esakal | एकात्मिक व्यवस्थापनातून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

डाळिंबाच्या बागेत एकात्मिक खत व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेतात.

एकात्मिक व्यवस्थापनातून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन

sakal_logo
By
अभिजित डाके

आटपाडी तालुक्यात डाळिंबाकडेे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी तालुक्यातून सुमारे २०० शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यात केली आहे. आता युरोपला डाळिंबाची निर्यात करू लागले आहेत. याच तालुक्यातील पोपट सूर्यवंशी यांनी शेतात सातत्य ठेवून २००९ पासून डाळिंबाची निर्यात सुरू आहे. दर्जेदार डाळिंब उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल साधावा लागतो. त्यासाठी दरवर्षी माती परीक्षण केले जाते. यातून जमिनीत कोणत्या अन्नघटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळते. यासोबत खतांच्या शिफारशींचा विचार करून एकात्मिक खत व्यवस्थापन करण्यात येते. 

   डाळिंब क्षेत्र - १३ एकर
   एकूण झाडे - ५०००
   दोन ओळींतील अंतर १२ फूट
   दोन रोपांतील अंतर ६ फूट
   जून ते जुलैच्या दरम्यान मृग बहर धरला जातो.

   हंगाम संपल्यानंतर आणि सुरू होण्याआधी तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. त्यानंतर महिन्यातून एकदा बोर्डो फवारणी करतात. झाडाच्या खोडाला बोर्डोची पेस्ट वर्षातून एकदा लावली जाते. ताणाचे अंतर ठेवून छाटणीनंतर महिन्यातून दोन वेळा बोर्डोची फवारणी करतात.

   दरवर्षी एकदा माती परीक्षण करून घेतात. माती परीक्षणानुसार खतांची मात्रा दिली जाते. (प्रतिझाड प्रमाण अंदाजे) ५० किलो शेणखत, निंबोळी पेंड १ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रॅम याप्रमाणे मात्रा दिली जाते. ७० ते ८० दिवसांनंतर रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. त्यानंतर डीएपी किंवा १०:२६:२६ प्रतिझाड ७० ग्रॅम दिले जाते. पुढे ऑक्टोबरमध्ये वरीलप्रमाणे खताचा डोस दिला जातो. 

   शेणखतावर अधिक भर असतो. त्यातही गोमुत्र आणि शेणखताच्या स्लरी महिन्यातून एकदा देतात. सेंद्रिय खतांच्या अधिक वापर केल्यामुळे तेल्या, बिब्या रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता वाढते. आच्छादन व सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची उष्णता वाढत नाही.
   झाडाची प्रतिकारक्षमता नैसर्गिकरीत्या वाढते. 
   पाऊस आणि ढगाळ वातावरण झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाते. परिणामी दर्जेदार डाळिंब उत्पादन मिळते. बागेतून सर्वसाधारणपणे ३५० ते ७५० ग्रॅम वजनाची फळे मिळतात. 
   एकरी उत्पादन २३ टन असून, गेल्या वर्षी १२२ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला.  

- पोपट सूर्यवंशी, ८८०५३४३१३१

loading image