द्राक्ष बागायतदाराने एकीच्या बळातून थेट विक्री व्यवस्थेचा रचला पाया 

dattatray-chavan
dattatray-chavan

जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील दत्तात्रय चव्हाण यांनी प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अशी पंचक्रोशीत ओळख तयार केली आहे. अवकाळी पावसाचे संकट झेलताना लॉकडाऊनचाही आघात त्यांना पचवावा लागला. आठ एकरांत १३०० ते १४०० क्विंटल उत्पादित द्राक्षविक्रीचे शिवधनुष्य कुटुंबातील सर्वांनी मिळून पेलले. परिसरातील गावे व शहरांमध्ये जाऊन थेट विक्री केली. जोडलेली माणसं उपयोगात आली. एकीच्या बळातून भविष्यातील विक्री व्यवस्थेचा पाया रचला गेला. 

जालना जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार असलेल्या कडवंची परिसरातील नंदापूर गावचे प्रगतिशील शेतकरी व सरपंच म्हणून दत्तात्रय भानुदास चव्हाण यांची ओळख आहे. शेतीत प्रयोगशीलता जपताना सतत शिकत राहण्याची त्यांची वृत्ती कुटुंबाला विविध संकटांचा धीरोदात्तपणे सामना करण्याची प्रेरणा देत असते. कडवंची गावातून द्राक्षाची वेल नंदापूर गावात रुजवण्यात चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे गावातील द्राक्ष उल्लेखनीय रित्या वाढले. 

निसर्गाचा पेलला आघात  
अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना कायमच करावा लागतो. 
यंदाही अवकाळी पावसामुळे जवळपास आठ एकर द्राक्ष बागेची नासाडी झाली. जवळपास चार एकरांतील द्राक्ष पीक लॉकडाऊनपूर्वी हाती आले. मात्र त्याला मिळालेले दर खर्च वसूल करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्व भिस्त उरलेल्या आठ एकरांतील द्राक्षावर अवलंबून होती. आणि नेमके तेच पीक कोरोना संकटात सापडले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


प्रयत्नवाद उपयोगास आला  
-लॉक डाऊनमुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी द्राक्षबागांकडे पाठ फिरविली. विक्रीची प्रचलित व्यवस्था कोलमडून पडली. अनेक द्राक्ष उत्पादकांनी मिळेल त्या दराला व्यापाऱ्यांना द्राक्षे देण्यास सुरुवात केली. 
गावातील गरजवंतांना कॅरीबॅगमधून डाळ, पीठ आदी साहित्याचे वाटप करत असताना सरपंच चव्हाण यांना याच कॅरिबॅगमधून द्राक्षे थेट विकण्याची कल्पना सुचली. मग कृतीसाठी डोक्यात चक्र सुरू झाले. 

-आपले मित्र, हितचिंतक, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क वाढवला. थेट विक्रीसाठी आपले  सहकार्य मिळाले तर मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करणे सुरू केले. तशी मदतही मिळू लागली. 

-फूड ग्रेडच्या बॅगेत अडीच ते तीन किलो द्राक्षे भरली. उत्कृष्ट चव आणि गुणवत्ता असलेले हे फॅमिली पॅक १०० रुपयांत थेट घरपोच मिळतील असा संदेश तयार केला. मोबाइलद्वारे सोशल माध्यमांचा वापर करत अनेकांपर्यंत पोचविला. त्यातून अनेकांनी संपर्क करून आपली मागणी नोंदवली. 
मग आपल्या वाहनात बॅग्ज भरून ग्राहकांपर्यंत पोचवण्यास सुरुवात केली. 

-थेट विक्रीची छायाचित्रेही व्हॉटस ॲप ग्रुपवर दिली. दिवसाला किमान ४ ते ५ टन या दराने वेळेत विक्री शक्य असल्याची खूणगाठ चव्हाण यांनी मनाशी बांधली. 

-जालना शहरातील आपल्या घरून थेट विक्रीचा प्रयत्न पंधरा ते वीस वर्षांपासून चव्हाण कुटुंबीय करीत होते. परंतु त्यास मर्यादा होती. हा अनुभवही लॉकडाऊन काळात कामी आला. 

