खेड्याकडे नव्हे शिवाराकडे चला..!

Need to focus on irrigation more to develop farming sector
Need to focus on irrigation more to develop farming sector

'गुगल अर्थ'मधून मराठवाडा पाहिल्यानंतर नकाशात भकास कोरडवाहू भाग दिसतो. मात्र, जालना तालुक्यातील सिंदखेड राजा रस्त्यावरील माळरानावर काही हिरवे ठिपके दिसतात. हे ठिपके म्हणजे शंभर-दीडशे शेततळी आहेत. कडवंची गावाची ही कमाल आहे. कडवंचीत मृदा आधारित जल संधारणावर भर दिला गेला आहे. सलग तीन वर्षांच्या दुष्काळातही बाराशे एकरात सिंचनासाठी पाणी देण्याची आणि द्राक्षबागा फुलवण्याची किमया इथे घडली. या गावचे प्रयोगशील शेतकरी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर पाटील यांच्याशी केलेली ही बातचित.
 

जलसंधारणात हिवरेबाजार, राळेगणसिद्धीला ओळख मिळाली. मात्र, कडवंची दुर्लक्षित का राहिले?
- या दोन्ही गावांनी लोकसहभागातून देशात आदर्श काम उभे करून दाखवले आहे. गावाला आदर्श करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. कडवंचीत आम्ही गावाऐवजी शेतशिवाराला महत्तव दिले आहे. मुळात आम्ही गाव सोडले आणि शेतांमध्ये बिऱ्हाडं हलविली. शेतकऱ्यांना स्वत:चे द्रारिद्र्य घालवायचे असेल आणि भावी पिढीला समृद्धी दाखवायची असेल तर गाव नव्हे, तर शिवाराचा विकास केला पाहिजे, अशी आमची धारणा आहे. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता. आम्ही ‘खेड्यातून शिवाराकडे चला’ असा संदेश आमच्या पुरता तयार केला आणि तो अंमलात आणला देखील. आज आमच्या गावातले ८०-९० टक्के लोक आता शेतात रहायला गेले. शेतात बिऱ्हाड आले, की शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याचे शेत आणि शिवार राहते. इतर बिनकामाचे उद्योग बंद होतात. मी कशासाठी शेतात आलो, माझे शेत असे भकास का, मी काय केले पाहिजे म्हणजे माझे दगडधोंड्याचे शेत हिरवे होईल याचा दिवसरात्र विचार शेतकरी करू लागतो. भकास शेत पाहून ते बदलविण्याची उर्मी येते. त्यातून चिकाटी वाढते. चिकाटीमधून सतत धडपड आणि त्यातून मग शेतीत प्रयोग वाढतात. शेती प्रयोगशील झाले की आपोआप पैसा येतो. त्यामुळे आज दुष्काळाने भाजून निघणा-या आमच्या जिल्ह्यात आमचं शिवार मात्र हिरवंगार आहे. नव्या बागा लागत आहेत, लोक राहण्यासाठी टुमदार शेतघरे बांधत आहेत, नव्या वाहनांची खरेदी सुरू आहे. पण हे सर्व शिवारात सुरू आहे. गाव तसे साधे आणि शांत आहे. आम्ही गावाला रंगरंगोटी करण्यापेक्षा शिवाराला हिरवे करण्याचा प्रयत्न करतोय. ते देखील फारसा गाजावाजा न करता. 

