‘एक्झॉटिक’ भाजीपाला  शेतीतून वेगळी वाट...

‘एक्झॉटिक’ भाजीपाला  शेतीतून वेगळी वाट...

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले  शिगावचे शिवार म्हणजे वारणा नदीच्या पाण्याने समृद्ध असा उसाचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बारवडे यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे सहा एकर शेती आहे. 

लहान वयात पेलली जबाबदारी 
खरे तर नवी पिढी नोकरी किंवा शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायाच्या मागे लागली आहे असे म्हटले जाते. इथे तर बारवडे कुटुंबातील नव्या पिढीचा कौस्तुभ सारी शेती घरातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळतो आहे. त्याचे वडील राजेंद्र बॅंकेत तर चुलते सुकुमार साखर कारखान्यात नोकरी करतात. सर्जेराव हे अन्य  चुलते हयात नाहीत. कौस्तुभचे टेक्सटाईल विषयातील डिप्लोमापर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे वय अवघे २१ वर्षे आहे. मात्र सुरवातीपासून शेतीचीच आवड व त्यात नवीन काही करण्याचा ध्यास त्याने बाळगला आहे.  

परदेशी भाजीपाला लागवड 
कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे येथील नातेवाइकांकडे कौस्तुभने परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाला लागवडीची शेती पाहिली. त्याबाबत अधिक अभ्यास केला. या पिकांचा प्रयोग आपणही करावा असे त्याने निश्‍चित केले. त्यासाठी वडीलधारी मंडळींचा सल्लाही घेतला. नातेवाइकांचे मार्गदर्शन घेत सुमारे चार वर्षांपूर्वी झुकेनी पिकापासून वेगळ्या वाटेचा श्रीगणेशा केला. सुरवातीला समस्याही आल्या. पण त्यांची सोडवणूक करीत हा प्रयोग यशस्वीही केला. 

पीक नियोजन 
 कौस्तुभ सांगतो, की नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात परदेशी भाजीपाल्याला फार मार्केट नसते.

 या काळात पर्यायी उत्पन्नस्रोत - बेसील 

बेसीलचा उपयोग
बेसील ही तुळसवर्गीय औषधी वनस्पती आहे. त्याला चांगला सुगंध आहे. हर्बल टी तयार करण्यासाठी त्याची पाने वापरली जातात. अन्य भाज्यांमध्ये स्वाद येण्यासाठी बेसीलचे महत्त्व आहे. यंदा झुकेनीची काढणी केल्यानंतर तण काढून जमीन चांगली तयार केली. पूर्वीच्या पॉलिमल्चिंगवर च बेसीलची रोपे लावली. त्यामुळे मल्चिंगचा खर्च वाचला.  

कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणाई
शिगावात बारवडे यांचे राजेंद्र, सुकुमार, सर्जेराव या तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. कौस्तुभ टेक्सटाईल पदविकेव्यतिरिक्त दुरस्थ शिक्षणपद्धतीनुसार बी.कॉमचे शिक्षणही घेत आहे. कुटुंबातील अवधूत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. धनाजी एमई (मेकॅनिकल) असून प्राध्यापक आहेत. संतोष डीफार्मसी आहे. 

 ज्ञान व प्रशिक्षण
परदेशी भाजीपाला शेती या भागात पहिल्यांदाच असल्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंत फारशी माहिती या कुटुंबाला नव्हती. कौस्तुभ यांनी नातेवाइकांकडून त्याबाबत ज्ञान घेतले. तसेच मजुरांना प्रशिक्षण दिले. आता मजूरही या शेतीत कुशल झाले आहेत.

मार्केट 
 कौस्तुभ आपला उत्पादीत माल मुंबई, पुणे, गोवा, पुणे व हैदराबाद या ठिकाणी पाठवतात. पंचतारांकित हॉटेल्समधून या मालास मागणी असते. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग शिगावपासून दहा किलोमीटरवर आहे. या भागातील वाठारनजीक खासगी ट्रॅव्हल्समधून व्यापाऱ्यांकडे माल पोचवला जातो. 

 हैदराबादला माल पाठवण्यासाठी मात्र जवळच्या जयसिंगपूरला जावे लागते. तेथपर्यंत पोचवणे, वाहतूक व काढणी असा प्रति दोन गोणींमागे खर्च (४० किलो) ५०० रुपये येतो. 

 दरवर्षी सुमारे अर्धा एकर क्षेत्रच वापरले जाते. याचे कारण म्हणजे परदेशी भाज्यांची मागणी मर्यादीत स्वरूपाची असते. विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मागणी व दर विचारावे लागतात. त्यानुसार क्षेत्राचे नियोजन करावे लागते. 

 अन्य कोणत्याही भाजीपाला पिकांना एक्झॉटिक भाज्यांएवढा दर मिळणे अवघड जात आहे. त्यामुळे जरी कमी क्षेत्रावरील शेती असली तरी ती किफायतशीर होत असल्याचे कौस्तुभ सांगतात.

कौस्तुभ यांच्या परदेशी भाजीपाला शेतीची वैशिष्ट्ये 
 पारंपरिक शेतीपेक्षा परदेशी भाजीपाला शेतीची धरली वाट 
 या शेतीत चार वर्षांपासून सातत्य
 उसाची काढणी झाल्यानंतर रिकामे क्षेत्र यासाठी वापरले जाते.
 उत्पादनासह तोडणी केलेला माल राष्ट्रीय महामार्गापर्यंत नेणे, पॅकिंग करून पाठवणे या जबाबदाऱ्याही कुशलपणे सांभाळतात. 
 कुटुंबातील अन्य सदस्यांची मोठी मदत  
 भविष्यात क्षेत्र वाढवण्याचा विचार.

सध्याची शेती दृष्टिक्षेपात 
 परदेशी भाजीपाला - दरवर्षीचे क्षेत्र - सुमारे अर्धा एकर 
 त्यातील पिके- झुकेनी, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, रेड कॅबेज 
 नोव्हेंबर २०१७- प्रथमच - बेसील (तुळसवर्गीय)
 

तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी शोधत असतानाच घरच्या शेतीत वेगळे करण्यावर भर द्यावा. सातत्य ठेवल्यास त्यात यश हमखास मिळते.
- कौस्तुभ बारवडे, ९०११९२३९९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com