सिंचन स्रोत बळकटीकरणासह पीकपद्धतीत केली सुधारणा

माणिक रासवे
बुधवार, 27 जून 2018

मांडाखळी (ता. जि. परभणी) येथील राऊत बंधूंनी दोन विहिरींचे फेरभरण आणि शेततळ्यांची निर्मिती केली. त्यातून संरक्षित सिंचनाची सोय केली. कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आल्यामुळे पीकपद्धतीत बदल केला. काटेकोर पाणी व्यवस्थापनातून वर्षभरात दहा ते १४ विविध पिके घेता येऊ लागली. त्यातच आंतरपीक पद्धती व बांधावरील शेतीतून शेतीतील जोखीम कमी केली.

मांडाखळी (ता. जि. परभणी) येथील राऊत बंधूंनी दोन विहिरींचे फेरभरण आणि शेततळ्यांची निर्मिती केली. त्यातून संरक्षित सिंचनाची सोय केली. कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आल्यामुळे पीकपद्धतीत बदल केला. काटेकोर पाणी व्यवस्थापनातून वर्षभरात दहा ते १४ विविध पिके घेता येऊ लागली. त्यातच आंतरपीक पद्धती व बांधावरील शेतीतून शेतीतील जोखीम कमी केली.

परभणी जिल्ह्यातील मांडखळी येथे पाच भावांच्या राऊत कुटुंबाची शेती आहे. पैकी चार भावांचे एकत्रित कुटूंब आहे. भानुदास स्वतंत्रपणे शेती करतात. ज्ञानोबा शिक्षक आहेत. बाळासाहेब आणि महादेव एकत्रित शेती सांभाळतात. रमेश गावात ‘इलेक्ट्रीशियन’ आहेत. मांडाखळी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मिळून चौदा एकर शेती आहे. त्यातील काही चुनखडी मिश्रित तर काही चोपण आहे. काही वर्षांपूर्वी सिंचनाची सुविधा नसल्याने वडिलांच्या (जनार्दन) कोरडवाहू क्षेत्रात कापूस, तूर, मूग आदी पिके घ्यावी लागत असत.

पारंपरिकतेकडून सुधारित शेतीकडे 
शेतीच्या विकासासाठी पाणी हे मोठे भांडवल आहे. त्यामुळे शेती सुधारित करताना विहिरीची सोय करायचे ठरविले. परंतु भांडवल नव्हते. सन १९९८ मध्ये सर्व भावांनी मिळून विहीर खोदली. 

सन २०१३ मध्ये कृषी विभागातर्फे अभ्यास सहलीला जाण्याचा महादेव यांना योग आला. त्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटीतून नव्या प्रयोगांची प्रेरणा मिळाली. कृषी सहाय्यक के. डी. शिंदे,  कृषी पर्यवेक्षक बी. एस. शिल्लार यांच्याकडून कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळत गेली. गावातील प्रा. किरण सोनटक्के यांचे नव्या प्रयोगांसाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांच्यासोबत अनेकदा पुणे जिल्ह्यातील शेती पाहण्याचा योग आला. सर्व अभ्यासातून महादेव यांनी आपली शेती विकसित करण्यास सुरवात केली कृषी विभागाच्या आत्मा विभागातर्फेही प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची माहिती मिळू लागली. 

सिंचनस्रो बळकट करण्याचा प्रयत्न
विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी नव्हते. त्यामुळे २०१५ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे उभारले.

तीन- चार एकरांतील वाहून जाणारे पाणी एका ठिकाणी संकलित होण्याची व्यवस्था केली. हे पाणी विहिरीत सोडले. पुनर्भरणामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली.

पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले. गेल्यावर्षी मुगाला खंड काळात तुषार संचाने पाणी दिल्यामुळे उत्पादन हाती आले. 

शिवारातील जमिनीची बांधबंधिस्ती करून पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावांमध्ये एकत्र केले. त्यातून फेरभरण केल्याने विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. 

शेततळ्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने विजेशिवाय सिंचन. ठिबकमुळे पाणीबचत.

हिशेबाच्या नोंदवह्या
सन २०१३-१४ पासून दैनंदिन खर्च, उत्पादन, वाढ, घट आदींच्या नोंदी ठेवण्यात येतात. दररोजच्या कामांचे नियोजन सकाळ-संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत केले जाते.

पीकपद्धती व शेती नियोजन वैशिष्ट्ये  
 शेततळ्याच्या शेजारी बांधावर शेवगा, वेलवर्गीय भाजीपाला. शेवग्यातून वर्षाला आठहजार ते कमाल १५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न 
 कापूस, तूर, कांदा, टोमॅटो, यंदा ऊस. रुंद वरंबा सरी पद्धतीने तीने एकर हळद लागवड, गहू आदी
 वर्षभरात सुमारे १० ते १४ पिके. हवामान व बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकांची निवड 
 सीताफळाच्या नव्या बागेत टोमॅटोचे आंतरपीक. उसात पालक, चुका, कोशिंबीर
 कडेने एरंडी. आंतरपिकांमुळे बोनस उत्पन्न मिळते. शिवाय मुख्य पिकाचा खर्च निघतो. 
 बांधावरील रामफळ, आंबा, लिंबू, शेवगा, एरंडी, जांभूळ, आवळा, पेरू या फळझाडांपासून अतिरिक्त उत्पन्न
 आंतरमशागतीसाठी हात कोळप्याचा वापर. यामुळे खुरपणीच्या खर्चात बचत 

कमी खर्चाची कांदा चाळ...
 झोपडीवजा जागेत काठ्यांच्या आधारे लोखंडी जाळी लावून कांदा चाळ तयार केली आहे. तीन प्रकारची प्रतवारी करून पॅकिंग केले जाते. तीन टप्प्यांमध्ये तसेच परभणी येथील मार्केटमध्ये तसेच गावातील आठवडे बाजारात विक्री केली जाते. नैसर्गिकरित्या पिकविलेले रसाचे आंबे तसेच लोणच्याचे आंबे यासह भाजीपाल्याची घरूनही विक्री होते.
 राऊत बंधूंनी माती तसेच पाणी परिक्षण करून घेतले आहे. खतांच्या संतुलित मात्र देण्यावर भर असतो. 
 दरवर्षी घरच्या जनावरांपासून सुमारे ८ ते १२ ते गाड्या शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे.

पीक नियोजनासाठी बैठक
 दरवर्षीच्या नियोजनासाठी मे- जून कालावधीत राऊत बंधूंची बैठक होते. या वेळी खरीप, रब्बी, बागायती फळपिके यांचे नियोजन केले जाते. खर्चाचा अंदाज घेऊन रकमेची तरतूद केली जाते.

उत्पादन प्रातिनिधिक 
कपाशी- जमिनीच्या प्रकारानुसार- एकरी १५ ते २५ क्विंटलपर्यंत 
 तूर- कपाशीतील आंतरपीक - सात क्विंटलपर्यंत
  कांदा - यंदा पाऊण एकरांत ८० ते ९० क्विंटल, उसात आंतरपीक
  हळद - मागील वर्षी- सव्वा एकरात ३० क्विंटल 
 - महादेव राऊत, ८६९८२८११९९
- रमेश राऊत, ९७६३०३२६९२ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: irrigation source crop process Improvements