बचत गटाच्या माध्यमातून  सेंद्रिय शेतीला दिली चालना

बचत गटाच्या माध्यमातून  सेंद्रिय शेतीला दिली चालना

सोलापूर-बार्शी मार्गावर वैरागनजीक सासुरे गावशिवारात सौ. वैशाली फुलचंद आवारे यांची साडेतीन एकरशेती आहे. दैनंदिन शेती नियोजनात पती फुलचंद यांना वैशालीताई मदत करतात. शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, गहू या पिकांची लागवड असते. कूपनलिकेच्या पाण्याचा जेमतेम स्रोत आणि पारंपरिक पिकांच्या लागवडीमध्ये आवारे गेली अनेक वर्षे रासायनिक खते आणि कीडनाशकांचा जास्त वापर करत होत्या. परंतु गेल्या वर्षभरापासून स्वयम शिक्षण प्रयोग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानच्या (उमेद) संपर्कात त्या आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना सेंद्रिय शेती पद्धती आणि महिला बचत गटाची माहिती मिळाली. उमेद अभियानाच्या प्रेरणेतून वैशालीताईंनी सासुरे गावात महिलांचे संघटन सुरू झाले आणि मातोश्री महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटासाठी महिलांना माहिती देताना तसेच त्यांचा एकत्र आणताना सुरवातीला त्यांना परिश्रम घ्यावे लागले. परंतु आता सेंद्रिय शेती करणारी महिला शेतकरी, एक प्रशिक्षक अशा विविध भूमिका त्या प्रत्यक्षात निभावत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कामाचा आणि नावाचा आता चांगला लौकिक वाढला आहे. विविध उपक्रमासाठी ‘उमेद’चे गोरक्षनाथ भांगे, उमेश जाधव, उर्मिला दराडे, ‘एसएसपी’चे अंगद हजगुडे यांनी वैशालीताईंना सातत्याने मार्गदर्शन केले आहे.

सेंद्रिय शेती पद्धतीवर भर  
 वैशालीताईंनी सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या शेतीमध्ये गेल्या वर्षीपासून गांडूळ खत, शेणखत वापरावर भर दिला आहे. कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची निर्मिती करून त्याचा वापर वाढविला. तसेच पिकांना जिवामृतही दिले जाते. यामुळे निविष्ठांच्या खर्चात बचत झाल्याचे त्या सांगतात. येत्या काळात सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमीन सुपीकतेला फायदा होणार आहे. सेंद्रिय खताच्या वापरामुळे यंदाच्या वर्षी त्यांना सोयाबीन तसेच गव्हाचे दर्जेदार उत्पादन मिळाले. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी यंदाच्या वर्षी त्यांनी दोन एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. यामध्ये एक एकर ऊस आणि एक एकर चारा पिकाची लागवड केली आहे. वैशालीताईंकडे सध्या एक गावरान गाय आणि तीन म्हशी आहेत.

स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांच्या वापराचा झालेला फायदा लक्षात घेऊन महिला बचत गटाच्या माध्यमातून दशपर्णी अर्क, जिवामृत आणि गांडूळ खतनिर्मितीवर भर दिला आहे. पॅकिंग, ब्रॅडिंग करून या उत्पादनाची सोलापूर, बार्शी आणि पुणे शहरातील प्रदर्शनात विक्री सुरू केली. निविष्ठांच्या विक्रीसाठी वैशालीताईंनी ‘रुक्‍मिणीज्‌’ हा ब्रँडही तयार केला.

बचत गटाला मिळाला रोजगार 
दशपर्णी अर्काच्या निर्मितीबाबत माहिती देताना वैशालीताई म्हणाल्या, की निरगुडी, धोतरा, गुळवेल, मोगली एरंड, धानोरा, कडुनिंब, टणटणी, तुळस, कारंजी, सीताफळाचा एक किलो पाला आणि दहा लिटर गोमूत्र  लागते. जिवामृत निर्मितीसाठी दहा लिटर पाणी, पाच लिटर गोमूत्र, बेसन आणि गूळ प्रत्येकी एक किलो, फळाचा रस एक लिटर, पाच किलो शेणाची गरज असते. बचत गटातील महिला स्वतःच्या शेतीमध्ये जिवामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर करतात. याचबरोबरीने परिसरातील फळबागायतदारांनी बचत गटाकडून दशपर्णी अर्क, जिवामृताची खरेदी सुरू केली आहे.

