लिची उत्पादन व विक्रीचा नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग

लिची उत्पादन व विक्रीचा नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाखेचे माजी संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या पुढाकाराने प्रक्षेत्रात लिची या महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण पिकाचा प्रयोग २००० च्या दरम्यान सुरू झाला. आज १६ हून अधिक वर्षे शास्त्रीय, काटेकोर, अभ्यासपूर्ण पध्दतीने या पिकाचे व्यवस्थापन सुरू असून व्यावसायिक उत्पादनही सुरू झाले आहे.    

लिची प्रयोग दृिष्टक्षेपात 
  खोल, पोयट्याची, गाळयुक्त सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्यकता. त्यामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावर ओढ्याशेजारी लागवड 
  जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ 
दरम्यान अपेक्षित. 
  क्षेत्र- दोन एकर.
  चौरस पद्धतीने व अति घनता पद्धतीने लागवड. 
  झाडाचा विस्तार २५ ते ३० फुटांपर्यंत.
  दोन झाडांमधील अंतर 
२० बाय २० फूट 

हवामान 
  समशीतोष्ण हवामानातील पीक. झाडांची वाढ होण्यासाठी २० ते ३५ अंश से. तापमान उपयुक्त.   तापमान १५ अंशांच्या खाली गेल्यास वाढ खुंटते.    झाडांची वाढ होण्यासाठी अधिक सूर्यप्रकाश मिळण्यासाठी विशिष्ट अंतरावर लागवड करण्यात आली.

व्यवस्थापन बाबी 
  खतांच्या मात्रा दर जूनमध्ये. रासायनिक खतांचा गरजेनुसारच वापर
  ठिबकद्वारे तसेच उन्हाळ्यात आठवड्यातून दोन-तीनवेळा नियमित पाणी
  वर्षातून दोन वेळेस खते. प्रति झाड वर्षाला १०० किलो शेणखत वर्षातून दोन समान हप्त्यात 

  अन्य पिकांपेक्षा किडी-रोगांचा उपद्रव अल्प प्रमाणात असलेले फळझाड. जैविक फवारण्यांवर भर. लाल कोळी, पाने गुंडाळणारी अळी, मोहोरावरील तुडतुडे, खोडावर साल खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसल्यास रासायनिक फवारणी. मूळकुजव्या रोग नियंत्रणासाठी जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होऊ दिला जातो. पावसाळ्यापूर्वी व नंतर खोडाभोवती एक टक्के बोर्डो मिश्रणाचा वापर. 

  हंगामपूर्व तयारी करताना झाडाभोवती खांदणी करून जमिनीची चाळणी
  त्यानंतर झाडाभोवती गोलाकार आळे. फुलोरा येण्याआधी चाळणीनंतर निंदण
  खोडापासून चार-पाच फूट अंतरावर आळ्यात योग्य मात्रेत रासायनिक खते. यात युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटाश, झिंक आणि बोरान यांचा वापर. त्यावर पुन्हा शेणखत. 
  खोलगट नांगरणी टाळली जाते.
  बहार धरताना अधिक तापमान असल्यास मोहोर जळतो.
  परागीकरणासाठी मधमाशांच्या पेट्या ठेवण्यात येतात. त्यामुळे उत्पादन वाढते.
  फळधारणेच्या काळात ८० टक्के आर्द्रता आवश्यक असल्याने त्यानुसार सिंचन
  फळे काढणीपर्यंत तापमान पुढे जाऊ नये यासाठी कृत्रीमरीत्या तापमान नियंत्रण.
  उष्ण हवा व जमिनीत कमी ओलावा असताना फळे तडकतात. त्यामुळे आर्द्रता टिकविण्यासाठी पालापाचोळा, कापलेले गवत व टाकाऊ नैसर्गिक घटक यांचे मल्चिंग.
  पाण्याचे बाष्पीभवन करून तापमान संतुलित करण्याचे प्रयत्न
  फळांच्या काढणीनंतर शेंड्याची हलकी छाटणी केल्यास पुढील हंगामात अधिक उत्पादन

मार्केट मिळवले : बाजारात लिचीला प्रति किलो २५० ते ३०० रुपये दर आहे. मात्र विद्यापीठाने आपल्याच प्रक्षेत्रात विक्री व्यवस्था सुरू केली. दोन वर्षांपूर्वी प्रति किलो ८० रुपये दर असलेली लिची आता १०० रुपये दराने विकली जात आहे. विद्यापीठाचे सुमारे २५० कर्मचारी आहेत. त्यांच्यामार्फतही मार्केटिंग झाले आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून माऊथ पब्लिसिटी झाल्याने ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभतो आहे. लिची शिल्लक राहात नाही. मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली विक्री १५ जूनपर्यंत एक किलो वजनाच्या जाळीच्या पिशव्यांमधून सुरू राहते. विद्यापीठाच्या दीडशे एकरांत आंबा, अन्य फळे, नर्सरी आदींच्या माध्यमातून वर्षाला ३० ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

काढणी तंत्रज्ञान :   काढणी कालावधी मे ते जून पहिला आठवडा. हवामानानुसार त्यात बदल.   लाल- पिवळसर छटा आल्यास काढणीला सुरवात.   एकेक न काढता फळांचा घोस देठासह काढण्यात येतो. त्या वेळी फांदीचा काही भाग व पानेही काढली जातात.   फळे टप्प्याटप्प्याने पक्व होत असल्याने काढणीही टप्प्याटप्प्याने.   काढणीनंतर नैसर्गिकरीत्या छाटणी होते. 

निवडलेल्या जाती
१. साही - 
भरपूर व नियमित फळे येतात. फळे लांबट गोलाकार. मेच्या अखेरीस पक्व होतात. फळांना आकर्षक लाल रंग असतो. फळाचे सरासरी वजन २० ते २५ ग्रॅम. प्रक्रियेसाठी अतिशय चांगली. 

२. चायना - 
फळे टपोरी. पक्व झाल्यावर लालसर- नारंगी रंग. फळाचे वजन सरासरी २५ ग्रॅम. फळातील गर पांढरा व मऊ. प्रत्येक जातीची १००. अशी एकूण २०० झाडे

लिचीचा नवा पर्याय 
विद्यापीठाच्या केव्हीकेचे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) हेमराज राजपूत यांनी लिची प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली आहे. ते म्हणाले, की मध्यम हवामानाच्या भागात हे पीक चांगले येऊ शकते. पिकाला पाणी असणे महत्त्वाचे असते. लागवडीनंतर ७ ते ८ वर्षांनी उत्पादन सुरू होते. मात्र व्यापारक्षम उत्पादन १२- १३ वर्षांनी सुरू होते. पिकाचे आयुष्यमान ४० वर्षांचे असते. मराठवाड्यासारख्या अवर्षणग्रस्त भागात हे पीक येऊ शकते का या प्रश्‍नावर ते म्हणाले की पाणी तर हवेच. पण प्रयोग केल्याशिवाय सांगणे शक्य नाही. 

हेमराज राजपूत, ९४२२७७३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com