श्रमांवर आधारित तयार केली वेतनव्यवस्था  

subhash sharma
subhash sharma

शेतात राबायला मजूर नाहीत आणि मिळालेच तरी वाढलेली मजुरी परवडत नाही. अनेकवेळा त्यांना घरापासून ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागते. एवढे करूनही त्यांच्याकडून अपेक्षित दर्जाचे काम होतेच असेही नाही. प्रत्येक शेतकऱ्याची आजची हीच व्यथा आहे. केवळ या समस्येपोटी अनेकांना शेती वा पूरक व्यवसाय थांबवणे भाग पडले आहे. सुभाष शर्मा यांचे क्षेत्रही जास्त असल्याने त्यांना मजुरांची मोठी गरज भासते. साहजिकच मजूर व्यवस्थापन हाच त्यांच्या शेतीचा सर्वांत महत्त्वाचा गाभा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अत्यंत कुशलतेने त्यांनी हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

 श्रमाच्या आधारे वेतन  
शर्मा म्हणतात, की श्रमाच्या आधारे मजुरांना वतन दिले पाहिजे. तसे कौशल्य शेतकऱ्याने आत्मसात करायला हवे. त्यातून तीन दिवसांत होणारे काम एका दिवसातच पूर्ण होऊ शकते. आम्ही प्रत्येक चौरस फुटाचे गणित मांडून त्याचे अर्थकारण काढतो. दर चौरस फुटात किती सऱ्या हव्यात, किती लांब सरी पाडायची, त्यासाठी किती मजूर व मजुरी लागेल, असा हिशोब असतो. आपल्या शेताला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून शर्मा ही बाब सोपी करून सांगतात. 

कामांत गती आणण्यासाठी आम्ही ४०० ग्रॅम वजनाचे उपकरण तयार केले आहे. त्याला आखुडा म्हणतात. ते ५० रुपयांत तयार होते. मेथी, कोथिंबीर, पालक, कांदा यांच्या लावणीसाठी त्याचा उपयोग होतो. वास्तविक बी लावणीचे यंत्र आम्ही वापरू शकलो असतो; पण बाराही महिने मजुरांना काम द्यायचं. रोजगारनिर्मिती करायची हे आमचं उद्दिष्ट असतं. एक महिला आखुडा घेऊन मातीत रेषा तयार करते. दुसरी महिला आपल्या हातातील बी त्या रेषांवरून टाकत चालते. दहा बाय चार फूट रुंदीची सरी म्हणजे ४० चौरस फूट झाले. आता त्यातील कामाचा हिशोब करूया. तेवढ्या जागेत रेषा आखायला महिलेला २० सेकंद लागतात; तर बी टाकण्यासाठी २० सेकंद लागतात. प्रति ४० चौरस फूट जागेला एका कामामागे मजुरी निश्‍चित करायची. ती एक ते दोन रुपया होते.  

मेथी पिकातील मजुरीचे गणित
 मेथी पिकाचे प्रातिनिधिक उदाहरण घेऊया. तापमान कमी असल्यास त्याचे एकरी उत्पादन ४० क्विंटलपर्यंत; तर तापमान वाढल्यास ते ३० क्विंटलपर्यंत मिळते. आपण ३० क्विंटल गृहीत धरूया. त्यानुसार ४० चौरस फुटांत पावणेतीन किलो मेथी मिळते. दर ३० रुपये प्रतिकिलो पकडला तर मिळतात ८२.५० रुपये. दर अजून निम्मा म्हणजे १५ रुपये पकडला तर मिळतात ४१.२५ रुपये. म्हणजे ४० चौरस फुटात आपल्याला मिळणाऱ्या या उत्पन्नात मजुरी किती द्यायची हे निश्‍चित होते.  सारे पाडणे, बियाणे झाकणे, वखरणी असा तेवढ्या क्षेत्रासाठी प्रत्येकी दोन रुपये खर्च गृहीत धरूया. मेथीला निंदण करावे लागत नाही. भाजी काढण्याचा, बांधण्याचा, वाहतुकीचा, मध्यस्थांचे कमिशन असे अजून खर्च समाविष्ट केले तरी ४० चौरस फुटात सर्व खर्च ३० रुपये गृहीत धरूया. मिळणाऱ्या ८२.५०  रुपयांतून ते वजा केले तरी हाती ५२. ५० रुपये येतात. 

 तात्पर्य 
किती क्षेत्रात किती उत्पादन, दर व पैसे मिळताहेत याचे गणित मांडता आले तर मजुरांवर किती खर्च करायचा याची कल्पना येते. शेतीतील खर्च ३० ते ४० टक्क्यांत आला पाहिजे. हे कौशल्य 
अशा गोष्टीतून साध्य करता येते, असे शर्मा  सांगतात.

शरद माझा मुलगा
पारवा इथल्या शंभर एकरांतील व्यवस्थापनात महत्त्वाची जबाबदारी शरद सांभाळतो. तो मजूर नाही तर माझा मुलगाच आहे. त्याच्यावर तसं पूर्ण प्रेम ओतलं आहे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता इतकी वाढली आहे की शरद, उद्या हे करायचे म्हटले की शरदने ते काम आजच करून टाकलेले असते.