कुटुंबाचे व इतरांचे बळ  
चव्हाण कुटुंबात सुमारे ३० सदस्य आहेत. पैकी २० सदस्यांनी द्राक्षविक्रीत सहभाग घेत  एकमेकांची जबाबदारी स्वीकारली. प्रयत्नांना यश दिले. विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल ५०० किलो विक्री झाली. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, मित्रमंडळ यांच्या संपर्कातून परिसरातील गावांमधील ग्राहक मिळाले. 

-पहिल्या दिवशी सुमारे एक टन द्राक्षे घेऊन निघालेली गाडी बंधू विजय यांच्या नेतृत्वात वाशीम जिल्ह्यात रवाना झाली. मिळालेला प्रतिसाद पाहून मग दोन  वाहनांतून जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर येथे पाठवणे सुरू केले. जालना, औरंगाबाद, सिल्लोड येथेही ग्राहकांची साखळी जोडली. 
औरंगाबाद येथे बंधू यशवंत व संजय यांनी ग्राहक जोडले. 

दरम्यान व्यापाऱ्यांनी देखील प्रति किलो १५ ते १८ रुपये दराने खरेदी करण्याची तयारी दाखवली. मात्र दत्तात्रय यांनी त्यास नकार दिला. प्रसंगी मनुके करण्याची तयारी ठेऊन थेट विक्रीचा मनोरथ कायम ठेवला. 

कुटुंबाचे अविश्रांत काम  
सुमारे महिनाभर कुटुंबातील लहान-थोर प्रत्येकाचा दिवस सकाळी सातला सुरू व्हायचा तो रात्री उशिरा संपायचा. काही तासच आराम करण्याची संधी मिळायची. पहाटे लवकर उठून विक्रीसाठी जाणाऱ्यांचे जेवणाचे डबे तयार करून देणे, सकाळी सातला द्राक्ष तोडणी, पॅकिंग यामध्ये कुटुंबातील सौ चंद्रकला दत्तात्रय चव्हाण, सौ सरिता विजय चव्हाण व सौ लता बद्रीनाथ चव्हाण यांनी विशेष भूमिका बजावली. 

कुटुंबातील आदित्य, पृथ्वीराज, वैष्णवी, अंजली व प्राजक्ता या मुलांना द्राक्षबॅगांचे वजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. प्रत्येकाला दररोज २५- बॅग्जचा लक्षांक देण्यात आला. 

विक्रीतून आलेल्या पैशाच्या मोजणीतही या मुलांनी सहभाग घेतल्याने कष्टाचे मोलही त्यांना कळण्यास मदत झाली. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले वडील भानुदासराव व आई शशिकला यांनीही प्रत्येक बॅगेला वायुवीजनासाठी आवश्यक छिद्रे पाडण्याचे काम केले. 

उत्पन्न व दर  
दरवर्षी एकरी सुमारे १६ ते १७ टन उत्पादन मिळते. एकूण प्रयत्नांमधून यंदा सुमारे १३०० ते १४०० क्विंटल विक्री झाली. पैकी १५ टन व्यापाऱ्यांना दिलेला माल वगळता उर्वरित सर्व थेट विक्री होती. 
व्यापाऱ्यांना ३० रुपये दराने तर थेट विक्रीसाठी ३२ ते ३३ रुपये सरासरी तर कमाल ४० रुपये दर मिळाला. प्रति बॅग सुमारे तीन रुपये खर्च आला. 

प्रतिक्रिया 
थेट द्राक्ष विक्रीच्या महिनाभराच्या प्रयत्नांतून केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही द्राक्षांना मागणी आहे ही बाबा अधोरेखित झाली. शिवाय प्रचलित व्यवस्थेशिवाय आपण योग्य नियोजनातून व वाजवी दरातून निश्चित विक्री व्यवस्था उभी करू शकतो ही खात्री आली. 

दत्तात्रय चव्हाण-९४२३७११४३१, ७२६४०७०७४१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com