कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू ठरले फायदेशीर

सुदर्शन सुतार
सोमवार, 16 मार्च 2020

वर्षभर मिळते लिंबापासून उत्पन्न 
डाळिंबाच्या आधीपासूनच दोन एकरांवर त्यांच्याकडे लिंबू लागवड केलेली आहे. २० फूट बाय २० फूट प्रमाणे २०० झाडे लावलेली आहेत. त्यांना सप्टेंबरमध्ये ताण दिल्यानंतर झाडाच्या बुडात १८ः४६ः०, निंबोळी पेंड, बोनमील (७ः१०ः५) प्रत्येकी एक किलो आणि शेणखत दोन घमेले टाकले जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणी देऊन लिंबाचा बहर धरला जातो. त्यानंतर सेटिंग आणि फळधारणेच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन असते. थेट फेब्रुवारी- मार्चला काढणी सुरू होते. एप्रिलपर्यंत भरपूर लिंबू लागतात; पण त्यानंतरही पुढे बहर धरेपर्यंत कायम झाडावर लिंबू राहतात. वर्षाकाठी लिंबांचे सरासरी एकरी नऊ टन उत्पादन मिळते.  

लिंबाचे अर्थकारण
    प्रतिवर्ष प्रतिझाड ३ गोण्या म्हणजे दीडशे किलो लिंबू मिळतात. प्रतिकिलो किमान २० ते कमाल ६५ रुपये असा दर मिळतो. सरासरी दर २५ रुपये राहतो.  
    मागणीनुसार आठवड्यातून दोन ते तीन वेळा काढणी करतात. १० ते १२ गोण्या (साधारण १७ किलो प्रतिगोणी) म्हणजेच आठवड्याला सरासरी १७० ते २०० किलो लिंबू पुणे, टाकळी सिकंदर व पंढरपूर बाजारात पाठवले जातात.  
    हिरवा कच्चा आणि पक्व पिवळसर अशा दोन प्रतीत लिंबूची प्रतवारी केली जाते. 
    दर दोन दिवसाला याप्रमाणे आठवड्यामध्ये ४ ते ७ हजार रुपये उपलब्ध होतात. कुटुंबाचे व शेतीचे दैनंदिन खर्च वेळेवर भागवणे शक्य होते. रोख चलन मिळत असल्याने शेतातली कामे अडत नाहीत.

सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले, तरी संपूर्ण शेतीच्या व्यवस्थापनासह घरगुती खर्चाचा सगळा भार दोन एकरांवरील लिंबू पिकातून भागवला जातो. दर दोन दिवसांनी, सुमारे वर्षभर मिळणाऱ्या या रोख रकमेवर आढेगाव (ता. मोहोळ) येथील शिवाजी भानवसे यांचे अर्थकारण सावरले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पोखरापूरपासून आत सात-आठ किलोमीटरवर आढेगाव आहे. आढेगावची ओळख तशी डाळिंबाचे गाव म्हणूनच आहे. येथील शिवाजी भानवसे यांनी एअरफोर्समध्ये वीस वर्षे फ्लाइट इंजिनिअर म्हणून सेवा केली. या नोकरीदरम्यान परवानगी घेऊन कायद्याची पदवी (एलएल.बी.) घेतली. एअरफोर्समधून निवृत्त झाल्यानंतर पत्नी अलका यांच्यासाठी मेडिकल शॉप सुरू केले. त्यांनी स्वतः २००२ ते २०१२ या काळात वकिलीही केली. या काळात सात एकर शेती विकत घेतली. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. १९९९ पासून गावाने या दांपत्याला बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य बनवले. तेव्हापासून ते सातत्याने बिनविरोध सदस्य राहिले असून, २०१५ पासून बिनविरोध सरपंच आहेत. हे सारे असले तरी गावाच्या विकासाचे राजकारण करतानाच शेतीमध्ये सर्वाधिक रस घेतात. 

शिवाजी भानवसे सांगतात...
    २००७ मध्ये शेती सुरू करताना त्यांना गावातील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब डोंगरे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले.
    ‘अॅग्रोवन’चे पहिल्या दिवसापासूनचा वाचक असून, त्याचे संच व कात्रणे करून जपून ठेवली आहेत.  
    शेती परवडत नाही असे कोणी म्हणाल्यास, त्याला माझ्या शेतावर घेऊन येतो. कमी पाण्यातही डाळिंब, लिंबू या पिकांनी मला चांगली साथ दिली आहे. 

हंगामी उत्पन्नासाठी डाळिंबाची निवड  
    पूर्वीपासून लिंबूची दोन एकरांवर लागवड होतीच. पाण्याची जेमतेम सोय असल्याने त्यांनी डाळिंबाची निवड केली. माळरानाची जमीन असलेल्या क्षेत्रामध्ये १४ फूट बाय ९ फूट अंतरावर भगवा वाणाची दोन हजार रोपे लावली. नंतर टप्प्याटप्प्याने क्षेत्र वाढवले. 
    सिंचनासाठी विहीर व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. पर्यायाने वर्षामध्ये हस्त बहरावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यासाठी डाळिंबाची ऑगस्टमध्ये पानगळ केली जाते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये बहर धरला जातो. साधारण पुढे फेब्रुवारी-मार्चमध्ये डाळिंब काढणीस येतात. या काळात दरही चांगले असतात. 
    तत्पूर्वी मे महिन्यात डाळिंबाची छाटणी केली जाते. पहिला पाऊस पडल्यानंतर बागेतील बोद फोडून त्यात प्रतिझाड दोन घमेले शेणखत, अर्धा किलो १८ः४६ः०, निंबोळी पेंड आणि बोनमील प्रत्येकी एक किलो मिसळले जाते. पुन्हा बोद बांधून घेतात. त्यानंतर एक- दोन दिवसांआड गरजेनुसार पाणी सोडले जाते. ठिबक संचाद्वारे संपूर्ण क्षेत्रासाठी खत पाण्याचे नियोजन केले जाते. त्याशिवाय दर आठ-दहा दिवसाला कीड-रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन असते. 
    रासायनिक खत आणि सेंद्रिय खत यांचे संतुलन साधले जाते.
    व्यवस्थापनासाठी एकरी ६५ हजार रुपये खर्च होतो. 

