ममताबाई झाल्या परसबागेच्या गाइड

परसबागेत लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकामध्ये ममताबाई भांगरे.
परसबागेत लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकामध्ये ममताबाई भांगरे.

अकोले (जि. नगर) तालुक्याच्या आदिवासी भागातील देवगावच्या ममताबाई भांगरे यांची ओळख ‘परसबागेच्या गाइड' म्हणून झाली आहे. परसबाग संकल्पनेतून अकोले तालुक्यातील सुमारे पाच हजार कुटुंबाला आधार मिळाला. बचत गटातील महिलांनी शेती विकासाच्या बरोबरीने पिकांच्या देशी जातींचे जतन केले आहे. बियाण्यांच्या विक्रीतून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

नगर जिल्ह्याच्या उत्तरेला असलेला अकोले हा डोंगराळ तालुका. या तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस असल्याने भात हेच प्रमुख पीक. आदिवासी भागातील देवगावमधील ममताबाई देवराम भांगरे यांच्या कुटुंबाची चार एकर शेती आहे. त्यांची शेतीमधील प्रयोगशीलता पाहून बाएफ संस्थेने त्यांना शेती विकासासाठी मार्गदर्शन केले. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ममताबाईंनी घराजवळ वेगवेगळ्या पिकांच्या देशी जातींची लागवड करत परसबाग संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. विविध पिकांच्या देशी जातींच्या लागवडीमुळे परसबाग समजून घेण्यासाठी अनेक महिला, विद्यार्थी त्यांच्याकडे भेट देतात. त्यामुळे ममताबाईंची ओळख आता ‘परसबागेच्या गाईड' अशी झाली आहे.

देशी जातींचे जतन आणि उत्पादन 
ममताबाई भांगरे अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील पिकांच्या विविध देशी जातींचे संवर्धन करतात. ममताबाईंकडे भाताच्या रायभोग, आंबेमोहर, काळभात, घरीकोळपी, हरी कोळपी या जाती आहेत. वरई, नागली, भोपळा, डांगर, हरभरा, मसूर, वटाणा, काकडी, खरबूज, घेवडा, वाल, शेपू, कंदमुळांचीही लागवड असते. याचबरोबरीने दिवा, बावा, बडधा, पाचूट कांदा, कोळूची, डाव्याची, बरकीची, कुरडूची, भोकरीची, चिचुरडा, फांदा, चाई, सुरणकंद, फवदार, करजकंद, चाईचा मोहर, बडधा कंदा, चंदन बटवास, मेंक, काळीआळू, कोयरी, चाईचा कंद, पांढरी आंबाडी, बडधा यासह सुमारे सत्तर गावठी भाज्या तसेच देशी जातींचे संवर्धन करतात. 

महिलांना मिळाला आर्थिक आधार 
ममताबाई भांगरे यांच्या पुढाकारातून अकोले तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक गावांत परसबाग संकल्पना राबवली जात आहे. साधारण पावसाळ्यात घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत विविध देशी जातींची लागवड केली जाते. त्यातून बीजोत्पादन करून या बियाणांची विक्री केली जाते. देशी बियाणे विक्रीतून साधारण प्रत्येक महिलेला वर्षाला आठ ते दहा हजार मिळतात. बाएफ संस्थेमार्फत राज्य तसेच परराज्यात देशी बियाणांची विक्री केली जाते. ममताबाई यांच्यासह परिसरातील महिला परसबागेत विविध भाजीपाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. परिसरातील मोठ्या गावात भाजीपाल्याची विक्री केली जाते. याचबरोबरीने बियाणे उत्पादनदेखील केले जाते. त्यातूनही महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.

