कोकण, मध्य महाराष्ट्र,  विदर्भात पावसाची शक्यता

प्रतिनिधी
गुरुवार, 18 जुलै 2019

बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) दक्षिणेकडे सरकल्याने देशात मॉन्सून सक्रिय होणार आहे. आजपासून (ता. १८) राज्यातही पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे.

पुणे - बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) दक्षिणेकडे सरकल्याने देशात मॉन्सून सक्रिय होणार आहे. आजपासून (ता. १८) राज्यातही पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. आजपासून (ता. १८) राज्यात पाऊस पडण्यास पोषक हवामान तयार झाले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याच्या दक्षिणोत्तर सरकण्यावर पावसाचा जोर ठरतो. हा पट्टा दक्षिणेकडे सकल्यास दक्षिण, मध्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढतो.  

तर तो हिमालयाच्या पायथ्याकडे गेल्यास पाऊस आसरतो. सध्या हा पट्टा राजस्थानपासून, बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्राची पूरक साथ लाभल्याने शुक्रवारपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दक्षिण भारतील राज्यांसह कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक २३०, कणकवली येथे ११०, तर मुलदे येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : वेंगुर्ला २३०, कणकवली ११०, मुलदे १००, कुडाळ ९०, दोडामार्ग ८०, वैभववाडी, राजापूर, तळा, महाड प्रत्येकी ७०, पोलादपूर, माणगाव प्रत्येकी ६०, भिरा, गुहागर, लांजा, मालवण, सावंतवाडी प्रत्येकी ५०, चिपळूण, संगमेश्‍वर, सुधागड, खेड, माथेरान, मुरूड, मुरबाड प्रत्येकी ४०, म्हसळा, हर्णे, मंडणगड, पेण, श्रीवर्धन प्रत्येकी ३०.  

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ९०, लोणावळा ६०, पौड, राधानगरी प्रत्येकी ३०, महाबळेश्‍वर २०. 

मराठवाडा : रेणापूर, बीड प्रत्येकी १०. 
घाटमाथा : डुंगरवडी, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी ९०, लोणावळा ८०, शिरगाव, वळवण प्रत्येकी ७०, अंबोणे ६०, भिरा ५०.

मॉन्सूनची आणखी प्रगती
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. १७) पंजाब, हरियानाचा संपूर्ण भाग व्यापला आहे. सुरवातीपासून अडखळत प्रगती करणाऱ्या मॉन्सूनला देश व्यापण्यासही उशीर झाला आहे. साधारणत: १५ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशात पोचतो. यंदा पश्‍चिम राजस्थानचा भाग वगळता मॉन्सून उर्वरित देशभरात पोचला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Maharashtra Vidarbha Chance of Rain