बचत गटातील महिलांनी गेल्या वर्षी गांडूळ खतनिर्मितीला सुरवात केली. यासाठी दोन वाफे तयार केले. दर तीन महिन्याला तीन क्विंटल गांडूळ खताची निर्मिती केली. गेल्या वर्षी गटातील महिलांनी स्वतःच्या शेतीमध्ये गांडूळ खत वापरले. यंदाच्या वर्षी गटातील महिलांनी गांडूळ खतनिर्मितीसाठी सात वाफे तयार केले आहेत. त्यामुळे गांडूळ खतविक्रीला चालना मिळणार आहे.

एकमेका साह्य करू... 
वैशालीताईंना दशपर्णी अर्क निर्मितीसाठी दहा वनस्पतींची प्रत्येकी एक किलो पाने लागतात. वेळेत बचत होण्यासाठी वैशालीताईंनी बचत गटातील प्रत्येक सदस्यांना एका किलो पानांची जबाबदारी दिली जाते. त्यानुसार गटातील महिला विविध वनस्पतींची पाने जमा करतात.  त्यानंतर दशपर्णी अर्काची निर्मिती केली जाते. त्यानंतर गटातील सदस्यांना दशपर्णी अर्काचे वाटप केले जाते. या नियोजनामुळे दशपर्णी अर्कनिर्मितीसाठी प्रत्येक सदस्याला वनस्पती शोधण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. 

शेतीकामासाठी महिलांची सावड
मातोश्री महिला बचत गटाच्या माध्यमातून सौ. वैशालीताई काम करतात. पण या बचत गटाचेही एक वेगळे वैशिष्ट्य आहे. बचत गटातील सहभागी महिला सदस्यांकडे थोडीफार शेती आहेच. शेती हाच या महिलांचा पूर्ण आधार आहे. पैशाच्या बचतीवर लक्ष देताना शेतीमध्ये वाढती मजूर समस्या, खर्च आणि वेळेच्या बचतीवरही गटातील महिलांनी उपाय शोधला आहे. बचत गटातील सदस्या एकमेकींच्या शेतात खुरपणी, पीककाढणीसाठी मदत करतात. शेतीमध्ये पडेल ते काम सर्वजणी मिळून करतात. त्यामुळे या महिलांची कामाची ही सावड खर्च, वेळेच्यादृष्टीने फायदेशीर ठरली आहे. 

कृषी प्रदर्शनासह  थेट विक्री
गांडूळ खत, दशपर्णी अर्क, जिवामृताच्या विक्रीबाबत वैशालीताई म्हणाल्या, की एक लिटर कॅनमध्ये दशपर्णी अर्क, जिवामृताचे पॅकिंग केले जाते. त्यावर आवश्‍यक समाविष्ट असणारे घटक लिहून ‘रुक्‍मिणीज्‌’ या ब्रॅंड नेमने विक्री केली जाते. दशपर्णी अर्क प्रतिलिटर ८५ रुपये, जिवामृत ३५ रुपये असे विक्रीचे दर ठेवले आहेत. गांडूळ खत प्रति किलो २५ रुपये या दराने विकले जाते. महिन्याकाठी सर्व खर्च जाऊन मला दोन ते तीन हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी सेंद्रिय शेती ही फायद्याची आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेऊन परिसरातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. आज पाच महिला शेतकरी माझ्याप्रमाणे शेतीप्रयोग करत आहेत. त्याचा फायदा काही प्रमाणात दिसू लागला आहे.

वैशालीताई  विविध भागांतील कृषी प्रदर्शनामध्ये जिवामृत, दशपर्णी अर्काची विक्री करतात. तसेच सोलापूर, बार्शी शहरांतील विविध अपार्टमेंट, सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थांतील परसबाग, गच्चीवरील भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शहरी ग्राहकांनाही त्या जिवामृत, दशपर्णी अर्काची विक्री करतात. त्याचा चांगला फायदा ग्राहकांना दिसून आला आहे. 

परसबागेला झाला फायदा 
सोलापूर शहरातील सौ. मनीषा प्रकाश वाले म्हणाल्या, की माझ्याकडे ऑर्किडसह विविध प्रकारची औषधी वनस्पती, शोभिवंत झाडांची परसबाग आहे. मी बागेसाठी शक्यतो सेंद्रिय खते, कीडनाशकांचा वापर करते. गेल्या काही महिन्यांपासून परसबागेसाठी वैशालीताईंनी तयार केलेला दशपर्णी अर्क, जिवामृताचा वापर सुरू केला आहे. त्याचा चांगला फायदा मला दिसून आला आहे.  

सौ. वैशाली आवारे - ९९७५१८५९६१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com