हंगामाआधीच खतांची, कीडनाशकांची खरेदी 
साधारणपणे मे-जूनमध्येच शेणखत (दीड लाख रुपये), निंबोळी पेंड, बोनमील इ. (एक लाख रु.), सेंद्रिय खतांची खरेदी केली जाते. त्यासोबतच आवश्यक कीडनाशकांचीही (६० ते ७० हजार रु.) खरेदी केली जाते, यामुळे प्रतिवर्ष लाख रुपयामागे १५ ते १७ हजार रुपयांची बचत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऐन हंगामामध्ये उपलब्धता नसणे, अधिक मागणीच्या काळामध्ये या खतांमध्ये भेसळ होणे या समस्या टाळता येतात. खते आणि कीडनाशके घरीच उपलब्ध असल्यामुळे शेतातील प्रत्येक काम नियोजनानुसार वेळेत करता येते. वेळेचा अपव्यय टळतो. 

मजुरांचे नियोजन
शेतातील महत्त्वाची कामे उदा. फवारणी, खते देणे, ड्रिप देणे ही शिवाजीराव स्वतः करतात. फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित आधुनिक ब्लोअर आहे. अन्य कामांसाठी त्यांच्याकडे कायमस्वरूपी ३ महिला (प्रत्येकी २०० रुपये रोज) आणि एक पुरुष मजूर (३०० रुपये रोज) असतो. माल काढणी सुरू असताना आणखी मजूर घेतले जातात, त्यासाठी प्रतिवर्ष सुमारे ५० हजार रुपये खर्च होतो. 

केव्हीकेचे मार्गदर्शन 
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे, प्रा. अजय दिघे, प्रा. दिनेश क्षीरसागर, शंकर सुतार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या गावात राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत प्रथम शेतकरी या उपक्रमामध्ये त्यांच्या शेतावर तेलकट डाग, मर रोग नियंत्रणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 

डाळिंबाच्या उत्पन्नातून मुलांची शिक्षणे 
शिवाजी भानवसे यांना दीपाली आणि आनंद अशी दोन मुले आहेत. दोघांचेही इंजिनिअरिंग (बी.ई.) पूर्ण झाले आहे. दीपालीचा विवाह झाला असून, ती पुणे येथे नोकरीही करते. आनंदचे सध्या पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे. मुलांचे शिक्षण, विवाह अशा मोठ्या खर्चांसाठी डाळिंबाचे एकदम येणारे उत्पन्न उपयोगी पडल्याचे भानवसे यांनी आवर्जून सांगितले. नियोजन केल्यानंतर शेती फायदेशीर होते, तोट्याची होऊच शकत नाही, असाही दावा ते करतात. 

डाळिंबाचा ताळेबंद 
डाळिंबाचे सरासरी एकरी उत्पादन ५ टनांपर्यंत असते. डाळिंबाला प्रतिकिलो किमान ३० ते कमाल ५० रुपये दर मिळतो. सरासरी ३५ रुपये दर हाती येतो. यंदा कमी पाणी आणि अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे उत्पादन कमी आहे. परिणामी दर १२५ रुपयांच्याही पुढे आहे. डाळिंब प्रामुख्याने हैदराबाद व त्यानंतर इंदापूर, गुलबर्गा बाजारपेठेमध्ये पाठवले जाते. 

वर्ष                         एकूण उत्पादन    सरासरी दर (प्रतिकिलो)    एकूण उत्पन्न
२०१७-१८                        ३० टन                  ५० रुपये                १५ लाख रुपये
२०१८-१९                          ३५ टन                ३७ रुपये                १३ लाख रुपये
२०१९-२० (आतापर्यंत)    २२ टन (आतापर्यंत)    ९१ रुपये                २० लाख रुपये

हिशेबाच्या नोंदी 
शिवाजी भानवसे यांना हिशेब लिहून ठेवण्याची आवड आहे, त्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि त्याचा खर्च यांचा काटेकोर ताळेबंद त्यांच्याकडे तयार असतो. शेतीला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षाच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत. त्यात मजुरांचा पगार, खत- औषधांवरील खर्च, घरगुती कारणासाठी लागलेला खर्च याच्या नोंदी आहेत; पण ते पैसे रोखीने, बँकेतून ट्रान्सफर, चेक दिला की अलीकडे मोबाईलद्वारे दिले यांच्याही नोंदी आहेत. यामुळे प्रत्येक पैशाचा हिशेब नोंदवला जातो.

- शिवाजी भानवसे, ९८९०२५००४८, ९२८४८४६८३०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lemon with pomegranate proved beneficial in the family finances