उत्पादन घटल्याने कापसाचे दर वाढण्याची शक्यता

राजेंद्र जाधव
सोमवार, 17 डिसेंबर 2018

देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर परिणाम होईल तसेच कापसाच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर परिणाम होईल तसेच कापसाच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

भारतात कापूस उत्पादन घसरल्याने अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया कापूस निर्यातीत आघाडी घेतील. या देशांतून प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानला कापूस निर्यात होईल. या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर सुधारतील. जूनमध्ये गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर कापसाच्या दरात १६ टक्के घसरण झाली आहे.

सध्या कापसाचे दर तुलनेने जास्त असले तरी आवक अजूनही वाढलेली नाही. कापूस उत्पादन कमी होणार असल्याचे ते लक्षण आहे. 

''साधारणपणे नवीन कापसाची आवक ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तिचा वेग आणि आकार वाढतो. परंतु यंदा आवक नरम आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १०० लाख गाठी कापूस बाजारात आला होता. यंदा मात्र केवळ ७० लाख गाठी कापसाची आवक आहे,'' असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. गुलाबी बोंड अळीमुळेही कापसाच्या लागवडीवर परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे यंदा भारत १०० लाख गाठी कापूस निर्यात करेल, असा विश्वास व्यापाऱ्यांना जून महिन्यात वाटत होता. परंतु आता हे चित्र बदलले असून स्थानिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढतील, वाढीव माल कमी राहील आणि निर्यात मंदावेल, असे कापूस निर्यातदार अरुण सेखसरिया यांनी सांगितले. ''यंदा ५० ते ६० लाख गाठी कापूस निर्यात होईल. काही महिन्यांनंतर निर्यातीत वाढ होईल, कारण भारतीय कापूस स्वस्त आहे,'' असेही सेखरिया म्हणाले.  

भारत २०१८-१९ या हंगामात ३२५ लाख गाठी कापूस उत्पादन करू शकेल. २००९-१० नंतरचा हा नीचांक आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीनंतर कापूस उपटून काढला. तिथे नेहमीप्रमाणे दुसरी आणि तिसरी वेचणी होणार नाही.  
- चिराग पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जयदीप कॉटन फायबर्स प्रा.लि.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of production is expected to increase the rate of cotton