यांत्रिकीकरणातून शेती झाली कमी श्रमाची

चंद्रकांत जाधव
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

तांदलवाडी (जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांनी आपल्या शेतीत यांत्रिकीकरण आणले आहे. इटालीयन रोटाव्हेटर, मिनी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राबरोबर अलीकडील वर्षांत त्यांनी बटाटा पेरणी यंत्राचाही वापर केला आहे. तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण उपयोग करताना वेळ, श्रम व पैशांची बचत केली आहे. 

तांदलवाडी (जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांनी आपल्या शेतीत यांत्रिकीकरण आणले आहे. इटालीयन रोटाव्हेटर, मिनी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राबरोबर अलीकडील वर्षांत त्यांनी बटाटा पेरणी यंत्राचाही वापर केला आहे. तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण उपयोग करताना वेळ, श्रम व पैशांची बचत केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) हे गाव जळगावपासून सुमारे ६२ किलोमीटरवर आहे. शिवारात काळी कसदार जमीन आहे. केळी हे भागातील प्रमुख पीक आहे. येथील प्रेमानंद महाजन यांची शंभर एकर शेती आहे. यात ५० एकर उतीसंवर्धित केळी, ४० एकर कापूस असतो. बाकी पारंपरिक पिके असतात. दहा कूपनलिका, दोन मोठे व एक मिनी ट्रॅक्‍टर, दोन बैलजोड्या, दहा सालगडी अशी यंत्रणा आहे.

बटाटा शेती व पेरणी यंत्राचा वापर 
तांदलवाडी परिसर केळीसाठी प्रसिद्ध असला तरी या भागात प्रेमानंद यांनी काही वर्षांपासून बटाटा घेण्याचा प्रयोग यशस्वी केला. दरवर्षी अडीच ते चार एकरांत ते रब्बीत बटाटा घ्यायचे. त्यात पेरणी यंत्राचा वापर करायचे. अलीकडील दोन वर्षांत अपेक्षित दर नसल्याने हे पीक घेणे थांबवले आहे. यंदा स्थानिक आघाडीच्या कंपनीसाठी त्यांनी बटाटा बीजोत्पादनाचा प्रयोग केला आहे.

बटाट्यात पेरणीयंत्राचा वापर 
यांत्रिकीकरणाची आवड व गरजही असलेल्या महाजन यांनी बटाटा पिकासाठी मध्य प्रदेशातील इंदूरमधून ट्रॅक्‍टरचलित यंत्र ५० हजार रुपयांना आणले. इंदूर व लगतच्या भागात बेड (गादीवाफे) पद्धतीचा वापर असतो. या यंत्राद्वारे बेडही तयार केले जातात. 

पूर्वीची वेळखाऊ पद्धत 
पारंपरिक पद्धतीत मजूरबळाचा वापर करून बेडनिर्मिती व लागवड  
एक एकर लागवडीसाठी किमान १० मजूर लागायचे. 
मजुरांकरवी लागवडीत दोन रोपांमधील अंतर १२ ते ३ इंच किंवा कमी अधिक होते.  
लागवड तीन इंच खोलीपर्यंत व्हायची. 

यांत्रिक पद्धत व फायदे
एका दिवसात केवळ तीन मजुरांकरवी व तेही दोन एकरांत लागवड पूर्ण करता येते. 
एक ट्रॅक्‍टरचालक व यंत्रात बियाणे टाकायला दोन असे मनुष्यबळ लागते. बियाणे टाकण्यासाठी यंत्रावर बसण्याची व्यवस्था. 
सात मजुरांची बचत होते. दिवसा २०० रुपयांची हजेरी म्हटली तरी १४०० रुपयांची बचत एकरी शक्य.  
पारंपरिक पद्धतीत ताशी दीड लीटर डिझेल लागायचे. यंत्राद्वारे ते दोन लीटर डिझेल लागते. मात्र लागवड एकसमान पद्धतीने होते. 
गादीवाफ्याची रुंदी दोन फूट व उंची दीड फूट.  दोन वाफ्यांच्या मध्यावधीचे अंतर पाच फूट. एका वाफ्यावर दोन ओळी, दोन ओळीतील अंतर बारा इंच तर दोन रोपांतील सहा ते आठ इंच.  
यांत्रिक पद्धतीत बियाणे सहा इंच खोलीपर्यंत जाते. त्यामुळे चांगली उगवण शक्ती मिळते. झाडांची संख्या संतुलीत राखता येते. एकरी आठ क्विंटल बियाणे लागते. 
पारंपरिक पद्धतीत मजुरांकरवी लागवडीत होणारा एकरी १९०० रुपये खर्च कमी होतो. बैलजोडीने गादीवाफे तयार करणे, वाफ्यांवर मातीची भर करणे यासाठी आणखी मजुरी व अधिक वेळ लागतो. मजूरटंचाई व लागवडीचे क्षेत्र पाच ते सात एकर असल्यास लागवडीसाठी एक आठवडादेखील लागू शकतो. हा वेळ, खर्च व मनुष्यबळ यांची यांत्रिक शेतीत बचत.  
पारंपरिक पद्धतीत एकरी ९ टनांपर्यंत तर यांत्रिक पध्दतीत कमाल १४ टनांपर्यंत उत्पादन महाजन यांनी साध्य केले.  
हळद लागवडीसाठीदेखील या यंत्राचा उपयोग. 

इटालियन तंत्राचा पॉवर टिलर
आपले शंभर एकर क्षेत्र व पिकांची बहुविविधता लक्षात घेऊन मशागत, आंतरमशागत, शेत भुसभुशीत करणे आदींसाठी विविध यंत्रांचा वापर केला आहे. यात इटालियन बनावटीचा पॉवर टिलर आहे. गादीवाफे सरळ करण्यास किंवा वाफ्यांवर मातीची अतिरिक्त भर घालण्यासाठी त्याचा उपयोग हळद, केळी, कपाशी व अन्य पिकांत होतो. तीन लाख रुपये त्याची किंमत आहे. त्याला ताशी एक लिटर डिझेल लागते. दिवसभरात सहा ते सात एकरांत विविध कामे हे यंत्र करते. 

पेरणीसाठी यंत्र 
ज्वारी, गहू, मका, हरभरा, बाजरी, ज्वारी यांच्या पेरणीसाठी मिनी ट्रॅक्‍टरचलित यंत्र आहे.ताशी दोन लिटर डिझेल लागते. दिवसभरात पाच ते सहा एकरांत पेरणी सहज करता येते. खरिपात पावसानंतर वाफसा कमी असला तर मोठा ट्रॅक्‍टर चालत नाही. मग कमी वाफशात मिनी ट्रॅक्‍टर चालवता येतो. त्यासाठी यंत्रात काही बदल करून घेतले. मळणीसाठीही ट्रॅक्‍टरचलित यंत्रणा आहे.

ऑटो बॅक वॉश फिल्टर
शंभर एकरांत ठिबक यंत्रणा आहे. तापी नदीवरून दोन जलवाहिन्या घेतल्या आहेत. त्याद्वारे  गाळ, शेवाळ हे घटक येतात. त्यामुळे ऑटो बॅक वॉश फिल्टर यंत्रणा बसविली आहे. ताशी दीड लाख लिटर पाणी स्वच्छ करण्याची त्याची क्षमता आहे. ही यंत्रणा चालवण्याचा कालावधी प्रोग्रॅमिंगद्वारे निश्‍चित करता येतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor and money savings due to mechanization