मराठवाड्याची होरपळ वाढली; शिवारं सुन्न

मराठवाड्याची होरपळ वाढली; शिवारं सुन्न

औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍या जनावरांची आबाळ पाहावेना म्हणत भविष्याविषयी चिंताक्रांत झालेले प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे चेहरे बरंच काही सांगून जातात...

औरंगाबाद जिल्ह्यातील मंगरूळ घोडक्‍याची वाडी, एकलहरा, कौडगाव, अडगाव (ठोंबरे), जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या वाकुळणी, बाजार वाहेगाव, नाणेगाव, सायगाव, डोंगरगाव, बुट्टेगाव, काजळा, अंबड तालुक्‍यातील बदापूर, लोणार भायगाव, खेडगाव, देशगव्हाण, भायगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील एकतुणी, आडूळ आदी गावशिवारं सुन्न झाली आहेत. 

मंगरूळचा नामदेव चिंचोले हा युवा शेतकरी. पाच एक मालकीची अन्‌ जवळपास दहा एकर बटईची शेती वाहणाऱ्या नामदेवांकडं जवळपास १२ जनावरं. त्यात ८ गाई व चार बैल. नामदेव म्हणाले, ‘‘दसऱ्यापासून चारा अन्‌ पाणी इकतचं हाय. १ टन ऊस, १ टन भुसा अन्‌ घरचं थोडं बहुत सरमाडं टाकून कसेबसे पंधरा दिवसं भागतात. जेमीनीत ओलंच नसल्यानं रब्बीची पेरणीच करता आली नाय. पीक नसल्यानं यंदा खता बियांचे पैसे फिटले नाय. आजवरं चाऱ्यापोटी ५० हजार खर्च झाला. इकून तिकून आणून भागवनं चाललं. महिना-पंधरवड्यानं गावड्या व्यातील तवां थोडा हातभार लागलं अशी आशा हायं. २०० उंबऱ्याच्या आमच्या गावातील ५०-६० मुलांनी हाताला काम मिळावं म्हणून एमआयडीसी गाठलीया. जनावरं इकता येत नाहीत. त्यामुळं त्यांना खाऊ घालून सकाळ संध्याकाळ जमलं तसं काम करणं सुरू हायं.’’  खायला दाणे झाले नाही... जित्राबाचं जगणं अवघडं झालयं

घोडकेवाडीचे शिवाजी घोडके म्हणाले, ‘‘दरवर्षी निदान खायला दाणे व्हायचे यंदा ते बी झाले नायं. अन्‌ पाण्याचं त भलतचं अवघड होऊन बसलं. यंदाच्या दुष्काळचं पहिलं संकट ओढावलं ते जित्राबावर. त्यांना ना खायला चारा मिळे ना प्यायला पाणी. लेकरापेक्षा जास्त जनावरावरं प्रेम करणारे आमी. त्यामुळे कुणी वाळेल चिळेल आणलं, कुणी सोनं नाणं गहाण ठेवून मिळलं तिथून चारा, भूस आणलं. आमच्या ईहिरीला थोडबहूत पाणी. संकट पाहून आमी  चारां पिकं घेण्याऐवजी ते जित्राबांना प्यायला ठेवलं. कारणं आपणं खायला लागणारं इकत आणू शकतो, पणं पाणी कुठून आणि किती इकत आणणार. आता आमच्या शेतात मंगरूळ, एकलहरा, नागोण्याची वाडी अन्‌ आमच्या गावातील जित्राब पाणी प्यायला येतात.’’

अडगाव (खुर्द)चे सुनील कुलकर्णी म्हणाले, ‘‘एक टन भूस आणायला दहा हजार खर्ची घातले. खरीप रब्बीत काहीच हाती न आल्यानं कुटुंबाचा चरितार्थ अन्‌ आठ जनावरं जगविण्यासाठी दोन भावांनी एमआयडीसीत कामाला जाणं सुरू केलं. माणसाला खायला राशनमधून मिळल पण जनावराचं काय. शिवाय माणसांना टॅंकरनं पाणी मिळतयं. पणं जनावरांना टॅंकरनं पाणी इकत घेऊन पाजण्याशिवाय पर्याय नाही. पण ते कुठवर शक्‍य. कारण काहीच न पिकल्यानं अनेकांकडे पैसेच नाहीत’’

अडगावचे भाऊसाहेब बोर्डे म्हणाले, ‘‘वर्षभरापूर्वी गीर गाय आणली. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावं म्हणलं. पणं आता जनावरांच्या चाऱ्याचं भीषणं संकट उभं राहिलयं. उन्हाची तीव्रता वाढली, कधी नव्हे एवढी सीताफळाची झाडं सुकली. ठीबकनं पाणी देतोयं, पण उन्हाची वाढलेली तीव्रता, घटत चाललेलं पाणी पाहतां झाडांच्या सालीतील पाणीच सुकून गेलं तर सीताफळाची बाग वाचल का हा प्रश्न आहे.’’

भीकनराव अवघड पाटील म्हणाले, ‘‘अकरा एकरांत ४० क्‍विंटल सरकी झाली. भाव नव्हतां म्हणून दाबून धरली. तं कपाशीचे भावच सुधरेना, काय करावं.’’ 

वाकुळणीच्या अवघड पाटलांना तर शेतीची वाटच अवघड झाल्याचा अनुभव आहे. गावातील कैलास कोळेकर यांना पंधरवड्यापूर्वी पाण्याअभावी शेकडो मोसंबीची वाळलेली झाडं तोडून टाकावी लागली. अर्जुन कोळकर यांना वाचललेल्या मोसंबीच्या दोनशे झाडांतून यंदा १ लाख ३ हजार मिळाले. तर त्यावर फक्‍त पाण्यासाठी जुलैपासून ८० हजार खर्च झाला. पाच किलोमीटरवरून पैसे ॲडजेस्ट होतील तोवर आणून. पैशाची व्यवस्था झाली नाही तर बाग सोडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे अर्जुन कोळकर यांनी सांगितले. तुकाराम अवघड, शिवाजी अवघड, संदीपान मदन, राधाकिसन भाबड, ज्ञानेश्वर फलके, कैलास कोळकर आदी दुष्काळाची व्यथा मांडताना कमालीचे चिंताक्रांत दिसले. कोणतंही व्यसन नाही. कोणता शोक नाही, शेतीतलं पिकलेलं शेतीतच घातलं तरी एका शेतकऱ्याला साडेचार एकर जमीन इकावी लागली. त्यामुळं शेतीतून आपलं भल व्हईल असं दिसत नसल्याची सामूहिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे व्यवस्था पाहणाऱ्या मायबाप सरकारचं अन्‌ यंत्रणेच लक्ष वेधणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com