पशुपालन, दूध प्रक्रियेतून वाढविला नफा

buffalo
buffalo

शिरसोली (जि. जळगाव) - येथील डिगंबर रामकृष्ण बारी यांनी चार एकर शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. याचबरोबरीने गावामध्ये दूध संकलन आणि विक्री केंद्र सुरू केले आहे. संपूर्ण कुटुंब शेती आणि पशूपालनात कार्यरत आहे. त्यामुळे शेती आणि पशुपालन व्यवसाय किफायतशीर झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरसोली(ता.जि.जळगाव) हे गाव जळगाव शहरापासून जवळ आहे. फुलशेती, पानमळा आणि भाजीपाला शेतीसाठी शिरसोली प्रसिद्ध आहे. या गाव शिवारात डिगंबर बारी यांची चार एकर मध्यम प्रकारची शेती आणि वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय आहे. पूर्वी त्यांच्याकडे ३२ म्हशी होत्या. तीन बंधू मिळून हा व्यवसाय सांभाळत होते. म्हशीच्या दुधासह दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांची मागणी अधिक असल्यामुळे म्हशींच्या संगोपनाकडे त्यांच्या सुरवातीपासून कल आहे. बारी पूर्वी गुलाब आणि पानमळ्याची शेती करायचे. गुलाब शेतीचा त्यांना चांगला अनुभव आहे. मध्यंतरी कुटुंब विभक्त झाले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून चार एकर शेतीसह सहा म्हशी, एक गायीचे संगोपन  बारी करीत आहेत.

डिगंबर बारी यांची चार एकर शेती आहे. त्यामध्ये कापूस व संकरित गवताची लागवड आहे. शेतामध्ये गोठा व चारा साठवणुकीची सोय केली आहे. सध्या बारी यांची मुले सागर व भूषण हे शिक्षण घेत आहेत. परंतु सुट्टीचा दिवस किंवा रिकाम्या वेळात ते डेअरी, दूध संकलन, गोठ्यातील व्यवस्थापन सांभाळतात. बारी कुटुंबाचा दिवस पहाटे साडेचारपासून सुरू होते. डिगंबर आणि त्यांचा मुलगा भूषण हे दूध काढणीचे काम करतात. त्यानंतर गोठा आणि जनावरांची स्वच्छता, हिरव्या चाऱ्याची कुट्टी तयार करणे, गाई,म्हशींना चारा देणे ही कामे केली जातात. रात्री ९ वाजेपर्यंत बारी कुटुंबीय पशूपालनात व्यस्त असते.

जातिवंत म्हशींचे संगोपन 
बारी यांच्याकडे  सहा जाफराबादी म्हशी आणि एक जर्सी गाय आहे. म्हैस प्रति दिन १२ लिटर आणि गाय ८ लिटर दूध देते. दररोज दोन्ही वेळचे ५५ लिटर दूध संकलन होते. याचबरोबरीने बारी दररोज गावातील शेतकऱ्यांकडून २०० लिटर दुधाची खरेदी करतात. संकलित दुधाची गाव तसेच जळगाव शहरातील एका डेअरीमध्ये विक्री केली जाते. गायीचे दररोज १५ लिटर दूध संकलन होते. उर्वरित म्हशीचे दूध संकलन आहे. म्हशीच्या दुधास फॅटनुसार ४७ ते ४८ रुपये प्रति लिटर दर दिला जातो. पशुपालकांना बारी पशुखाद्याचा पुरवठा करतात. बारी यांनी तीन वर्षांपूर्वी दूध संकलन आणि विक्रीसाठी गावातील मुख्य बाजारपेठेत हरे कृष्णा दुग्धालय सुरू केले. या केंद्रात सकाळी दूध संकलन व विक्री केली जाते. 

शेतीचे नियोजन -
अलीकडे शेती कामासाठी मजुरांची समस्या अधिक आहे. शिवाय वेळही अधिक द्यावा लागतो. बारी कुटुंबीयांनी दूध व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे शेतीला वेळ कमी मिळतो. त्यामुळे बारी यांनी एका गरजवंत शेतकऱ्याला निम्या हिश्याने शेती कसायला दिली आहे. ठिबकवर जूनमध्ये कापसाची लागवड केली जाते. नंतर चाऱ्यासाठी डिसेंबरमध्ये क्षेत्र रिकामे करून त्यामध्ये मका किंवा दादर ज्वारीची पेरणी केली जाते. यामध्ये कापूस, मका पिकासाठी लागणारी सर्व मजुरी, मेहनत म्हणजेच आंतरमशागत, तणनियंत्रण, वेचणी, कापणीचा खर्च हिस्सेदार शेतकरी करतो. बारी यांना फक्त बियाणे, कीडनाशके आणि रासायनिक खते यातील निम्मा खर्च द्यावा लागतो. पशूपालनामुळे शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते. 

त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढीला फायदा होतो.हिस्सेदार शेतकरी कष्टी, जिद्दी असल्याने कापसाचे एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळते. गेले दोन वर्षे कापसाला सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर जागेवरच मिळाला आहे.

यातही बऱ्यापैकी नफा बारी आणि करणाऱ्या शेतकऱ्याला मिळतो. शिवाय शेतीमधून चाराही उपलब्ध होतो. संरक्षित बाब म्हणून दादर ज्वारी, मका कडबा खरेदी करतात. त्यासाठी दरवर्षी ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. कुट्टी करून हा सुक्का चारा शेतातील गोदामात साठविला जातो.गरजेनुसार वर्षभर पुरवून वापरला जातो.

प्रक्रिया उत्पादनांची विक्री -
डिगंबर यांची पत्नी सौ.लता या देखील दुग्धव्यवसायात मदत करतात. त्यांच्याकडे दूध प्रक्रियेची जबाबदारी आहे.बारी कुटुंबीय दूध विक्रीच्याबरोबरीने दही, ताक, तूप व पनीर निर्मिती करतात. यासाठी क्रीम सेप्रेटर, डीप फ्रीजर व इतर यंत्रणा उपलब्ध आहे. ग्राहकांची मागणी आणि ऋतुनुसार तूप, दही, ताक व पनीरची निर्मिती केली जाते.  हिवाळा व उन्हाळ्यात दुधाची प्रति दिन २५० लिटर दुधाची ५५ रुपये प्रती लिटर दराने विक्री आहे. शिरसोली गाव परिसर वर्षागणिक विस्तारत आहे. त्यामुळे काही ग्राहकांना बारी पिशवीबंद दुधाचा पुरवठा करतात. गावामध्ये रोज १०० लिटर दुधाची घरपोच विक्री केली जाते. जळगाव शहरातील एका खासगी डेअरीला दररोज मागणीनुसार १५० ते १७५ लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. दर महिन्याला सरासरी ५०० लिटर ताक २५ रुपये प्रति लिटर दराने विकले जाते.

दर महिन्याला १५  किलो पनीरची प्रति किलो ३८० रुपये आणि ३०० किलो दही विक्री १०० रुपये प्रति किलो दराने होते. दर महिन्याला सरासरी १० किलो तुपाची प्रति किलो ६०० रुपये दराने विक्री केली जाते. बारी कुटुंबीय दर महिन्याला खर्च व किरकोळ मजुरी वगळता २२ हजार रुपये सरासरी नफा मिळवितात.

- डिगंबर बारी,  ९४२१४०४४१७

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com