esakal | यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

Rice sowing machine

पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यातील काही भागात पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी आहे. या अति पर्जन्यमानाच्या प्रदेशात भात (धान) खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यामधील भाताखालील क्षेत्र १,७५,४०३ हेक्टर असून, त्यातील सुमारे ९०ते ९५ टक्के क्षेत्रामध्ये पुनर्लागवड (रोवणी) पद्धतीने लागवड केली जाते.

यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्य

sakal_logo
By
वाय. आर. महल्ले,डॉ. एन. एस. वझिरे

पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यातील काही भागात पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी आहे. या अति पर्जन्यमानाच्या प्रदेशात भात (धान) खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यामधील भाताखालील क्षेत्र १,७५,४०३ हेक्टर असून, त्यातील सुमारे ९०ते ९५ टक्के क्षेत्रामध्ये पुनर्लागवड (रोवणी) पद्धतीने लागवड केली जाते. उर्वरित ५ ते १० टक्के क्षेत्र  हे पेरणी (आवत्या) पद्धतीने केले जाते. या आवत्या पद्धतीतून ३ ते ६ टक्के क्षेत्र हे फोकून तर २ ते ४ टक्के क्षेत्र हे पेरीव पद्धतीखाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोवणी पद्धतीमध्ये चिखलणी व रोवणी या मुख्य कामांसाठी एकूण भात उत्पादन खर्चाच्या २५ ते ३५ टक्के खर्च होतो. भाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक, पुनर्लागवड (रोवणी) करणे या सर्व कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.सध्या  मजुरांच्या वेळेवर उपलब्धतेची मोठी अडचण भासते. परिणामी रोवणीला उशीर होतो. यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पेरीव धान पद्धतीचा अवलंब करू शकतो. 

पेरणी योग्य पाऊस (साधारणतः ८० ते १०० मिमी) झाल्यानंतर दोन उभ्या आडव्या नांगरणी केल्यानंतर वापसा स्थितीत पेरणी करावी. त्यासाठी खालील यंत्रे उपयोगी ठरू शकतात. 

तिफण किंवा पेरणी यंत्र : 
नांगर व तिफणीद्वारे किंवा पेरणी यंत्राने ओळीत धान पेरणी करता येते. त्यासाठी हेक्टरी ७५-८० किलो बियाणे पुरेसे होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. यात दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. पेरणी २-४ सेंमी खोलीवर करावी.

राईस ग्रेन प्लँटर 
भात पेरणीकरिता लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला ११ दाते आहेत. दोन ओळीतील अंतर २५ ते ३० सेंमी तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सेंमी ठेवता येते. भाताची पेरणी २ ते ४ सेंमी खोलीवर करता येते. याची रचना पेरणी यंत्रासारखी असून, पेरणीसोबत खत देण्याचीही व्यवस्था आहे. यामुळे चिखलणी करणे, रोपवाटिका लावणे, रोपांची  वाहतूक, रोवणी इ. वेळखाऊ कामे करण्याची आवश्यकता राहत नाही. परिणामी खर्चात बचत होते. एक ते दीड तासात एक एकर पेरणी शक्य होते. 

पेरीव धान पद्धतीत पेरणी करताना घ्यावयाची काळजी
    पेरणी योग्य पाऊस ( साधारणतः ८० ते १०० मिमी) झाल्यानंतर वापसा परिस्थितीत यंत्राचा वापर करून पेरणी करावी.
    पेरणी २ ते ४ सेंमी खोलीपर्यंत करावी.
    पेरणीनंतर ४८ तासाच्या आत व जमिनीत ओलावा असताना तणनाशकाचा वापर करावा.

ड्रम सीडर 
आपत्कालीन पीक नियोजनात पेरणीसाठी याचा वापर करू शकतो. भात संशोधन संचालनालय, हैदराबाद यांनी विकसित केलेल्या या ड्रम सीडरद्वारे मोड आलेले बियाणे पेरता येते. त्याद्वारे दोन ओळीतील अंतर २० सेंमी तसेच दोन रोपातील अंतर ५-७ सेंमी ठेवले जाते. चिखलणी केलेल्या समांतर शेतात पेरता येते. या पद्धतीत मजुरांवरील खर्च कमी होतो. मात्र, या पद्धतीत भात पीक लागवडीस काही मर्यादा आहेत.
    जमीन चिखलणीसाठी आवश्यक पावसाची गरज असते. सपाट चिखलावर पेरणी करावी लागते.
    पेरणी करताना बांधीमध्ये चिखलावर पाणी भरलेले असू नये.
    पेरणीनंतर एक आठवडा २ -३ सेंमी पाणी बांधीत असणे आवश्यक आहे.
    भात बांधितील तण नियंत्रण वरचेवर करणे आवश्यक आहे. कधी कधी पक्ष्यांचा त्रास संभवतो.
    सध्याच्या परिस्थितीत एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर मिळणे शक्य होत नाही. मजुरांअभावी रोवणी लांबत जाते. हे टाळण्यासाठी भात पेरणी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होऊन अपेक्षित उत्पादन मिळते.

- वाय. आर. महल्ले, ८००७७७५६१३ (विषय विशेषज्ञ - कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा.)