राज्यात इतर गावे देखील कडवंची सारखी कशी तयार होतील?
- मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शहरातून गावात आणि गावातून शिवारात यावे लागेल. पारावर गावगप्पा ठोकून गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्या पक्षाचं काय चाललंय हे बंद करावे लागेल. त्यापेक्षा माझ्या शिवारात काय चाललंय यावर लक्ष द्यावे लागेल. माझ्या शेतात पश्चिमेच्या बांधाला असलेल्या फळबागेत दोन झाडांना फळे कमी का लागली, असा बारीक विचार करावा लागेल. बघा.. तुम्हाला एक सांगतो. शेतीत समस्या हजार आहेत. त्यासाठी रडून काहीच उपयोग नाही. तुम्हालाच तुमचं सावरावं लागेल. आता तुमच्यासमोरच मी माझी ‘फेल’ झालेली द्राक्षबाग कुऱ्हाडीने तोडतो आहेच ना? ही कुऱ्हाड माझ्यावर झाडावर नाही, तर आमच्या छातीवर पडते आहे. पण आमचं दु:ख आम्हाला गिळून पुन्हा उभं रहावं लागतं. पीकपाणी वाया गेल्यानं डगमगून मागं सरता येत नाही. दु:खाशी झुंज देतच पुढे जावे लागते. आमच्या कडवंचीत सगळे गावकरी शिवारात आपापल्या शेतीकामात ‘बिझी’ असतात. गावात तुम्ही फिराल तर कुणीही भेटणार नाही. मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीला आले तर माझ्या शेतात शंभर माणसेही जमली नव्हती. अजित पवार आले तेव्हा आश्चर्याने त्यांनी विचारले की तुमच्या गावात माणसं आहेत की नाही? परवा फिजी देशाचे कृषिमंत्री आले आणि एकटेच बांधावर फिरत होते. आमच्याकडे कोणी काम सोडून उगाच पुढाऱ्यांच्या मागे फिरत नाही. गेल्या १५ वर्षांत आमच्या शिवारात तीन लाख लोकांनी भेटी दिल्यात. सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला सतत कामात गुंतून घ्यावे लागेल. गावात सुरवातीला पाच-दहा शेतक-यांनी एकत्र यावे. गट करावा. शिवारात कायमचं रहायला जावं. पाणी, रस्ते, वीज यासाठी एकत्रितपणे पाठपुरावा करावा. एकत्र बसून समस्या शोधल्या, त्यावर उपाय असलेल्या यंत्रणांच्या भेटी घेतल्या, एकत्रित खरेदी-मार्केटिंग केले तर शिवार फुलू लागते. तुम्हाला तुमच्या शेतीला फॅक्टरीचा दर्जा द्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जलसंधारणाची भरपूर कामे करावी लागतील. 

राज्याच्या जलसंधारण धोरणात काही बदल करावे लागतील का?
- करावेच लागतील. सध्या राज्यात जलसंधारण, मृद्संधारण, जलयुक्त शिवार अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर कामे होत आहेत. मात्र, माथा ते पायथा हे सूत्र राहिलेले नाही. शेतांमध्ये बांधबंदिस्ती होत नाही. कागदोपत्री बांध बांधून काय उपयोग? बांध तुटतात. कामे करूनही पाणी साचत नाही. साचलेले पाणी मुरत नाही. त्यासाठी लोकसहभागातून दर्जेदार कामे करावी लागतील. आमच्या गावात कालवा नाही, नदी नाही, तलाव नाही, दुष्काळ पाचवीला पूजलेला; पण शेतशिवारात ४५० ट्रॅक्टर आहेत, ९० मोटारी, ६५० शेततळी आहेत. शिवाराची उलाढाल ७५ कोटींच्या आसपास पोचली आहे. ही सर्व समृध्दी जलसंधारणामुळे आली. त्यासाठी जालना केव्हीकेने केलेले मार्गदर्शन, शेतक-यांनी दिलेला सहभाग मोलाचा ठरला. कृषी विभागानेही सहकार्य दिले. कारण, सामूहिक शेततळ्याला पाच लाखांपर्यंत अनुदान मिळाले नसते तर शिवारात शेततळी झाली नसती. 

राज्यात कमी पाऊस आणि पाण्याच्या स्त्रोतांची अजिबात सोय नाही अशा गावांची संख्या भरपूर आहे.
- आहे ना. आमच्याही भागाचं दुखणं तेच होतं. तीन हजार लोकवस्तीच्या आमच्या गावचं उत्पन्न १९९८ मध्ये अवघे ७४ लाख रुपये होते. पण आम्ही जलसंधारणाचे मजबूत काम केले. जालना भागात २०१२ मध्ये फक्त १९८ मिलिमीटर पाऊस झाला तरीही गावाने ४१ कोटींचे शेती उत्पन्न घेतल्याचे सर्वेक्षणातून आढळले. यंदा देखील बागांमुळे भर दुष्काळात ५५ कोटींची उलाढाल शिवारात होईल. मी हे याकरिता सांगतो की नुसते ‘पाणी नाही-पाणी नाही’ असे रडत बसलो तर काहीच होणार नाही. टिपूसभर पाण्यातून पैसा काढण्याचे कसब आपल्यालाच शोधावे लागेल. इस्त्राईलने तेच केले आहे. आता एकटे कडवंचीचे शिवार पैसा कमवित नाही. नंदापूर, वरूड, न्हावा, धारकल्याण, पिरकल्याण, वडगाववाखारी, मोरकडी या गावांच्या शिवारातही बागा फुलत आहेत. आमच्या गावातली २०० मुलं सध्या बाहेर शिकत आहेत. मात्र, शिकलेली ५० मुलं शहरात न थांबता शिवारात आली आहेत. 

