पंढरपूर भागात द्राक्ष बागांमध्ये ‘स्टेम गर्डलर बीटल’चा प्रादुर्भाव

मोहन काळे
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर - जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातील काही द्राक्ष बागांमध्ये आॅक्टोबर छाटणीच्या काळातच ‘स्टेम गर्डलर बीटल’ अर्थात खोडास चक्राकर पद्धतीने नुकसान करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्षातील नेहमीच्या किडीपेक्षा ही कीड वेगळी असल्याने शेतकऱ्यांना त्याची अोळख व नियंत्रणाची नेमकी दिशा मिळणे कठीण जात आहे. हा भुंगा रात्रीच्या अंधारात द्राक्षवेलींचे खोड व फांद्या चक्राकार पोखरत असल्यामुळे वेली जागेवरच वाळून जात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आढीव (ता. पंढरपूर) येथील शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी भारत रानरुई यांच्या द्राक्षबागेत अलीकडेच हे भुंगे आढळले. रात्रीच्या अंधारात द्राक्षवेली व फांद्या चक्राकार पोखरून ही कीड वेलींचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. चक्राकार पोखरल्यामुळे खोडाचे दोन भाग होतान दिसत आहेत. वेलींना मिळणारे पाणी व अन्नपुरवठा बंद पडल्यामुळे द्राक्षवेली सुकून जात आहेत. खोडाचा तुकडा पडल्यामुळे वेली जागेवरच वाळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.
 
तज्ज्ञांची प्रतिक्रिया 
नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक व कीटकशास्त्रज्ञ डॉ. तुषार उगले म्हणाले, की सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान पोचवणाऱ्या ‘स्टेम गर्डलर बीटल’ या भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. नाशिकसह लातूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, नगर, जालना आदी भागांतील बागांमध्ये हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खोडकिडीबरोबरच या किडीच्या नियंत्रणासाठीदेखील ठोस उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण व्यवस्थापन करावे. 

डॉ. उगले म्हणाले की स्थेनियास ग्रायसेटर असे नाव असलेली ही भुंगेरावर्गीय गडद तपकिरी- काळपट रंगाची कीड आहे. पाठीवरील पंखाच्या जोडीवर काट्यासारखा भाग असतो. तसेच पंखावर पांढरट-राखाडी ठिपके असतात. द्राक्षाव्यतिरिक्त सफरचंद, संत्रावर्गीय फळझाडे, आंबा तसेच काही जंगली वनस्पतीवर देखील ही कीड नुकसान करते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत बाहेर पडलेले प्रौढ भुंगेरे रात्रीच्या वेळेस खोडाची साल कुरतडून रिंग तयार करतात. झाडाला ‘गर्डलिंग’ केल्यासारख्या जखमा करून ही कीड खोडास, ओलांड्यास नुकसान करते. मोठ्या खोडापेक्षा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाच्या बागेत नुकसान जास्त झालेले आढळते. जास्त प्रादुर्भाव असल्यास द्राक्षाची वेल सुकते व बागेचे दीर्घकालीन नुकसान होते.

माझ्या भागात ‘स्टेम गर्डलर बीटल’चा प्रादुर्भाव जाणलत आहे. यंदा प्रथमच रात्रीच्या वेळी हे भुंगे द्राक्षवेलींचे नुकसान करत आहेत. आम्ही हे भुंगे बॅटरीच्या उजेडात पकडून नष्ट करीत आहोत.
- भारत रानरुई, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते, आढीव, ता. पंढरपूर 

द्राक्षबागेत कायम आढळणारी ही कीड नसली तरी यंदा ती जाणवत आहे. तिच्यामुळे बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 
- दत्तात्रेय भोसले, द्राक्ष उत्पादक, सरकोली, ता. पंढरपूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Grapes stem girdler beetle Infertility