केशर आंबा बाग, मिश्रपिके, अन्‌ वृक्षलागवडीचा ध्यास

Keshar-Mango
Keshar-Mango

लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत आपली शेती त्यांनी समृद्ध केली आहे.

डोक्‍यावर पांढरी टोपी, त्यावर एका बाजूने ''ओम वृक्षाय नम:'' तर दुसऱ्या बाजूने ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' ''वृक्षारोपण हे भक्‍तिकार्य''. हे वैशिष्ट्य जपले आहे लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. (ता. औसा) येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी. त्यांची वडिलोपार्जित सुमारे १६ एकर शेती आहे. त्यात सात एकरांची नव्याने भर घातली आहे. केशर आंबा हे त्यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सात एकरांतील या बागेतून ते चांगले उत्पादन सातत्याने घेत आहेत.  

वृक्षलागवडीची आवड
पृथ्वीराज यांना शेतीबरोबरच वृक्षलागवडीचीही मोठी आवड आहे. सीव्हील इंजिनिअरिंग ॲण्ड रूरल डेव्हलपमेंट विषयातील डिप्लोमा घेतल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत ज्युनिअर इंजिनिअरची नोकरी पत्करली. परंतु मन नोकरीत रमलेच नाही. नोकरी सोडून ते गावी शेती करण्यासाठीच परतले. सन १९९८ पासून वृक्षदिंडी मोहिमेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. वृक्ष लागवड, संवर्धनाचे महत्त्व त्या माध्यमातून लोकांना पटवून देण्यास सुरवात केली. 

केशर आंबा लागवड 
पारंपरिक शेतीत बदल करताना पृथ्वीराज यांनी लातूर- निलंगा मार्गालगतच्या आपल्या सात एकर शेतात  केशर आंब्याची लागवड केली. गावरान आंब्याच्या कोयी लावून त्यावर केशरचे कलम केले. सन २००० मध्ये २० बाय २० फूट अंतरावर ४०० तर २००५ मध्ये १० बाय १० फूट अंतरावर ६०० झाडांची लागवड केली. आज १५ ते २० वर्षे वयाची ही सुमारे एकहजार झाडे चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ लागली आहेत.  

मिश्रबाग व आंब्याची विविधता  
केशर व्यतिरिक्त हापूस, तोतापरी, मलगोबा व हूर या जातीच्या आंब्यांची प्रत्येकी चार- पाच झाडे  वाढविली आहेत. सुपारी, बदाम, फणसाच्या झाडांनीही बागेला शोभा आणली आहे. पृथ्वीराज यांनी आंब्यामध्ये सीताफळ, पेरू, केळी, शेवगा, हळद, आले, करडई, ज्वारी, मका, चारा अशी मिश्रपीक पद्धती राबवून आंबा बाग मोठी होईपर्यंत त्यातून उत्पन्न घेतले आहे. 

सिंचनाची सोय 
औसा तालुक्‍यात चार नद्यांच्या संगमपरिसरात असलेला पृथ्वीराज यांचा शेती परिसर आहे. पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरा नदीकाठावर जागा घेऊन त्या ठिकाणाहून पाणी बागेत आणले आहे. सर्वसाधारणपणे मार्चपर्यंत चालणारे चार बोअर्स आहेत. अलीकडील काळात मात्र गारपीट व दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.  

वृक्षलागवडीची मोहीम 
पृथ्वीराज यांनी स्वतःबरोबर अन्य गावातील वृक्षसंपदाही वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत. भूसनी, लोदगा, शिवणी, गोंद्री आणि तोंडवळी या पाच गावांत बिया लावून बदाम, चिंच, कडूनिंबाची शेकडो झाडे त्यांनी लावली आहेत. काही ठिकाणी रोपांचीही लागवड आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर अनेकांना बाग उभी करून देण्यासाठी त्यांनी मदत केली आहे.  

वृक्षाई कृषी पर्यटन केंद्राची उभारणी 
आपल्या शेत परिसराची रचना व नैसर्गिक स्थिती पाहून कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीचे प्रयत्न पृथ्वीराज यांनी सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून छोटेखानी जलतरण तलावाची निर्मिती केली. उन्हाळी वा मुख्य हंगामात दररोज ५० ते १०० व्यक्ती पृथ्वीराज यांच्या या केंद्राला भेट देतात. वाढदिवस, ३१ डिसेंबर किंवा अन्य गेट टूगेदर याच ठिकाणी येऊन अनेकजण साजरे करतात. त्यासाठी छोटेखानी ‘हॉल’ उभारला असून निवासासोबतच अन्य आवश्‍यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काळात अजून सर्व सुविधांनी युक्‍त ''वृक्षाई कृषी पर्यटन'' सुरू करण्याचा ध्यास पृथ्वीराज यांनी घेतला आहे. त्यासाठी मुलगा ऋषीकेषसह त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

- पृथ्वीराज तत्तापुरे, ९५६१५६३५३७ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com