डाळिंब दर दबावात

अभिजित डाके
Monday, 25 February 2019

सांगली - यंदा देशात एकाच वेळी डाळिंबाचा बहर धरल्याने बाजारपेठेत आवक वाढली. परिणामी दर दबावात आहेत. गेल्या वर्षी डाळिंबाला प्रतिकिलोस ५० ते ७० रुपये असा दर होता. चालू हंगामात डाळिंबाचे दर २५ ते ३५ रुपये आहेत. म्हणजेच डाळिंबाच्या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांतील हा नीचांकी दर आहे.

सांगली - यंदा देशात एकाच वेळी डाळिंबाचा बहर धरल्याने बाजारपेठेत आवक वाढली. परिणामी दर दबावात आहेत. गेल्या वर्षी डाळिंबाला प्रतिकिलोस ५० ते ७० रुपये असा दर होता. चालू हंगामात डाळिंबाचे दर २५ ते ३५ रुपये आहेत. म्हणजेच डाळिंबाच्या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांतील हा नीचांकी दर आहे.

महाराष्ट्रात १ लाख ३० हजार तर मध्य प्रदेश, गुजरात राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यांत ५१ हजार हेक्टर असे मिळून देशात १ लाख ८१ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत देशात डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी एकाच वेळी डाळिंबाचा बहर धरला. त्यामुळे दोन्ही राज्यांतील डाळिंब एकाच वेळी बाजारात दाखल झाले. यामुळे दर दबावात असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशातून युरोपीयन देशात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दरवर्षी ही निर्यात दोन महिने चालते. २०१६-१७ मध्ये ४९ हजार टन डाळिंबाची निर्यात झाली होती. २०१७-१८ ला ४७ हजार टन निर्यात झाली. १६-१७ पेक्षा १७-१८ ला दोन लाख टनाने निर्यात कमी झाली. परंतु यंदा एक ते दीड महिनाच निर्यात सुरू राहिली. निर्यात सुरू असती तर डाळिंबाची बाजारातील आवक कमी होऊन दरात सुधारणा होण्यास मदत झाली असती.

दृष्टिक्षेपात उत्पादन
- डाळिंबाचे क्षेत्र - १ लाख ३० हजार हेक्टर
- उत्पादन - ११ ते १२ लाख टन
- मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक - ५१ हजार हेक्टर 
- उत्पादन - ७ लाख टन

प्रतिक्रिया
डाळिंब निर्यात करणाऱ्या शेतकरी आणि फार्मर्स कंपन्यांना मूलभूत सुविधा केंद्र शासनाने दिल्या पाहिजेत. यामुळे डाळिंबाची निर्यात करणे सोपे जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाचे प्रमोशन करण्यासाठी आंतराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात अपेडाच्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांना समावेश केला पाहिजे. यामुळे दर्जेदार डाळिंब निर्यातीस संधी उपलब्ध होईल.
- अंकुश पडवळे, अध्यक्ष, महा ऑरगॅनिक ॲँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोशियन

दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दिवसेंदिवस डाळिंबाच्या खर्चात वाढ होतेय. गेल्या चार ते पाच वर्षांतील हा नीचांकी दर आहे. दर कमी मिळत असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.
- भरत मंत्री, डाळिंब उत्पादक, राणीउंचेगाव, जि. जालना ,

डाळिंब निर्यात (हजार टनांत)
२०१५-१६      - ३२ 
२०१६-१७      - ४९ 
२०१७-१८      - ४७ 

उत्पादनात वाढीची शक्यता
गेल्या वर्षी देशात १७ ते १९ लाख टन डाळिंबाचे उत्पादन झाले होते. मात्र कमी पाण्यात हे पीक येत असल्याने देशात डाळिंबाची लागवड वाढली आहे. यंदा हे उत्पादन २५ ते २७ लाख टनापर्यंत होईल, असा अंदाज अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे माजी अध्यक्ष शहाजी जाचक यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate Rate