‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी गोवंशाचा प्रसार

Gir-Cow
Gir-Cow

भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही संस्था १८५५ पासून गोसंरक्षण आणि संवर्धनामध्ये कार्यरत आहे. संस्थेने जातिवंत देशी गोवंश संवर्धन आणि पैदाशीचे कार्य सुरू केले आहे. पांजरपोळमध्ये शेण, गोमूत्रापासून जैविक खते, गांडूळखत, दशपर्णी अर्क, जीवामृत निर्मिती केली जाते. परिसरातील शेतकरी या उत्पादनांची खरेदी करतात. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जातिवंत गोवंश संवर्धन आणि प्रसाराचे काम संस्थेने हाती घेतले आहे.

पुणे पांजरपोळ ट्रस्ट या संस्थेची स्थापना १८५५ साली झाली. पुणे शहरातील नारायण पेठ येथे संस्थेचे कार्यालय सुरू झाले. गाईंचे संरक्षण आणि संवर्धन असे संस्थेच्या कामाचे स्वरूप आहे. यामध्ये प्रामुख्याने वयस्क, भाकड तसेच रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या गाई, म्हशी, बैलांचे संगोपन हा संस्थेच्या प्राथमिक उद्देश आहे. संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती देताना पुरुषोत्तम लढ्ढा म्हणाले, की १९४४ मध्ये संस्थेने भोसरी येथे विविध जातीच्या गाईंच्या संगोपनासाठी दहा एकर क्षेत्रावर गोठ्याची सोय केली.

आजारी, भाकड गाई, बैलांच्या बरोबरीने या ठिकाणी सुमारे सत्तर दुधाळ गीर गाईंचा सांभाळ केला जात होता. १९६५ ते ८० च्या काळात या पांजरपोळमधून दररोज पुणे शहरातील ग्राहकांसाठी ४०० लिटर दूध पोचविले जायचे. परंतु पुढे मजुरांच्या टंचाईमुळे  दुधाळ गाईंचा गोठा बंद करावा लागला. परंतु आजारी, वयस्क गाई, तसेच ज्यांना गाई, बैल सांभाळणे अवघड जाते अशा लोकांच्या जनावरांचे संगोपन मोठ्या प्रमाणात सुरू झाले.

पूर्वी पांजरपोळमध्ये ७२ जनावरे होती, आता ही संख्या सुमारे १५०० पर्यंत पोचली आहे. सध्या पुणे पांजरपोळ ट्र्स्टचे कार्याध्यक्ष ओमप्रकाशजी रांका आहेत. श्रीधरजी पित्री हे अध्यक्ष आणि बाबूशेठ बोथरा हे विश्वस्त आहेत.

संस्थेच्या प्रक्षेत्रावर गीर, खिल्लार, लालकंधारी, साहिवाल, कांक्रेज या गोवंशांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाते. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी सुसज्ज गोठा, स्वच्छ पाणी आणि गव्हाणीची सोय आहे.

काही गोठे बंदिस्त तर काही गोठे मुक्त संचार पद्धतीने बांधले आहेत. आजारी, वयस्क जनावरांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. पशुवैद्यकांकडून जनावरांवर योग्य वेळी लसीकरण, आवश्यक उपचार केले जातात. जनावरांना चारा कुट्टी करून दिली जाते. सध्या ज्या गाई, म्हशी दूध देतात, त्यांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन ठेवले आहे.

चला गाईंसोबत...
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच परिसरातील खेडेगावातील लोकांपर्यंत देशी गाईंचे महत्त्व, त्यांचे संवर्धन कसे करावे, याबाबत माहिती होण्यासाठी ट्रस्टतर्फे गेल्या दहा वर्षांपासून दर पोर्णिमेला सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत ‘चला गाईंसोबत` हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमामध्ये भोसरी येथील पांजरपोळ प्रक्षेत्रावर देशी गाईंचे संवर्धन, शेती, पर्यावरण आणि मानवी आरोग्य विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. यामुळे देशी गाईंचे संगोपन आणि संवर्धनाला चालना मिळाली आहे. 

