दुर्गम मेळघाटात दर्जेदार खवानिर्मिती

Khava
Khava

अमरावती जिल्ह्यात दुर्गम मेळघाटातील मोथा (ता. चिखलदरा) येथील शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नावर अवलंबून राहणे शक्य नव्हते. ते दुग्धव्यवसायाकडे वळले. मात्र, त्यातील समस्याही कमी नव्हत्या. मग काहीजण बाजारपेठ पाहून खवानिर्मितीकडे वळले. त्यातून फार मोठे उत्पन्न हाती लागत नसले तरी घरचा प्रपंच चालवण्यासाठी हा व्यवसाय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चिखलदरा हा दुर्गम परिसर पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे. येथील शेतकरीही चांगल्या प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अपेक्षित उत्पादकता होत नाही. त्यामुळे त्यांनी दुग्धव्यवसायाचा पर्याय निवडला. टप्याटप्याने व्यवसाय वाढीस लागला. गावातील म्हशींची संख्या साडेआठशेवर पोचली. बाराशेपर्यंत लोकसंख्या असलेल्या या गावात आज अनेकांकडे १० ते १५ पर्यंत म्हशी आहेत. परतवाडा येथील बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी होते. मुऱ्हा म्हशी ६५ हजार ते ७० हजार रुपयांत मिळते. तर गावरान म्हशीसाठी ३५ हजार ते ४५ हजार रुपये मोजावे लागतात. गावरान गायीदेखील अनेकांकडे आहेत.   

खव्याचे ग्राहक व बाजारपेठ 
मोथा गावातील गणेश पाटील पारंपरिक दूध उत्पादक आहेत. खवानिर्मितीचा त्यांचा चांगला अनुभव आहे. ते म्हणाले, की साधारण पाच लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो. गाईच्या दुधापासून खवा कमी तयार होतो. मागणी असेल त्याप्रमाणे मलई पेढादेखील आम्ही तयार करतो. 

सर्वदूर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा मार्गावर आणि चिखलदऱ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर मोथा आहे. त्यामुळे पर्यटकांना येथील खव्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. हेच पर्यटक हे या खव्याचे ग्राहक असतात. मात्र, त्यांच्या संख्येवर व मागणीवर खप अवलंबून असतो. ज्या वेळी पर्यटकांचा समूह येतो व मागणी नोंदवतो त्या वेळी खव्याचा खप चांगला असतो. उर्वरित खव्याची विक्री धारणी, परतवाडा, अमरावती आदी ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मिठाई व्यावसायिक यांना केली जाते. त्यासाठी आठवड्यातील दोन दिवस प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन विक्री करावी लागते. बुलडाणा, अकोला जिल्ह्यातही मेळघाटातील या दर्जेदार खव्याला मागणी राहते. 

समस्याही कमी नाहीत   
सध्या मोथा गावात खवा उत्पादकांची संख्या केवळ चार ते पाचपर्यंतच राहिल्याचे गणेश पाटील म्हणाले. अन्य शेतकरी दूधविक्री करू लागले आहेत. अचलपूर येथे एका कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे. अन्य खासगी डेअरीला देखील दूध पुरवले जात आहे. दुधाला सरासरी ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर दर मिळतो. खवा तयार करण्यासाठी जळाऊ इंधन आणावे लागते. मात्र दूर जंगलातून ते आणावे लागते. अलीकडील काळात ते आणण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे खवानिर्मिती देखील सुकर राहिलेली नाही. मात्र एकूण शेतीचे चित्र, त्यातील उत्पन्न पाहाता कुटुंबाच्या प्रपंचाला या व्यवसायाचा चांगला आधार मात्र होत असल्याचे पाटील यांनी बोलून दाखवले. कुटुंबातील पुरुष सदस्य शेतकामात व्यस्त असतात. त्या वेळी घरच्या महिला खवानिर्मितीची मुख्य जबाबदारी सांभाळतात.

चाऱ्यासाठी जंगलाचा पर्याय
संरक्षित व्याघ्र प्रकल्प जाहीर केला असल्याने त्या भागात जनावरांना चराईबंदी आहे. हिरवा चारा जनावरांना  डिसेंबरपर्यंत पुरतो. त्यानंतर परतवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी बसविली जातात. काही शेतकरी कुटार खरेदी करतात. हिवाळ्याचे दोन आणि पावसाळ्याचे चार महिने परतवाडा भागात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी राहावे लागते, अशा संक्रमणाच्या अवस्थेतून हा व्यवसाय सध्या जातो आहे.  

मोथा गावात  खवानिर्मिती उद्योग 
चिखलदऱ्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मोथा हे गाव डोंगरदऱ्यात वसले आहे. येथील शेतकऱ्यांनीही दूग्ध व्यवसाय जपला आहे. त्यांनीही सुरवातीला तूप आणि ताकनिर्मितीवर भर दिला. त्यानंतरच्या काळात खवानिर्मिती सुरू केली. धारणी व परतवाडा येथे त्याची विक्री सुरू केली. याच गावाचा आदर्श घेत मेळघाटातील आलाडोह, मडकी, धारणी, लवादा, शहापूर, सिमाडोह, पिली, मांगीया, हरिसाल ही गावेही खवा उत्पादनात उतरली.

घर परिसरात फलकांद्वारे मार्केटिंग 
मोथा ग्रामस्थांनी खवा, रबडी उपलब्धतेचे फलक आपल्या घरासमोर लावले आहेत. त्यातून ते आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करतात. सण, उत्सवाच्या काळात खव्याला  मागणी जास्त असते. या काळात किलोला २५० ते ३०० रुपये असा दर खव्याला मिळतो. बिगर हंगामात हे दर उतरतात. खवा हा नाशवंत पदार्थ अाहे. अनेकवेळा व्यावसायिक मागणी कमी असल्याचे सांगतात. कमी दराने खरेदी करतात. मात्र नाईलाजाने कमी दरात विक्री करावीच लागते, असे गणेश पाटील यांनी सांगितले. त्यांची तीन शेती आहे. त्यात ते ज्वारी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी पिके घेतात. 

तूप, ताकाची विक्री
दुर्गम मेळघाटात कोरकू आणि गवळी समाजाची वस्ती आहे. जमीनधारणा कमी आणि त्यातही  वनविभागाच्या जमिनीवरच शेती करण्यावर भर दिलेला. तांदळातील कुटकी प्रकार येतील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन. हा अधिक पौष्टीक घटक असल्याने त्याचा दैनंदिन आहारात वापर केला जायचा. परंतु, आता शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गहू व अन्य धान्याचा पुरवठा होत असल्याने कुटकी भात मागे पडला. उत्पन्नाचे स्त्रोत अशा प्रकारे मर्यादित असल्याने या भागातील गवळी समाजाने आपल्या पारंपरिक दुग्धोत्पादन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. परंतु दुधाला तुलनेत मागणी कमी व दरही समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी तूप आणि ताक तयार करण्यास सुरवात केली. धारणी तसेच परतवाडा या गावांमध्ये त्यांच्या विक्रीवर भर राहिला.  

- गणेश पाटील-९३७२१८५२२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com