सोयाबीन खरेदीसाठी इस्लामपूर बाजार समितीचा आधार 

श्यामराव गावडे
शुक्रवार, 2 जून 2017

वाळवा तालुक्‍यात (जि. सांगली) सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीनच्या खरेदी-विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा आधार राहिला आहे. बाजार समितीचे अधिकृत २४ परवानाधारक खरेदीदार आहेत. गेल्या दोन हंगामात बाजार समितीने सुमारे साडेचार हजार ते पावणेसहा हजार टन सोयाबीनची खरेदी केली आहे.

वाळवा तालुक्‍यात (जि. सांगली) सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीनच्या खरेदी-विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा आधार राहिला आहे. बाजार समितीचे अधिकृत २४ परवानाधारक खरेदीदार आहेत. गेल्या दोन हंगामात बाजार समितीने सुमारे साडेचार हजार ते पावणेसहा हजार टन सोयाबीनची खरेदी केली आहे.

सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचा संपूर्ण परिसर उसासाठी प्रसिद्ध आहे. शहराची कृषी उत्पन्न बाजार समिती हे पूर्वी भुईमूग, ज्वारी, मका, उडीद यासह अन्य पिकांसाठी खरेदी विक्रीचे केंद्र होते. आता ते सोयाबीनचे मुख्य खरेदी केंद्र झाले आहे. तालुक्‍यात कृष्णा, वारणा नद्यांच्या पाण्यामुळे सिंचनात वाढ झाली. बागायती क्षेत्र हळूहळू वाढू लागले. ऊस साधारणतः १२ ते १८ महिने शेतात उभा असतो. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन उसात आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही घेतात. तांबेऱ्यासाठी दक्ष राहिले व एकूण व्यवस्थापन जमले तर हे पीक हमखास पदरात पडते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अलीकडे तांबेरा प्रतिबंधक सोयाबीन वाणही बाजारात आले आहे. तालुक्‍यात कृष्णा नदीकाठाच्या संपूर्ण पट्ट्यात सोयाबीन घेतले जाते. मळणी झाल्यावर थेट शेतातूनच बाजार समितीच्या खरेदी केंद्रांवर माल नेला जातो. ज्यांना त्वरीत पैशांची निकड नसते असे शेतकरी सोयाबीन घरी वाळवून ठेवतात. कारण हंगामात सुरुवातीला दर कमी राहतो. पुढे तो वाढण्याची शक्‍यता असते.

नजीकच्या जिल्ह्यांचीही पसंती 
चांगला दर मिळत असल्याने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्याच्या अन्य भागातील शेतकरीही सोयाबीन माल घेऊन खरेदी केंद्रांवर येतात. जवळच असलेल्या कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातूनही सोयाबीनची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. इस्लामपूर ‘एमआयडीसी’ क्षेत्रात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे खासगी युनिट आहे. त्याद्वारे सोयाबीन तेल, पेंड तयार करून त्याची विक्री केली जाते. या युनिटमार्फतही खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. 
 
बाजार समितीचा पुढाकार 
सोयाबीनची आधारभूत किंमत २०१५-१६ मध्ये क्विंटलला २६५० रुपये होती. त्यावेळी इस्लामपूर बाजार समितीने तीनहजार ते ३८०० रुपये दर दिला. त्यावेळी हवामान व नैसर्गिक कारणामुळे उत्पादन कमी येऊन आवक कमी झाली होती. साहजिकच दर चांगले मिळाले. पुढील वर्षी शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढवले. मॉन्सून चांगला राहिला. यावेळी दर मात्र २८०० ते तीन हजार रुपये राहिले. सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये आवक जास्त होते. बाजार समितीकडे अधिकृत २४ परवानाधारक खरेदीदार आहेत.  बाजार समितीचे या केंद्रांवर नियंत्रण असते. तालुक्यातील मुख्य किंवा जवळच्या गावात ही केंद्रे असल्याने शेतकऱ्याची मोठी सोय झाली आहे. खासगी युनिटची देखील अशी केंद्रे आहेत. 
या खरेदी केंद्रांना हंगामात बाजार समितीतर्फे भेटीही दिल्या जातात. शेतकऱ्यांना योग्य दर, पेमेंट मिळते आहे याची खात्री केली जाते. बाजार समिती शेकडा एक रूपया पाच पैसे या पद्धतीने सेस आकारते. त्यातून वर्षाला दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सन २०१५-१६ मध्ये बाजार समितीतर्फे ५८४० टन तर २०१६-१७ मध्ये ४७८० टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली. 

मिळणाऱ्या सुविधा 
बाजार समितीने ताकारी व इस्लामपूर येथे शेतकरी भवन उभारले आहे. पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहाची सुविधा दिली आहे. त्याचबरोबर पणन मंडळाच्या शिबिरांनादेखील शेतकऱ्यांना पाठवले  जाते.  

तालुक्यातील नवेखेड येथे गेल्या पाच-सहा वर्षांपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. नवेखेडसह जुनेखेड, पुणदी गावातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. बाजारपेठेतील चालू दरानुसार  शेतकऱ्यांना पेमेंट केले जाते.
- रवींद्र चव्हाण, परवानाधारक खरेदीदार, नवेखेड

वाळवा तालुक्‍यातील खरेदी केंद्रांवर बाजार समितीचे नियंत्रण असते. त्याद्वारे व्यवहारांवर देखरेख ठेवली जाते. 
- विजयकुमार जाधव सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर, ९९२२४९४९१४ 

कमी कालावधीत येणारे सोयाबीन हे नगदी पीक आहे. सुरवातीपासून चांगले नियोजन केल्यास हमखास चांगले उत्पादन मिळते.
- तात्यासाहेब नागावेस, सोयाबीन उत्पादक,  ८८०६०७२९४७

Web Title: Islampur Bazar Samiti Soybeans