिनाअखेरीला हा खर्च शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून वजा केला जातो. राधेशाम मेहर हा अपंग असतानाही मजूर म्हणून या प्रकल्पात सहभागी आहे. गावकुसातील १२ मजुरांना या माध्यमातून वर्षभर रोजगार मिळाला आहे. त्यासोबतच मालवाहू वाहन खरेदी केलेल्या गावातील चार युवकांनाही चारा वाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

...असे आहेत दर 
हिरवा धांडा - तीन रुपये किलो 
कुट्टी - साडेतीन रुपये किलो 
वाहतूक खर्च (वेगळा) - अंतरानुसार तो कमी जास्त होतो. 

शेतकरी सांगतात... 
माझी केवळ दीड एकर 
शेती आहे. त्यातील एक 
एकरावर चारा लागवड 
करण्याचा निर्णय मला केवळ गटशेतीमुळे घेता आला. एका वर्षात साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न चाऱ्यातून मिळाले. माझी पत्नी आणि मी चारा शेतीत राबतो. पारंपरिक पिकातून इतके उत्पन्न शक्‍य झाले नसते, असे रामदास डहारे हे अल्पभूधारक शेतकरी आत्मविश्‍वासाने सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income earned from the sale of fodder