मुरघास - चाराटंचाईवर उत्तम पर्याय

जनावरांच्या संख्येनुसार मुरघास तयार करण्याचे प्रमाण ठरवावे.
जनावरांच्या संख्येनुसार मुरघास तयार करण्याचे प्रमाण ठरवावे.

उन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक असा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असणारा हिरवा चारा योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येईल व पशू उत्पादनात सातत्य राखता येईल.

हिरवा चारा हवाविरहित जागेत ठराविक काळ ठेवल्यावर, आंबवण्याची क्रिया होऊन जो चारा तयार होतो, त्यास मुरघास म्हणतात. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण राखले जाते, तसेच पौष्टिकतेत व चवीत वाढ झाल्यामुळे जनावरे आवडीने खातात. मुरघास कच्चा खड्डा, सिमेंट- काँक्रिट खड्डा व टाकी, प्लॅस्टिक व स्टील पिंप किंवा मुरघास बॅगमध्ये करता येतो.
                  
उपयुक्त चारा पिके 
मुरघास बनवण्यासाठी जाड व भरीव खोड असणारी, साखरेचे प्रमाण जास्त असणारी (आंबवणप्रक्रिया घडण्यासाठी) एकदल पिके उपयुक्त असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मका, ज्वारी, बाजरी, ओट, संकरित नेपिअर गवत (हत्ती गवत), बांधावरील गवते, उसाचे वाढे इ. पिकांपासून मुरघास बनवता येतो. परंतु सर्वोत्तम मुरघास हा मका पिकापासून बनतो.  
 
पिकांची कापणी 
  मका, ज्वारी आणि बाजरी - ५० टक्के फुलोऱ्यात ते चिकात असताना,
 ओट - लोंबी बनताना ते चिकात असताना, 
 संकरित नेपिअर गवत (हत्ती गवत) ः कापणीनंतर ३० ते ४० दिवस वाढलेले, 
  वरील अवस्थेतील पिकांची कापणी करून मुरघास तयार करण्यासाठी वापरावे. 
  मुरघास बनवताना चारा पिकांमध्ये ६५-७० टक्के पाणी आणि ३०-३५ टक्के शुष्क भाग असणे आवश्यक असते. 
  ताज्या हिरव्या चाऱ्यात ८०-८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. 
  मुरघासासाठी आवश्यक ६५-७० टक्के पाण्याचे प्रमाण आणण्यासाठी कापलेला चारा ५ ते ७ तास जागेवर सुकू द्यावा. 
  पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी चारा कुट्टीचा हाताने दाबून गोल चेंडू करावा, चेंडू लगेच उलगडला, तर पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे असे समजावे, जर चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला, तर पाण्याचे प्रमाण खूप आहे असे समजावे आणि जर चाऱ्याचा चेंडू हळूहळू उलगडला, तर चाऱ्यात मुरघास बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.

तयार करण्याचे प्रमाण
  मुरघास किती प्रमाणात करून साठवून ठेवावा हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, किती जनावरांना, किती दिवस आणि किती खाऊ घालणार, साठवण करण्यास उपलब्ध जागा, चारा उपलब्धता इ.
  समजा, एखाद्या शेतकऱ्याकडे ४ दुधाळ गाई असून, चारा तुटीचा काळ ९० दिवस आहे. प्रत्येक गाईला इतर आहारासोबत दररोज २० किलो मुरघास खाऊ घालायचा आहे. म्हणजे, ४ गाई x २० किलो मुरघास x ९० दिवस =  ७२०० किलो मुरघास 
  साधारणतः १ x १ x १ फूट जागेत १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी बसते. यावरून ७२०० किलो मुरघास बसण्यासाठी ४५० घनफूट जागा लागेल (७२०० भागिले १६). त्यासाठी १५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचा एक किंवा ७.५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचे दोन खड्डे करावे लागतील. 

तयार करण्याची पद्धत
  जमिनीत उंच ठिकाणी गोलाकार किंवा चौकोनी खड्डा खोदून घ्यावा. पक्का खड्डा तयार करावयाचा असल्यास खड्डा विटा व सिमेंटने बांधून घ्यावा. 
  खड्डा अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीच्या वर राहील असा किंवा जमिनीच्या वर बांधावा. आतील भिंतीचा भाग प्लास्टर करून गुळगुळीत करावा. खड्ड्याला भेगा पडलेल्या नसाव्यात. 
  खड्डा भरण्यापूर्वी तो स्वच्छ व कोरडा करून घ्यावा. कच्चा खड्डा असेल तर खड्ड्यात चारा भरण्याआधी ओलावा व माती जाऊन मुरघास खराब होऊ नये म्हणून सर्व बाजूने पुरेल व नंतर वरून झाकता येईल असा जाड प्लॅस्टिक पेपर अंथरावा.
  पक्का खड्डा असेल तर त्यातून पाणी व हवा मुरघासामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
  मुरघास बॅगमध्ये मुरघास करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या (५० किलोपासून १००० किलोपर्यंत) बॅग बाजारात उपलब्ध असतात. मुरघास खराब होऊ नये म्हणून बॅगमध्ये प्लॅस्टिकचे आवरण दिलेले असते.
  मुरघास बनविण्यासाठी चाऱ्यामध्ये ६५-७० टक्के पाणी असणे आवश्यक असते, त्यासाठी चारा योग्य वेळी कापणी करून, ४ ते ५ तास जागेवर सुकू द्यावा.
  चाऱ्याची १.५ ते २ सें.मी. आकाराची कुट्टी करून तुकडे करावेत.
  कुट्टी केलेला चारा थरावर थर देऊन खड्ड्यात अथवा बॅगमध्ये भरावा. कुट्टीच्या थरामध्ये हवा राहिली तर मुरघासाची प्रत खालावते. त्यासाठी प्रत्येक थर पायाने अथवा धुमसने एवढा दाबावा, की थरामध्ये बोट सहज घुसणार नाही. अशाप्रकारे प्रत्येक थराला व्यवस्थित दाबत पूर्ण खड्डा/ बॅग चारा कुट्टीने भरावी. 

बॅग पूर्ण भरल्यानंतर हाताने दाबून हवा काढत बॅगमधील प्लॅस्टिक (लायनर) व बॅग एकत्र करून, हवा आत जाणार नाही अशाप्रकारे बांधावी अथवा चिकट टेप लावून बंद करावी. (बॅगमधील शिल्लक राहिलेली हवा बॅग बांधण्यापूर्वी व्ह्यॅक्युम क्लीनरनेही काढू शकता). 

मुरघास खड्ड्यामध्ये करायचा असेल तर खड्डा जमिनीपासून १ ते २ फूट उंचीपर्यंत भरल्यानंतर त्यावर खड्ड्याच्या बाजूने उरलेल्या प्लॅस्टिक पेपरने खड्डा झाकून घ्यावा. त्यावर वाळलेल्या चाऱ्याच्या कुट्टीचा थर देऊन चिखल व शेणाने खड्डा लिंपून घ्यावा. 

खड्ड्याचे पावसाचे पाणी व उन्हापासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी.
  सर्वसाधारणपणे ४ ते ६ आठवड्यांनी चांगल्या प्रकारचा मुरघास तयार होतो. मुरघासाची बॅग/खड्डा नाही उघडला, तर फार काळ चांगला राहतो. एकदा का खड्डा/ बॅग उघडली तर मुरघास पूर्ण संपेपर्यंत टाकावा.
            
- डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७ (कार्यक्रम साहाय्यक (पशुविज्ञान), मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com