गावांमध्ये नेतृत्वाचाही मुद्दा असतो. सुशिक्षित नेतृत्व मिळाल्यानंतर विकास झपाट्याने होतो... 
- शेतकऱ्याच्या अंगाने विचार केला तर गावापेक्षा शिवाराचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी नेतृत्व अशिक्षित की सुशिक्षित हादेखील मुद्दा निरर्थक आहे. मी आता गावचा सरपंच म्हणून नेतृत्व करतोय. पण शिक्षण तर दहावी पास सुध्दा नाही. आमच्या शिवाराला दिशा देणारे दगडुजी पाटील क्षीरसागर अवघे चौथी पास होते. गावात २५ एकर बाग उभारून चकीत करणारे भगवान क्षीरसागर यांचे शिक्षण अवघे चौथी आहे. शिक्षणापेक्षा मातीवर प्रेम पाहिजे. भगवानरावांचा मुलगा बीएस्सी होऊन पुन्हा शिवारात आला. विठ्ठल क्षीरसागर यांचा मुलगा एलएलबी होऊन पुन्हा शिवारातच परतला. कष्टाळू लोकांची टीम शिवारात उभी राहिली की चमत्कार होतो. एका माणसाने कधीही शिवार बदलत नाही. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ४० किलोमीटरचे शेतरस्ते बांधले. त्यामुळे शिवारात प्रत्येकाच्या शेतात व्यापाऱ्याची गाडी येते. त्यामुळे मार्केटिंगचा मुद्दा आपोआप सुटला. शिवाराबाबत मी लोकांना सांगत असलो तरी स्वत:ही तसाच वागत आलोय. राजकारणापेक्षा शेतीच्या चार गोष्टी लोकांना सांगतो. मी चार कोटी लिटरचे शेततळे बांधले, बागा उभारल्या, चार एकर जमिनीची २० एकर जमीन केली. मला स्वप्नातही वाटले नव्हते की माझी गाडी, बंगला, विहीर, शेततळे होईल. हे सर्व सुशिक्षितपणामुळे मिळालेले नाही. त्यासाठी जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा हवा. 

ग्रामविकास हा शिवारकेंद्रित हवा असे तुम्हाला वाटते का?
- हो. अगदी तसेच. शिवार सोडून कशावरही लक्ष देऊ नका. शिवार सजले की सर्व समस्या आपोआप सुटतात. ग्रामविकास हा शिवारविकासाशिवाय कधीही साधला जाणार नाही. शिवाराची समृध्दी ही शेतकऱ्यांना ताकदवान बनवते. जलसंधारणाची कामे, कृषी विभागाच्या योजना, शास्त्रज्ञांचा वेळेवर कृषी सल्ला, खते-बियाणे-कीटकनाशके-अवजारे क्षेत्रातील कंपन्यांची मदत आणि आपले स्वत:चे कष्ट असा सर्वांचा मेळ घातला तरच शिवारं फुलतील. पण खर सांगू का? सर्वांना आतून वाटले पाहिजे. सकाळी दहाच्या आधी आणि संध्याकाळी पाचनंतर आपला मोबाईल ‘स्विचऑफ’ करून ठेवणारे सरकारी कर्मचारी, शेतकऱ्यांपर्यंत न पोचलेली कृषी विद्यापीठे, कागदोपत्री योजनांची कामे करणारी सरकारी यंत्रणा, गावगप्पांनी रंगलेले पार आणि बसस्टॅंड, मुद्द्यापुरतं बघणारे लोकप्रतिनिधी असं तयार झालेलं चित्र बदलावे लागेल. शेती व शेतक-याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती असं मानून प्रामाणिकपणे काम करावे लागेल. अन्यथा ‘कृषिप्रधान’ देश असे बोलत दिवस काढणे हे केवळ ढोंग आहे..! 

- (संपर्क : चंद्रकांत क्षीरसागर ९७६५७७०६०५)
(पूर्वप्रसिद्धी : अॅग्रोवन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com