पेरूची अभिवृद्धी करण्याच्या पद्धती

पेरूची गुट्टी (लेअरिंग) कलम करण्याची पद्धत.
पेरूची गुट्टी (लेअरिंग) कलम करण्याची पद्धत.

सध्या पावसाळी वातावरण सुरू होत आहे. अशा वातावरणामध्ये पेरूची रोपे तयार करण्यासाठी अनुकूल वातावरण असते. पेरूची अभिवृद्धी बियांपासून, गुट्टी तयार करून किंवा कलम पद्धतीने करता येते. 

पेरू हे समशितोष्ण कटीबंधातील महत्त्वाचे फळ आहे. पेरूची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करणे (लैंगिक) व अलैंगिक (व्हेजिटेटिव्ह) अशा दोन्ही पद्धतीने करता येते. 

बियांपासून अभिवृद्धी - 
यात पेरूची कलमे तयार करण्यासाठी खुंट तयार केली जातात. पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये (आकार २०x१० सें.मी., जाडी १०० मायक्रॉन) रोपे तयार करावीत. त्यासाठी पॉलिथिन पिशव्यामध्ये ३ः१ः१ या प्रमाणामध्ये अनुक्रमे माती, रेती आणि सेंद्रिय खत यांचे एकत्रित मिश्रण भरावे. या पद्धतीत खुरपणीचा खर्च वाचतो. तसेच पाणी देणे, उचलणे (रोपे गाडीत भरणे) इ. सोयीस्कर होते.

   बियांची निवड व रोपांची निर्मिती करण्यासाठी पूर्णतः पिकलेल्या निरोगी फळांपासून बीजप्रक्रिया ताजे बिया वेगळ्या कराव्यात. स्वच्छ पाण्याच्या साह्याने हलक्‍या धुवून गुळगुळीत बियांवरील आवरण काढावे. पेरूचे बियाचे बाह्यआवरण कठीण असल्यामुळे उगवणीसाठी वेळ लागतो. उगवणक्षमता वाढवण्यासाठी परिपक्व बिया पाण्यामध्ये १२ तास भिजत ठेवाव्यात. फळातून बाहेर काढल्यानंतर त्वरित या बिया जमिनीत किंवा पिशवीत लावाव्यात, अन्यथा त्याची उगवणक्षमता कमी होते. 

   रोपवाटिकेमध्ये मुळकूज या रोगामुळे नुकसान होते. त्याच्या नियंत्रणासाठी पेरूच्या बिया२ मिनिटांसाठी कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात भिजवून घ्याव्यात. पेरूच्या रोपवाटिकेमध्ये मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. 

   बिया लावल्यापासून तीन आठवड्यांपर्यंत रोपांची उगवण होते.
   ८-१२ महिन्यांमध्ये कलम करण्याइतकी रोपे सक्षम होतात. 

अभिवृद्धीच्या अलैंगिक पद्धती 
गुट्टी कलम -

पावसाळ्याच्या हंगामामध्ये गुट्टी कलम खूप किफायतशीर ठरते. पावसाळ्यामध्ये मुळे फुटण्याचे प्रमाण अधिक असून, गुट्टी यशस्वी होण्याचे प्रमाण ८०-८५ टक्के असते. गुटी कलम करण्यासाठी फांदीची लांबी १-१.५ मीटर व वय १ वर्षे असावे.

गुट्टी कलम करण्याची पद्धती -
   साधारणतः १ वर्षाच्या फांदीवर २.५ - ३ सें.मी. लांबीवर गोलाकार पद्धतीने साल काढावी. ही साल फांदीच्या शेंड्यापासून ४५ सें.मी. अंतर दूर काढावी.
   उत्कृष्ट मुळे फुटण्यासाठी साल काढलेल्या भागाच्या वरील टोकाला ४००० - ५००० पीपीएम आयबीए (४-५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) हे संजीवक लावावे. तो भाग त्वरीत ओलसर स्पॅग्नम मॉसने गुंडाळून प्लॅस्टिक पट्टीने घट्ट बांधून टाकावा. 
   नंतर ३-५ आठवड्यामध्ये त्या भागापासून मुळे फुटण्यास सुीवात होते. साधारणतः ४ आठवड्यामध्ये सक्षम मुळांची संख्या वाढते. 
   ती गुट्टी कट घेतलेल्या खालील भागापासून धारदार सिकेटरने वेगळी करावी. त्यावरील प्लॅस्टिक पट्टी काढून मुळांना धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने पॉलिबॅगमध्ये लावाली. ही रोपे काही दिवस  शेडनेटमध्ये ठेवावीत. 

कलम पद्धतीने अभिवृद्धी
पेरूमध्ये निमुळते कलम (वेज ग्रॉफ्टिंग) हे अभिवृद्धीसाठी किफायतशीर ठरते. या पद्धतीमध्ये पॉलिथिन बॅगमध्ये बियांपासून तयार केलेले ६-८ महिन्याचे रोपे खुंट म्हणून निवडावीत. या खुंटाची जाडी साधारणतः अर्धा ते एक सें.मी. असावी.

