esakal | नऊशे कोटींचा बेदाणा राज्यात पडून
sakal

बोलून बातमी शोधा

raisins

राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरु झाल्या असल्या तरी अजून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही. राज्यात आजअखेर ९५ हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून  ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शीतगृहात ठेवलेल्या बेदाण्याची रक्कम अंदाजे ९०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांना अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.

नऊशे कोटींचा बेदाणा राज्यात पडून

sakal_logo
By
अभिजित डाके

सांगली - राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरु झाल्या असल्या तरी अजून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही. राज्यात आजअखेर ९५ हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून  ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शीतगृहात ठेवलेल्या बेदाण्याची रक्कम अंदाजे ९०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांना अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात दरवर्षी सरासरी बेदाण्याचे १ लाख ९० हजार टन उत्पादन होते. यंदा द्राक्ष हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षाची विक्री करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. त्यामुळे यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्याचवेळी बाजार पेठा बंद असल्याने बेदाण्याची विक्री करता आली नाही. जून महिन्यापासून बेदाण्याचे सौदे सुरु झाले. परंतु अपेक्षित उठाव झाला नाही. मागणी कमी असली तरी दरात चढ-उतार नसल्याचे बेदाणा उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. 

सध्या राज्यात ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला आहे. त्याची विक्री अजून बाकी आहे. बेदाणा विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी पुढे येत असले तरी अजून अपेक्षित मागणी नाही. गेल्या महिन्यापासून बेदाण्याला मागणी वाढू लागली आहे. दसरा आणि दिवाळी या सणाला बेदाण्याच्या मागणीत अधिक वाढ होईल, आणि दरही वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

राज्यातील बेदाणा दृष्टिक्षेप (टनांत)
२ लाख १० हजार उत्पादन 
९५ हजार ते १ लाख बेदाण्याची विक्री 
८५ हजार ते ९० हजार शिल्लक बेदाणा

तासगावात बाजारात ३५ हजार टन विक्री 
तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरु आहेत. सौद्याला ८०० टन बेदाण्याची आवक होत असून ५०० ते ५५० टन विक्री होत आहे. तासगाव बाजार समितीतून सहा महिन्यात ३५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने दरवर्षीपेक्षा यंदा २५ टक्केही बेदाण्याला मागणी नव्हती. परंतु सप्टेंबर महिन्यात बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. 
- मनोज मालू, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन 

Edited By - Prashant Patil