गांडूळ खताच्या गोळ्या
ममताबाई भांगरे चार एकरांपैकी दरवर्षी साडेतीन एकरांत भात लागवड करतात. गेल्या काही वर्षांपासून बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ममताबाईंनी सुधारित पद्धतीने सेंद्रिय भात शेती सुरू केली. भात पिकाला त्या गांडूळ खताचा वापर करतात. मात्र बहुतांश जमिनी उताराच्या असल्याने दिलेले गांडूळ खत पाण्यासोबत वाहून जाते. त्यामुळे एक दिवस त्रासून ममताबाईंनी गांडूळ खत टाकताना चिखलाचा गोळा उचलला आणि जोरात आपटला. हा गोळा मातीत तसाच रुतला. यातून त्यांना मोकळे गांडूळ खत देण्याएवजी गांडूळ खताच्या गोळ्या करून त्या भात पिकाला वापरण्याची संकल्पना सुचली. गेल्या सहा वर्षांपासून चारसूत्री पद्धतीने भात लागवडीमध्ये ममताबाई गांडूळ खत गोळ्यांचा वापर करतात. भात लागवडीच्या आधी महिनाभर त्या गांडूळ खताच्या गोळ्या तयार करतात.

पूर्वी त्यांना भाताचे एकरी दहा क्विंटल उत्पादन मिळायचे, परंतु सुधारित तंत्राने त्यांनी गेल्या आठ वर्षांत २० क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. गेल्यावर्षी त्यांनी दीड एकरावर एसआरटी तंत्राने भात लागवड केली होती. यंदापासून सर्वच क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनुसार भात लागवडीचे नियोजन आहे. ममताबाई थेट ग्राहकांना सेंद्रिय तांदळाची ८० रुपये किलो दराने विक्री करतात.

गांडूळ खत युनिट
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना बाएफ संस्थेचे तांत्रिक सहकार्य केले आहे. संस्थेने ममताबाई भांगरे, शांताबाई धांडे यांच्यासह सातशेहून अधिक महिला शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मिती युनिट दिले आहे. ममताबाई आणि शांताबाई दर वर्षी प्रत्येकी पंधरा टन गांडूळ खत निर्मिती करतात. या खताचा वापर त्या स्वतःच्या शेतीत करतात.

बचत गटातून देशी बियाण्यांची विक्री 
देवगाव, आंबेवंगणसह परिसरातील महिलांनी एकत्र येऊन संतोषीमाता महिला बचतगट स्थापन केला. परसबाग संकल्पना बाएफ संस्थेने पुढे आणल्यानंतर आतापर्यंत सुमारे अडीच हजार महिलांच्या दारात परसबाग उभी राहिली आहे. ममताबाई भांगरे तसेच गटातील महिला विविध पिकांच्या देशी जातींचे संवर्धन करतात. गटाच्या माध्यमातून देशी बियाणाचे कीट तयार करून मागणीनुसार बाएफमार्फत विविध ठिकाणी पुरवठा केला जातो. 

पाच हजार लोकांनी दिल्या भेटी 
ममताबाई भांगरे यांच्या संकल्पनेतून देवगाव परिसरामध्ये पावसाळ्यात लागवड केलेल्या देशी जातींच्या परसबागेला आतापर्यंत पाच हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत. चारसूत्री भात लागवड आणि गांडूळ खताच्या गोळ्यांचा वापर करून चांगले उत्पादन मिळविणाऱ्या ममताबाई भांगरे यांचा बाएफ संस्थेने २०१५ मध्ये आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला होता, असे बाएफचे कार्यकर्ते राम कोतवाल यांनी सांगितले. 

परिषदेत सहभाग
कोलकता येथे नुकतीच (७ नोव्हेंबर) महिला शास्त्रज्ञ आणि उद्योजक परिषद झाली. त्यामध्ये देशभरातून महिला शास्त्रज्ञ सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील ममताबाई भांगरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांनी गांडूळ खताच्या ब्रिकेटचा भात शेती आणि परसबागेसाठी वापर याबाबत माहिती दिली. ममताबाई भांगरे यांनी आतापर्यंत २०० कार्यक्रमांतून परसबागेची माहिती दिलेली आहे.

गावागावांत साकारतेय परसबाग...
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बाएफ संस्था शेतकरी तसेच महिला बचत गटांना मार्गदर्शन करीत आहे. या प्रयत्नातून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. ममताबाई भांगरे यांच्या पुढाकारातून अनेक गावांतील महिलांनी परसबागा फुलवल्या आहेत. त्याचा त्यांना फायदाच होतो तसेच देशी जातींचेही संवर्धन होत आहे.
- जतीन साठे, ९४२३०२०१३६ ( विभागीय अधिकारी, बाएफ, नाशिक )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com