 महिलांना जास्त मजुरी
आमच्याकडे सुमारे १२ मजूर महिला कायमस्वरूपी असतात. पुरुषांपेक्षा आमच्याकडे त्यांनी जास्त मजुरी मिळते. त्याचे कारण म्हणजे त्या पहाटे चार वाजता उठतात. घरातील दैनंदिन कामे, स्वयंपाक, मुलांचे संगोपन या जबाबदाऱ्या सांभाळताना शेतातही त्या तेवढ्याच राबतात. त्यांच्या या श्रमाचा सन्मान झालाच पाहिजे, असं शर्मा यांचं म्हणणं आहे.

मला जास्त, तर मजुरांनाही जास्त  
आपल्याला जे दर मिळतात त्यानुसार नफ्याचा वाटा मजुरांना द्याल; तरच शेतकरी व मजूर यांचे ऋणानुबंध तयार होतील हे शर्मा कोथिंबिरीच्या उदाहरणावरून स्पष्ट करतात. जुडीला प्रतिकिलो २० रुपये दर असेल तर मजुरी दोन रुपये प्रतिकिलोप्रमाणे द्यायची. जुडीचा दर ३० रुपये  झाला तर मजुरी ३ रुपये करायची. दर २० रुपयांच्या खाली गेला तर मजुरी दीड रुपया करायची; पण हाच दर पाच रुपये किंवा त्याहून खाली घसरला तर मजुरी मात्र अजून कमी नाही करायची. मजुरांचे नुकसान होणार नाही एवढा दर त्यांचा निश्‍चित ठेवायचा. मला जास्त तर मजुरांनाही जास्त ही भावना हवी असे ते म्हणतात.

मी बाप, त्या लेकी
शेतात राबणाऱ्या माझ्या लेकी आहेत. मी त्यांचा बाप आहे. तसचं प्रेम त्यांना देतो. त्यांचे सुख-दुख वाटून घेतो. शेतीत पूर्णपणे प्रशिक्षित करून त्यांच्यात कौशल्य तयार केले आहे. म्हणून तीन दिवसांचे काम ते एका दिवसात आनंदाने पूर्ण करतात. त्यांना ते कष्ट वाटत नाहीत. अर्थात, तीन दिवसांचे वेतन त्यांना एका दिवसात मिळते. त्यांचे जीवनमान उंचावते. आणि माझेही. समाजासाठी चांगलं अन्न तयार करण्याचं काम ही मंडळी करतात. पाणी घडवणारे देखील हेच आहेत. त्यांनीच पर्यावरण तयार केलं. झाडांना जगवलं. प्रत्येक झाड लेकरासारखं जगवून त्याला मोठं केलं. यांच्या श्रमाशिवाय काहीच शक्य नाही.

‘ॲग्रोवन’ पुरस्काराच्या रकमेचाही मजुरांना हिस्सा
सुभाष शर्मा यांना यंदाच्या ‘ॲग्रोवन’ महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचे एक लाख रुपयांचे बक्षीस होते. या पुरस्कारात आपल्या मजुरांचे योगदानही मोठे होते. त्यामुळे रकमेतील महत्त्वाचा हिस्सा त्यांनाही दिल्याचे शर्मा यांनी अभिमानाने सांगितले. आपली देण्याची भावना जास्त असेल तेवढी परतावाही आपल्याला मिळतो, या तत्त्वावर त्यांची श्रद्धा आहे.

शर्मा यांचे चार ‘प्र’
शेतकरी व मजूर यांचे नाते दृढ होण्यासाठी शर्मा चार ‘प्र’ चा सिद्धांत वापरतात. ते पुढीलप्रमाणे
 प्रसंशा - आज चांगलं काम केलंस बरं का तू असं म्हणून मजुरांची पाठ थोपाटली तर त्यांना आनंद मिळतो.  
 प्रोत्साहन - असंच काम करीत राहिलात तर तुमची प्रगती आहे, अशी भावना त्यांच्यापुढे वेळोवेळी व्यक्त करणे.
 प्रलोभन - पैशांच्या स्वरूपात सन्मान. मालाला जसा वाढीव दर मिळत राहील त्यानुसार मजुरीत वाढ करून नफ्यातील हिस्सा त्यांना द्यायचा. दर खूप खाली घसरला तरी मजुरीचा दर मात्र फायदेशीर पातळीत ठेवायचा.  
 प्रबोधन - आपलं जीवन चांगलं घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा, दैनंदिन चिंता कशा दूर कराव्यात, मालकालाच जास्त नफा जातोय, आपल्या वाट्याला कमी येतंय, अशी भावना मजुरांत उत्पन्न होणार नाही यासाठी त्यांचं प्रबोधन करणं.

सुभाष शर्मा,  ८८३०१७४६६१, ९४२२८६९६२० ,  (सकाळी व संध्याकाळी ८ ते १० या वेळेत)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com