दुष्काळात ठिबक वरील ज्वारीने दिला मोठा आधार

दुष्काळात ठिबक वरील ज्वारीने दिला मोठा आधार

ईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे. विहीर, बोअरची सुविधा आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे गेल्यावर्षी कौडगांव शिवारात जमीन घेतली. तेथे बोअर खोदून दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतातील जुन्या विहिरीत पाणी आणले. पूर्वी पाऊस चांगला पडायचा. विहिरीत भरपूर पाणी असायचे. पाऊस कमी झाल्यापासून ऊस घेणे बंद केले. सध्या खरीपात सोयाबीन, कापूस, तूर, रब्बीत ज्वारी, हरभरा, गहू तसेच मका, चारा पिके ही पीक पद्धती आहे.

चाऱ्याचे संकट  
एक बैलजोडी, १५ संकरीत गायी, लाल कंधारी, देवणी, गावरान गायी, गोऱ्हे पाच म्हशी, एक घोडी अशी सुमारे ५० जनावरे

रब्बी ज्वारीचा कडबा हा चाऱ्याचा प्रमुख घटक. यंदा दुष्काळामुळे १५ एकर जमीन रब्बीत नापेर

जमिनीत ओलावा व पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे यंदा ज्वारी घेणे अशक्य वाटत होते. तरीही वैरणीची तजवीज करणे आवश्यक होते. 

ठिबक सिंचनावर रब्बी ज्वारी 
दोन वर्षांपूर्वी रब्बीत एक एकरवर ठिबक सिंचन पध्दतीने गावरान ज्वारी घेतली होती. त्या वेळी १६ क्विंटल ज्वारी (धान्य) उत्पादनासह कडब्याचेही चांगले उत्पादन मिळाले. त्या अनुभवातून यंदा सात एकरांवर ठिबक पद्धतीने ज्वारी घेतली. यंदा सप्टेंबरमध्ये पाऊस उघडला तो परत आलाच नाही. सोयाबीन काढणीनंतर ओलाव्याच्या पाच एकरांत ज्वारीची पेरणी केली. एकवेळ तुषार संचाने पाणी दिले. सोयाबीनच्या आणखी चार एकर शिल्लक क्षेत्रात डिसेंबरमध्ये ठिबक पद्धतीने ज्वारी घेण्याचे निश्चित केले.

लागवडीचे नियोजन 
प्रत्येकी चार फूट अंतरावर ठिबकच्या नळ्या अंथरल्या. लॅटरल लाईनला प्रत्येक दीड फूट अंतरावर आउटलेट ठेवले. एकवेळ पाणी देऊन जमीन ओलावून घेतली. त्यानंतर एक फूट अंतर ठेवून लॅटरलच्या दोन्ही बाजूंनी आउटलेटच्या चारही बाजूंनी गावरान ज्वारीची (स्थानिक नाव दगडी किंवा डुकरी) टोकण केली. त्यातून एकरी अडीच ते पावणेतीन किलो बियाणे लागले. जानेवारीत तीन एकर कपाशीच्या जागेतही ठिबकवर टोकण पध्दतीने लागवड केली.

पाणी नियोजन  
उगवणीनंतर आठ दिवसांनी तीन तास, त्यानंतर दुसरे पाणी १५ दिवसांनी
पोटरे, निसवणे, कणसे भरण्याच्या अवस्थेत असे एकूण सहा वेळा पाणी 
मावा, लष्करी अळी नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशके  

दुष्काळात आश्‍वासक उत्पादन 
ठिबकवरील सात एकर ज्वारीपैकी चार एकरांवरील काढणी
एकरी १० क्विंटलप्रमाणे धान्य तर कडब्याचे एकरी सुमारे एकहजार याप्रमाणे एकूण चारहजार २०० पेंढ्या उत्पादन दुष्काळात मिळाले. 
कणसे दाण्यांनी संपूर्ण भरलेली. दाणाही टपोरा.
ठिबकद्वारे एकसारखे पाणी दिल्याने एकाच ठिकाणी अनेक फुटवे फुटले. 
खरिपात कपाशी व त्यानंतर रब्बीत पुन्हा ठिबकद्वारे टोकण पध्दतीने ज्वारीचे नियोजन  

दुग्ध व्यवसायाचा उत्पन्न स्त्रोत 
सततच्या दुष्काळामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत म्हणून सन २०११ मध्ये पाच संकरीत गायी घेऊन दुग्धव्यवसाय
सुमारे ६० बाय २४ फूट आकाराचा गोठा. त्यात पंखे, कुलर्स. 
उन्हाळ्यात छतावर कडब्याच्या पेंढ्यांचा वापर. त्यामुळे गोठ्याचे तापमान कमी राखण्यास मदत
गायी (जर्सी आणि एचएफ) व म्हशींचे मिळून दररोज ८० ते ९० लिटर दूध संकलित 
गायीचे दूध परभणी येथील शासकीय दुग्धशाळेअंतर्गत गंगाखेड येथील शीतकरण केंद्राकडे 

जमीन सुपीकतेवर भर 
जनावरांचे मूत्र, गोठा धुतलेले पाणी जमा करण्यासाठी सिमेंटचा हौद बांधला आहे. त्यातील द्रावणाचा वापर पिकांसाठी केला जातो. दरवर्षी सुमारे १०० ट्रॉली शेणखत जमा होते. त्यापासून दरवर्षी १० ते १५ एकर क्षेत्र खतवून निघते. त्यामुळे जमिनीची सुपिकता ठेवण्यास मदत होत आहे.

एकत्रित कुटूंब
कुटुंबातील थोरले बंधू दिगंबरराव कारभारी. 
कैलास आणि विलास यांच्याकडे शेती व दुग्ध व्यवसायाची जबाबदारी.
मारोतराव यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी. त्यांचे वास्तव्य परभणी येथे. मात्र नियमित शेतावर देखरेख.
कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने परिवाराने शेती व दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे.

चारा व्यवस्थापन
सन २०१५ च्या दुष्काळात चारा कमी पडल्याने दीड लाख रुपयांचा चारा विकत घ्यावा लागला.
सन २०१६ मध्ये दोन एकरांत मका. हायड्रोपोनिक्स पध्दतीने चारा निर्मिती.
गुणवंत आणि सीसीफोर या बारमाही चारा देणाऱ्या तसेच मका, बाजरी या चारापिकांची लागवड 
सर्व पशुधनास वर्षासाठी १० ते १२ हजार ज्वारी कडबा पेंढ्यांची गरज.
सोयाबीन, तूर, ज्वारी आदींचा भुस्सा (गुळी), भुईमुगाचा पाला चारा म्हणून उपयोगात 
यंदा ज्वारीच्या एकूण ८ ते १० हजार पेंढ्या उपलब्ध होतील. 
उपलब्ध चाऱ्याचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी यंत्राव्दारे कुट्टी. त्यामुळे जनावरे संपूर्ण चारा खातात. कडब्याची नासाडी थांबते.
गंजीच्या तुलनेत कुट्टी साठवणूक सोपी. यंदा उपलब्ध सर्व कडब्याची कुट्टी करून साठवणूक होणार. 

कैलास काळे, ९५६१८२४१६९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com