फळबाग, पूरक व्यवसायातून  उभारले एकात्मिक शेतीचे मॉडेल

palkar
palkar

सातगाव म्हसला या ठिकाणी औचितराव पालकर यांनी आंब्याची सघन पद्धतीने लागवड करीत बाग उभी केली आहे. विदर्भात आंब्यांच्या बागा फारशा नाहीत. परंतु पालकर यांनी मेहनतीने ही बाग उभी केली आणि त्यातून चांगली मिळकतही येत आहे. शेतीत नावीन्यपूर्ण बाबींचा अवलंब करीत त्यांनी सात एकर शेतीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन चालविले आहे. या कामात त्यांना दोन मुले मदत करीत आहेत. मित्राच्या मदतीने ही बाग उभी केल्याचे ते सांगतात.

बुलडाणा जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, रब्बीत हरभरा, गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. बुलडाणा शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सातगाव म्हसला हे गाव आहे. गावातील औचितराव पालकर प्रयोगशील शेतकरी आहेत. आपल्या वडिलोपार्जित सात एकरांत पारंपरिक पिकांच्या सोबतीला फळबाग, हंगामी पिकांवर त्यांनी जोर दिला. यातून नफ्याच्या शेतीचे गणित जुळून आले. आई, पत्नी आणि मुलगा संदीप व दीपक व औचीतराव असे हे कुटुंब आहे. संदीपने पशुवैद्यकीय विषयातील पदविका घेतली आहे. तर दीपक अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत आहे. दोन्ही मुले आपापले करिअर सांभाळून शेतीत मदत करतात.

मित्राच्या सल्ल्‍याने उभारली आंब्याची बाग  
पालकर पूर्वी पारंपारिक शेती करायचे. सन २०१४ मध्ये त्यांनी नगर जिल्ह्यातील मित्राच्या सल्ल्याने सव्वा एकरात आंबा पिकाची अति घनता पद्धतीने लागवड केली. १० बाय ६ फूट अंतरावर आंब्याच्या कोयी लावल्या. त्यानंतर त्यावर कलमे बांधली. सुमारे ७८५ झाडांची बाग उभी केली. यात केशर, बदाम, दशहरी या वाणांचा समावेश आहे. बागेत बहुतांश केशरची झाडे आहेत. सन २०१७ पासून आंब्याचे उत्पादन सुरू झाले आहे.

स्वतःच करतात विक्री
आंबा बाग उभी करतानाच स्वतःच विपणन व विक्री करण्याचे पालकर यांनी ठरविले होते. त्यामुळे गेल्या दोन बहराची फळे त्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवली. त्‍याचा प्रचार केला. बुलडाण्यातील नोकरदार ग्राहक तयार केला. बागेतील अन्य फळे मे-जूनमध्ये विक्रीस येतात. तोपर्यंत नियमित आंबे मोठ्या प्रमाणात विक्री झालेले असतात. याकाळात आंब्याला मागणी राहते. मागील हंगामात पाच टनांपेक्षा अधिक आंबा थेट ग्राहकांना विक्री केल्याचे व यातून चांगले उत्पन्न मिळाल्याचे पालकर यांनी सांगितले. गेल्यावर्षी १०० ते १५० रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. गेल्या तीन वर्षांतील एकूण उत्पादनक्षम झाडांपासून उत्पन्न गृहित धरल्यास ते २.१ टनांपासून ते ६.२ ते साडेसात टनांपर्यंत पोचले आहे. त्यातून सुमारे दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

जिद्दीने उभी केली आंबा बाग
विदर्भात आता फारशा आंबा बागा दिसत नाहीत. पालकर यांनी लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनाही आपल्याकडे अनुकूल वातावरण नाही. बागेत समस्या उद्भवतील असे सल्ले मिळाले. परंतु वडिलांनी जिद्दीने २० ते २२ झाडांची लागवड केली. ती चांगली वाढली आहेत. 

हाच आदर्श औचितरावांनी पुढे चालवला. त्यातूनच सघन पद्धतीने सव्वा एकरात आंबा बाग उभी राहिली. यातून चांगले उत्पन्न चांगले मिळत आहे. सुरुवातीला अनुभव नसल्याने झाडांवर सर्वच फळे ठेवली जायची. त्यामुळे फळांचा आकार कमी व्हायचा. यंदा नियोजन करून त्यांची संख्या सुयोग्य ठेवली आहे. त्यामुळे आकार एकसमान झाला आहे. बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आहे.  
 :  औचितराव पालकर, ८९७५८०३८६०

पालकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
पारंपरिक अंतर न घेता सघन पद्धतीचा वापर करून बाग फुलविली.
सर्व प्रकारची आंतरमशागत यांत्रिकीकरणाद्वारे. फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर. 
फळांच्या विपणनासाठी समाज माध्यमाचा वापर करून जाहिरात केली जाते
ग्राहकांची मागणी मोबाईलद्वारे घेण्यात येते.  आंबा पिकवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर
खरिपात सोयाबीनची चार एकरांत लागवड. एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन. 
रब्बीत हरभरा. त्याचे एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल दरम्यान उत्पादन. 
सध्या दीड एकरात शेवगा, त्यात आंतरपीक म्हणून गावरान वाल 
लसूण, कांदा यांचेही आंतरपीक 
गावरान कोंबड्यांचे पालन सुरु केले असून सध्या ८० कोंबड्या आहेत. अंडी तसेच कोंबडी विक्रीतून उत्पन्न मिळू लागले आहे. हा व्यवसाय टप्प्याटप्प्‍याने वाढवीत नेण्यात येणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com