शेतकरी गटांना सहकार्य  
ट्रस्टच्या माध्यमातून येत्या काळात पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांना जोडून घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना प्रकाश कोरपे म्हणाले, की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखत, गांडूळ खताची मागणी वाढत अाहे. प्रक्षेत्रावर तयार होणारी जैविक खते, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, जीवामृत योग्य दरात शेतकरी गटांना आम्ही देणार आहोत. शेतकरी गट पुढे आले तर ट्रस्टतर्फे संबंधित गावांमध्ये देशी गाईंचे संवर्धन, संगोपन याचबरोबरीने जैविक खतनिर्मिती, गांडूळ खतनिर्मिती, याबाबत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाईल. या उपक्रमासाठी सामाजिक संस्थांच्या बरोबरीने चर्चा सुरू आहे. गावातील महिला बचत गटांसाठी गोमूत्र अर्कनिर्मिती, धूपकांडी, साबणनिर्मिती, दशपर्णी अर्क, जीवामृत निर्मिती याचबरोबरीने देशी गाईच्या दुधापासून खवा, पनीरनिर्मितीबाबत प्रशिक्षणाचेदेखील नियोजन करीत आहोत.

जातिवंत गोवंशाची उपलब्धता 
संस्थेने खिलार, देवणी, लालकंधारी, गीर या देशी गाईंच्या संगोपनातून दुधाळ जातिवंत कालवडी संवर्धन आणि संगोपनावर भर दिला आहे. सध्या संस्थेकडे खिलार, गीर, कांकरेज, साहिवाल वळू आहे. हे वळू रेतनासाठी उपलब्ध करून दिले जातात. येत्या काळात काही संस्थांच्या सहकार्याने देशी गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा विचार आहे. शेतकऱ्यांना देशी गाय, बैल, कालवड पांजरपोळमधून उपलब्ध करून दिली जाते. काही वर्षांपुर्वी ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील गोशाळांचे अधिवेशन घेतले होते. प्रत्येक गोशाळेच्या माध्यमातून जातीवंत देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन आणि विकास याबाबत शास्त्रीय पद्धतीने सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी देशी गोवंशामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे.

गो-आधारित उत्पादनांची विक्री
 संस्थेच्या प्रक्षेत्रावर देशी गाईंचे दूध, तूप, गोमूत्र, शेण यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांची विक्री केली जाते. या ठिकाणी राजस्थामधील पथमेडा, गो-मंदिर आणि नागपूर येथील देवलापार येथील गोशाळांनी तयार केलेली धूपकांडी, देशी गाईच्या दुधाची पावडर, तूप, गोमूत्र अर्क, औषधी चुर्ण, शाम्पू, साबण, फिनेल या उत्पादनांना चांगली मागणी आहे.

जैविक खते, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प  
संस्थेच्या प्रक्षेत्रावर मोठ्या संख्येने जनावरे असल्याने त्यांच्यापासून उपलब्ध होणाऱ्या शेणापासून जैविक खतांची निर्मिती केली जाते.

साधारणपणे सत्तर दिवसांनी दर महिन्याला एक टन खताची निर्मिती होते. तयार झालेले खत चाळून पन्नास किलोच्या बॅगमध्ये भरले जाते. ‘समृद्धी जैविक खत` या ब्रॅंडनेमने पंधरा रुपये किलो या दराने विक्री होते. संस्थेच्या गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पामध्ये साठ टाक्या आहेत. दर महिन्याला दोन टन गांडूळ खताची निर्मिती होते. वीस रुपये किलो दराने खतविक्री होते. याच बरोबरीने जीवामृत आणि दशपर्णी अर्काची निर्मिती आणि विक्री होते. ही खते  गुणवत्तापूर्ण असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून वाढती मागणी आहे. 

पुणे शहरातील ग्राहकांना संस्थेने  एका दुकानाच्या माध्यमातून गो आधारित उत्पादने, जैविक खते, गांडूळ खत उपलब्ध करून दिले आहे. पुणे शहरातील सोसायटींमध्ये ट्रस्टतर्फे ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती कशी करायची याबाबत मार्गदर्शन, तसेच गांडूळ कल्चर उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

 पुरुषोत्तम लढ्ढा - ९३२५४०९३९८
 प्रकाश कोरपे - ९८२२३९३१७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com