लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श’

लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श’

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने दुष्काळ असतो. लोहसर (खांडगाव) गावशिवारातही दुष्काळाची स्थिती आहे. गावात जगन्नाथ गीते पाटील परिवाराचा राजकीय प्रभाव. पन्नास वर्षांपासून त्यांच्याकडे गावची सत्ता आहे. सध्या तिसऱ्या पिढीतील अनिल गीते- पाटील सरपंच आहेत. राज्यासह देशात आदर्श निर्माण करणाऱ्या राळेगण सिद्धी, हिवरेबाजार यांच्याप्रमाणे कार्य करण्याचा मनोदय लोहसरच्या ग्रामस्थांनी दहा वर्षांपूर्वी व्यक्त केला. 

केवळ मनोदय नव्हे, प्रत्यक्ष कामे घडली 
गावात प्रसिद्ध काळभैरवनाथाचे जुने मंदिर आहे. त्याचा जिर्णोद्धार करून २००९ मध्ये लोकसहभागाला सुरवात झाली. पुढेही वेळोवेळी मंदिराचे काम झाले. सध्या त्यासाठी एक कोटी रुपयांचा आराखडा आहे. २००९ मध्ये येथे खासगी संस्थेच्या माध्यमातून वन विभागाच्या क्षेत्रावर सलग समतल चर व खासगी क्षेत्रावर बांध बंदिस्तीची मिळून साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर कामे केली. त्या वेळी ७५ टक्के मजुरी व २५ टक्के श्रमदानाची योजना राबवली गेली. तेथूनच ग्रामस्थांना श्रमदान आणि लोकसहभागाची आवड निर्माण झाली. त्या वेळी आडीचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली लाखो झाडे आताही जोपासली जात आहेत. विकासासाठी शासनाकडून निधी मिळतो. त्यात भर घालण्यासाठी गावकऱ्यांनी सातत्याने लोकवर्गणी जमा करीत कामे मोठी केली. अशाच निधीतून गावांतील विविध कार्यक्रमासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृह, निवासासाठी संतभवन, लग्नकार्यासाठी सभागृह, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय, संपूर्ण गावांत पथदिवे आदी कामे केली. 

वनव्यवस्थापन समितीचा आदर्श
नगर जिल्ह्यात असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीत लोहसर समितीने आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यामध्ये फक्त दोन समित्यांना शासनाने ४० लाख रुपयांचा ग्रामवन योजनेचा दहा वर्षाचा आराखडा दिला. त्यात लोहसरचा समावेश आहे. २००९ पासून समिती कार्यरत असून, सरवातीपासून सरपंच अनिल गीते अध्यक्ष आहेत. गावाच्या बाजूला असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रावरील वृक्ष लागवडीसह अन्य बाबी समितीच पाहते. येथे चराईबंदीची प्रभावी अंमलबाजवणी केली जाते. तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे आदी कामे या निधीतून समिती करते. 

चारा विक्री
वन जमिनीवरील दरवर्षी साधारण पन्नास हजार रुपयांच्या चाऱ्याची विक्री केली जाते. त्यासाठी पास देण्याची पद्धत आहे. एक हजार रुपयाला एक पास दिला जातो. वैयक्तिक आणता येईल एवढा चारा एक व्यक्ती एका पासवर आणू शकते. पास नसताना चारा नेताना लक्षात आल्यास तिप्पट दंड आकारण्याचा गावात नियम आहे. त्यासाठी वन समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी केव्हाही तपासणी करू शकतात.  चारा नेण्यासाठी नोव्हेंबरपासून जूनपर्यंतचा कालावधी दिलेला असतो.

झाडे जगवण्यासाठी पंधरा मजूर
लोहसरमध्ये मिरी रस्ता, पवळवस्ती व गीते वस्ती या तीनही रस्त्यांवर बिहार पॅटर्ननुसार झाडांची लागवड केली आहे. सुमारे तीन हजार झाडे लावली असून, चाळीस लाखांची ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. झा़डे जगवण्यासाठी शंभर दिवस रोजगारातून पंधरा मजुरांना रोजगार मिळत आहे. दोनशे झांडाच्या देखभालीसाठी एका मजुरावर जबाबदारी आहे. 

स्मृतिस्थळ उपक्रम यशस्वी
वाढदिवस, लन्, पुण्यस्मरण आदींची आठवण म्हणून लोहसरमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून स्मृतिस्थळ उपक्रम राबवला. प्रत्येकाकडून एक हजार रुपये देणगी घेऊन त्या बदल्यात झाडाचे रोप, खड्डा, कुंडी यावर खर्च केला. त्या झाडांना देणगीदारांची अथवा स्मरणार्थ नावे असलेले फलक लावले आहेत. उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ८०० झाडे लावली गेली. त्यातील १४० लोक राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. उपसरपंच गोरक्ष गीते, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वांढेकर, अजीनाथ रोमन, मनीषा दडगखैर, पुष्‍पा दगडखैर, हिरा गीते, मीना वांढेकर, कांता गीते यांचे सहकार्य विविध कामांत होते. 

महिलांना मंदिर प्रवेश
राज्याच्या वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी काळभैरवनाथांची मंदिरे आहेत. नगर जिल्ह्यात आगडगाव व लोहसर (ता. नगर) पुणेवाडी (ता. पारनेर) येथे ही मंदिरे आहेत. या मंदिरात महिलांना प्रवेश नाही.  राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोहटादेवी, मढी या ठिकाणी येणारे भाविक लोहसर येथेही दर्शनासाठी येतात. त्यात महिलांना मंदिर प्रवेश नसल्याची कल्पना त्यांना नसे. त्याचा परिणाम होई. त्यामुळे येथे महिलांना मंदिर प्रवेश देण्याबाबत संकल्पना पुढे आली. ग्रामसभेत निर्णय झाला. २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालीन सभापती हर्षदा काकडे, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी मोहिते व सरपंच हिरा गीते पाटील यांच्या पुढाकारातून जाहीर कार्यक्रम घेऊन महिलांना मंदिर प्रवेश देण्यात आला. महिलांना प्रवेश असलेले हेच काळभैरव नाथाचे एकमेव मंदिर असावे. 

श्रमदान, लोकसहभाग आणि एकोप्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलता आला. अनेक विकासाची कामे झाली. येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. आमच्या परिसरातील असलेली मोहटादेवी, मढी, सावरगाव ही श्रद्धास्थाने देशात प्रसिद्ध आहेत. अधिकाधिक भाविकांनी पर्यटनसाठी या भागात यावे, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
 अनिल जगन्नाथ गीते-पाटील, सरपंच, ९५११५५२२२२

लोहसरची वैशिष्ट्ये
  ग्रामपंचायतीत संपूर्णपणे संगणकीकरण. सर्व १८ प्रकारचे दाखले संगणकीकृत दिले जातात.
  पाणीपट्टी, वीजपट्टीची शंभर टक्के दर महिन्याला वसुली. महिन्याला पट्टी भरणाऱ्यांना पाच रुपये प्रतियुनिटप्रमाणे सवलत. 
  दरवर्षी गुढीपाडव्यासह अन्य वेळी ग्रामसभा घेऊन त्यातूनच गावविकासाचे निर्णय 
  लग्नातील सत्कार, वरात यांना फाटा. त्याऐवजी शाळा, मंदिराच्या कामांसाठी निधी 
  लोकसहभागातून शाळेला संगणक उपलब्ध 
  गणेश मंडळाचे कार्यकर्तेही पाच वर्षांपासून अनाठायी खर्च टाळून शाळा, पाणी व्यवस्थेसाठी निधी देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com