तुम्हाला माहित आहे का? 'या' देशात सुर्यफुलाच्या बिया भाजून खाल्या जातात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

सुर्यफुल ही अमेरिका खंडातील एक बारमाही वनस्पती आहे. याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव देण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांच्या मुळ पिकांतील सुर्यफुल हे एक प्रमुख पिक आहे. यापासून प्रामुख्याने खाण्याचे तेल तयार केले जाते. जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल आहे. या सुर्यफुलाबद्दल एवढीच माहिती अनेकांना असते. परंतु, आज आपण या सुर्यफुलाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. सुर्यफुल ही अमेरिका खंडातील एक बारमाही वनस्पती आहे. याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. 

सुर्यफुलाकडे गळिताचे आणि चाऱ्याचे पीक म्हणून शेतकरी पाहतात. भारत, रशिया आणि ईजिप्त या देशांमध्ये तेलबियांसाठी याची लागवड केली जाते. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी कमी प्रमाणात याची लागवड करण्यात येते. सुर्यफुलापासून मुरघास किंवा ओला चाराही तयार केला जातो. 

 मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, सूर्यफूल या वर्षायू वनस्पतीची पेरणी पावसाळ्याच्या आरंभी केली जाते. फुलोरे पावसाळ्याच्या शेवटी आणि थंडीत येतात. सुर्यफुलाची उंची १–३ मी एवढी असते. तसेच खोड बळकट, जाड आणि खरबरीत असते. पाने खाली समोरासमोर आणि वर एकाआड एक, लांब देठाची, केसाळ, मोठी, १०–१२ सेंमी. लांब, हृदयाकृती, करवती आणि लांब टोकाची असतात. जुलै–सप्टेंबरमध्ये शेंड्याकडे पिवळे शोभिवंत तबकासारखे फुलोरे येतात. त्यांचा व्यास १०–१५ सेंमी. असते. किरणपुष्पे पिवळी, वंध्य व जिव्हाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी आणि नलिकाकृती असतात.  
 

सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५–५० टक्के असल्यामुळे थोड्या क्षेत्रात आणि कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे. हे पीक कमी मुदतीचे म्हणजेच ७०–८० दिवसांचे असते. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.

तिन्ही हंगामात येणारे पिक

सूर्यफुलाचे पीक हे तिन्ही हंगामात येते. त्यामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. या पिकाची लागवड हलकी, मध्यम आणि भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.   

सुर्यफुलाचे मूळ ६० सेंमी. पर्यंत खोलवर जात जाते. त्यामुळे २०–३० सेंमी. खोलीवर पहिली नांगरट करावी आणि दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

बियाणे कोणते वापरावे

चांगल्या जातीचे सुधारित प्रतिहेक्टरी १०–१२ किग्रॅ. बियाणे वापरतात. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यानंतर ४५–५० दिवस सुप्तावस्थेत असते, त्यामुळे पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरले जाते.

पेरणी 

बियांच्या लवकर उगवणीसाठी पेरणीपूर्वी बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवले जाते. बियाण्यास २-३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली जाते. सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या अंतरावर पेरणीयंत्राच्या सहाय्याने करतात. टोकण पद्धतीनेही सूर्यफूल पेरता येते आणि बियाण्याची बचत होते. सूर्यफूल ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

या खतांचा वापर करावा
 सुर्यफुल हे पीक रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे प्रतिहेक्टरी ५० किग्रॅ. नायट्रोजन आणि २५ किग्रॅ. फॉस्फरस देतात. बोरॉनाचा (०·५ %) फवारा दिला असता दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.

मशागतीसाठी योग्य कालावधी 

पेरणीनंतर १०–१२ दिवसांनी दोन वेळा विरळणी केली जाते. पीक वीस दिवसांचे असताना पहिली आणि ३५– ४० दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करतात. पाण्याची सोय असल्यास फुले धरण्याच्या वेळी, पीक फुलोऱ्यावर येण्याच्या वेळी व बियांची वाढ होण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास दाणे चांगले भरतात व उत्पादनामध्ये वाढ होते.

सूर्यफूल स्वपराग सिंचित नसल्यामुळे व शेतात जास्त प्रमाणात मधमाश्या नसल्यास पेरणीनंतर ५०–६० दिवसांनी शेतातील फुलांवरुन मलमली कपड्याने हात फिरविल्यास किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर घासल्यास दाणे चांगले भरतात आणि उत्पादनात २५ टक्के वाढ होते. 

पीक संरक्षण
सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. या जैविक कोडनाशकाची फवारणी करावी. सूर्यफुलावर मुख्यत्वेकरुन तांबेरा, कडका व पानावरील टिक्का या रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

मळणी पद्धत

सूर्यफूल मळणीकरिता मळणी यंत्र विकसित करण्याचे प्रयत्न भारतात लुधियाना, भोपाळ आणि कोईतूर येथील संशोधन संस्थांत सुरु आहेत. मळणी यंत्र राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या कृषी अभियांत्रिकी संशोधन केंद्राने विकसित केले असून. ‘फुले’ सूर्यफूल मळणी यंत्र नावीन्यपूर्ण असे आहे. कारण या मळणी यंत्रात इतर यंत्रांप्रमाणे ड्रम, कॉनकेव्ह चाळण्या, विद्युत् चलित्र वगैरे भाग अजिबात नाहीत. या यंत्राने मळणी केल्यास फुलापासून दाणे वेगळे होतात. परंतु फूल भरडले जात नाही. दिवसभरात चार माणसे ६–७ क्विंटल सूर्यफुलाची मळणी करु शकतात. 

अंग-मालिशसाठी तेलाचा वापर
सूर्यफुलाचा पूर्वीच्या काळी औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जात असे. अंग-मालिशसाठी तेल फार उपयुक्त आहे. गराचा उपयोग शरीराचा वाकलेला भाग सरळ करणे, पुळींवर लेप देण्यासाठी केला जातो. तेलाचा उपयोग रंग, रोगण (व्हार्निश), प्लॅस्टिक इ. बनविण्यासाठी होतो. सूर्यफुलाच्या खोडापासून रेशमासारखा तलम धागा मिळतो.  

सूर्यफूल या पिकापासून खाद्य तेल उत्पादन मिळतेच, शिवाय त्यापासून जनावरांना पेंडही मिळते. तेल पिवळसर व गोड असते. त्यापासून लोणीही बनवितात. टरफलापासून पेक्टीन, अल्कोहॉल, फुरफुरॉल इ. रसायने व इंधनेही तयार करता येतात. विशेषतः रशियात मोठ्या आकाराच्या बिया भाजून मीठ लावून खाल्या जातात. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: information of sunflower in marathi