वेज ग्रॉफ्टिंग (निमुळते कलम) करण्याची पद्धती -
   सायनची निवड - उत्कृष्ट फळांचे उत्पादनक्षम व गुणवत्ताधारक फळांच्या मातृवृक्षापासून शेंडा, सायन निवडावा. मातृवृक्ष रोग व किडीपासून मुक्त असावेत. अशा मातृवृक्षांपासून साधारणतः ३-४ महिन्याचे १५-२० सें.मी. लांबीचे, ३-४ निरोगी डोळे असलेले शेंडे निवडावेत. या शेंड्यांना सायन असे म्हणतात.  सायनची जाडी देखील ०.५ - १ सें.मी. (पेन्सिल जाडीची) इतकी असावी. 
   सायन काडी निवड केल्यानंतर मातृवृक्षावरून कट करण्याआधी आठ दिवस त्यावरील पाने काढून टाकावीत. या प्रक्रियेमुळे सायन काडीवरील सुप्तावस्थेतील डोळे फुगण्यास मदत होईल. कलम केल्यानंतर सायन काडीवरील डोळ्यांपासून फुटवे (अंकुर) फुटतील.
   पॉलिबॅगमधील खुंट जमिनीपासून १५-२० सें.मी. उंचीवरील कट करावे.( यास ‘हिडींग बॅक ’ असे म्हणतात.) कट केलेल्या वरील टोकावर ३-५ से.मी. खोल इंग्रजी ‘व्ही’ आकाराचा कट घ्यावा. त्यासाठी  निर्जंतुक केलेल्या तीक्ष्ण धारदार कलम चाकूचा वापर करावा. 
   कलम काडीच्या (सायन) खालच्या बाजूला ३.५ सें.मी. लांब निमुळत्या आकाराचा कट घ्यावा. तो भाग खुंटावरील व्ही आकाराच्या खाचेमध्ये घट्ट बसवावा. प्लॅस्टिक पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. 
   कलम करताना सायन व खुंट यांचा आतील भाग (कॅम्बीअन थर) तंतोतंत जुळला पाहिजे याची दक्षता घ्यावी. 
   कलम केल्यानंतर १०-१२ दिवसांत सायन कांडीला अंकुर फुटतात. नंतर फुटवे फुटलेले कलम शेडनेटमध्ये ठेवावेत.

पेरूंच्या महत्त्वाच्या जाती
ललित 

ही जात लखनऊ येथील मध्यवर्ती समशीतोष्ण फळ संशोधन संस्थेमध्ये ॲपल कलर या जातींपासून निवड पद्धतीने विकसित केली आहे. आतील गर गुलाबी रंगाचा आहे. 

अलाहाबाद सफेदा 
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध जात असून, या जातीचे फळ साधारणतः १८५ ग्रॅम असते. या फळाची चव (गोडी) उत्कृष्ट असते.

अर्का अमुल्या 
ही संकरित जात असून, या जातीची फळे १८०-२०० ग्रॅम वजनाची असतात. ही संकरित जात भारतीय फळबाग संशोधन संस्था, बेंगलोर येथे अलाहाबाद सफेदा व ट्रिप्लॉईड यांच्या संकरातून तयार केलेली आहे. या जातीचा गर पांढरा असून, गोडी (टीएसएस १२ अंश ब्रिक्‍स) आहे.

अर्का मृदुला 
ही जात भारतीय फळबाग संशोधन संस्था, बेंगलोर येथे अलाहाबाद सफेदा या जातींपासून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे फळ साधारणतः १८० ग्रॅम व टीएसएस १२ अंश ब्रिक्‍स असतो.

श्‍वेता 
मध्यवर्ती समशीतोष्ण फळ बागवाणी संस्थेमध्ये (लखनऊ) निवड पद्धतीने विकसित केलेल्या या जातीच्या फळाचा गर पांढरा आहे.

अर्का किरण 
ही संकरित जात कामसारी व पर्रपल लोकल यांच्या संकरातून विकसित केली आहे. या फळांचा गर गुलाबी असून सरासरी वजन ९०-१२० ग्रॅम असते. या फळाचा टीएसएस १३-१४ अंश ब्रिक्‍स असतो.

व्हीएनआर बिही 
ही जात उत्तर प्रदेशातील खासगी नर्सरीमध्ये विकसित केलेली आहे. या जातीचे फळ ३०० ग्रॅम ते १.२ किलोपर्यंत वजनाचे असते. फळांचा रंग मोहक आहे. लवकर येणारी जात असून, काढणीपश्‍चात टिकवणक्षमता चांगली आहे. 

सरदार (एल-४९) 
सरदार जातीच्या फळाचा गर पांढरा असून, या जातीच्या फळाचे वजन साधारणतः १७५ ग्रॅम असते. ही जात डॉ. चिमा यांनी १९२७ मध्ये पुणे   
येथील गणेशखिंड फळ संशोधन केंद्रामध्ये अलाहाबाद सफेदा या जातीपासून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची चव उत्कृष्ट असते.

- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (उद्यानविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रह्मा, सरदार कृषिनगर दांतिवाडा, कृषी विद्यापीठ, गुजरात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com