सेंद्रिय उसासह सेंद्रिय गूळ, काकवी, तूपही...

सेंद्रिय उसासह सेंद्रिय गूळ, काकवी, तूपही...

कुरुल-पंढरपूर रस्त्यावर अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे संदीप पवार यांची १२ एकर शेती आहे. सन १९९४ पासून संदीप शेतीत आहेत. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. पाण्याचा जेमतेम स्त्रोत, खात्रीशीर उत्पन्न नाही. मग काही दिवस ट्रॅक्‍टर चालवण्याचा व्यवसाय त्यांनी केला. दुग्धव्यवसायही केला. त्यातूनही फारसे काही लागेना. सन २००८ मध्ये उजनी डावा कालव्यावरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रयोगशील शेतीला सुरवात झाली. 

प्रयोगशील शेतीची वाट 
सुरवातीला भाजीपाला, ऊस, केळी अशी पिके घेतली. केळीने थोडासा आधार दिला. उत्साह वाढला. पुढे उसाचे क्षेत्र वाढवण्याचे ठरवले. पण दर आणि उत्पादनाचा मेळ बसेना. शेती तोट्याची होऊ लागली. अखेर २०११ पासून संदीप यांनी सेंद्रिय शेतीकडे मोर्चा वळवला. आज पाच वर्षांच्या सातत्यातून ही शेती त्यांना फायदेशीर वाटू लागली आहे. 

संदीप यांची शेती 
एकूण क्षेत्र    १२ एकर
ऊस- सात एकर, लिंबू    ४ एकर
संपूर्ण शेती    सेंद्रिय पद्धतीने 
देशी गायी    तीन 
उद्दिष्ट - कमी खर्चात विषमुक्त अन्नाची निर्मिती, शाश्‍वत उत्पन्न आणि उत्पादन व त्यातून

वेगळा आनंद 
शेतीतील व्यवस्थापन
ऊस उत्पादन- एकरी ५५ ते ६० टन. 
सन २०१६ मध्ये को ८००५ ऊस वाणाची लागवड
ठिबक सिंचनाचा वापर. 
जीवामृत, देशी गायीचे ताक, दही, शेण, गोमूत्र यांचा पीकवृद्धीसाठी वापर 

सेंद्रिय गूळ निर्मिती 
उसाला मिळणारा दर, लांबणारा हंगाम, हाती पडणारे उत्पन्न आणि त्या तुलनेत सेंद्रिय गुळाला असलेली मागणी असा तुलनात्मक अभ्यास संदीप यांनी केला. त्यातून सुरवातीला व्यावसायिक गुऱ्हाळघरात गूळाची निर्मिती केली. 

अक्कलकोट, कोल्हापूर भागातील गुऱ्हाळघरे पाहिली. त्यानंतर कोल्हापूर भागातील रचनेचे गुऱ्हाळघर उभा करण्याचा आणि केवळ सेंद्रिय गूळच तयार करण्याचा निश्चय केला. 
ऊस गाळपासाठी चरखा, रस उकळण्यासाठी कढई आणि भट्टी अशी यंत्रणा उभी केली. सुमारे अडीच लाख रुपये खर्च त्यासाठी आला. गुळव्यांची जुळवाजुळव केली. यंदा मेच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गाळपास सुरवात केली. 

गूळ, काकवीचा "चंद्रभागा" ब्रॅण्ड
सहा एकरांतील २७० टन उसाचे गाळप करून २७ टन गुळाची आपल्या गुऱ्हाळघरात निर्मिती 
अर्धा किलोपासून १,५ ते १० किलोपर्यंतचे पॅकिंग
काकवीचेही ७००, १००० व १३५० ग्रॅम असे बॉटल पॅकिंग 
दोन्ही उत्पादनांचे "चंद्रभागा'' हे ब्रॅंडनेम 

गुळाचे मार्केटिंग 
ऊस उत्पादनापासून गूळ उत्पादन ते विक्री अशा संपूर्ण साखळीत राबताना ‘मार्केटिंग’मध्येही मागे राहायचे नाही असे संदीप यांनी ठरवले. 
थेट गूळविक्रीसाठी सुरू केलीच. शिवाय परिसरातील आठवडे बाजार, कृषी प्रदर्शनांमध्येही गूळ ठेवण्यास सुरवात केली. 
आत्तापर्यंत ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने जवळपास तीन टन गूळविक्री साधली आहे. 
काकवीची प्रति किलो शंभर रुपये दराने ५०० किलोपर्यंत विक्री झाली आहे. 

 प्रचारासाठी खास वाहन 
 मार्केटिंगसाठी खास वाहन बनवून घेतले आहे. प्रत्येक बाजारात आणि प्रदर्शनात हे वाहनच विक्री स्टॉल म्हणून उभे केले जाते. गाडीच्या चहूबाजूंनी आकर्षक सजावट केली आहे.

   आॅडिअो क्लीप 
गूळ आणि काकवीचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व सांगणारी छोटेखानी ऑडिओ क्लीपही संदीप यांनी स्टुडिअोत तयार करून घेतली आहे. आपल्या वाहनाद्वारे ती ग्राहकांना एैकवली जाते. त्यामुळे  ग्राहकांचे लक्ष त्याकडे पटकन वेधून घेतले जाते.  

  दुबईतून मागणी
सेंद्रिय गूळ आणि काकवीला सोलापूरसह सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद येथून मागणी आहेच. शिवाय सोलापुरातील एका निर्यातदारामार्फत २० टन गूळ दुबईलाही जाणार आहे. प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे. त्याला ७० रुपये प्रति किलो दर देऊ केला आहे. 

  आश्वासक अर्थकारण 
आजमितीला २७ टनांपैकी तीन टन गूळ विक्री झाली आहे. २० टनांलाही मागणी आली आहे. विक्री झालेल्या गुळापासून सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित २० टनांपासूनचे उत्पन्न ७० रुपये प्रति किलो दराने धरले तर १४ लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न होऊ शकते. एरवी कारखान्याकडे ऊस दिला असता तर २७० टनांपासून सरासरी २००० रुपये प्रति टन या दराने पाच लाख ४० हजार रुपये हाती आले असते. मात्र गूळ व्यवसायातील खर्च लक्षात घेऊनही त्यात नफ्याचे प्रमाण अधिक राहणार आहे. 
 - संदीप पवार - ९८३४८४८२९७ 

  देशी गाईच्या तुपाची विक्री
 संदीप यांनी देशी गोवंशाचे संवर्धन केले आहे. कॉंक्रेज, गीर, खिलार अशी विविधता त्यांच्याकडे आहे. चार कालवडी आहेत. 
 सेंद्रिय शेतीत शेण, गोमूत्रासाठी त्यांचा उपयोग होतो. 
 कॉंक्रेज प्रति दिन ११ लिटर, गीर गाय १३ लिटर तर खिलार गाय चार लिटर दूध देते.
 महिन्याला १५ किलोपर्यंत तूपनिर्मिती होते. त्याचा प्रति किलो २००० रुपये दर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com