पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत मिळावी; पुणे जिल्ह्यातील पोल्ट्री उत्पादकांची मागणी

poultry
poultry

पुणे - ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत अफवा पसरविण्यात आल्याने पोल्ट्री उत्पादक अडचणीत सापडला आहे. कोंबड्यांच्या दरात घसरण झाल्याने खर्च निघणे अशक्य झाले आहे. खुल्या शेडच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने वातानुकूलित पोल्ट्री शेड उभारणारे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. अडचणी दूर होऊन पोल्ट्री व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अशा वेळी कुकुटपालक शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी जिल्ह्यातील वातानुकूलित पोल्ट्री उत्पादकांनी केली आहे. 

पोल्ट्री व्यवसाय हा कृषीपूरक असल्याने कुकुटपालक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा वीज दर उत्पादकांसाठी अधिक वाटत आहे. यातच वातानुकूलित पोल्ट्री शेडची आवश्‍यक यंत्रणा, खाद्य, पाणी, औषध पुरवठा आदी स्वयंचलित यंत्रणा चालविण्यासाठी अधिकची वीज लागत असल्याने या कुकुटपालांच्या समस्यांमध्ये भरच पडत आहे, ही परिस्थिती कधी सुधारेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना काही दिवस आणखी सवलत देण्याची आवश्‍यकता आहे. पोल्ट्री उत्पादकांना कृषी पंपाप्रमाणे सवलतीच्या दरात वीज मिळाली, तर उत्पादकांना पुन्हा उभे राहण्यास बळ मिळेल, असे मत औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कुकुटपालक उत्तम डुकरे यांनी व्यक्त केले. 

वरवंड (ता. दौंड) येथील सागर दिवेकर म्हणाले, अफवांमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. यातच ग्रामीण भागात रोहित्रावर अधिक ग्राहकांची जोडणी असल्याने कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांना विजेसाठी डिझेल जनरेटरचा वापर करावा लागत आहे. त्याचाही १५ ते २० हजार रुपयांचा अधिक खर्च आहे. चांगल्या दाबाने वीज मिळविण्यासाठी महावितरणने स्वत: खर्च करून रोहित्र बसवावे. तसेच महावितरणने पोल्ट्री चालकांचे सहा महिन्यांसाठीचे वीज बिल काही प्रमाणात कमी केले तरी मोठी मदत होईल. 

बारामती येथील राजेंद्र चव्हाण म्हणाले, माझ्याकडे १८ हजार पक्षांचे वातानुकूलित पोल्ट्री शेड आहे. कर्ज काढून शेडची उभारणी केली. यातच सोशल मीडियामधून पसरविलेल्या अफवांमुळे व्यवसायाचे नुकसान झाले. हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यास वेळ जाणार आहे. काही पोल्ट्री उत्पादकांना चौकात गाडी लावून, ५० रुपयांना दोन किलोची कोंबडी विकावी लागत आहेत. खाद्य, वीज, पाणी, मजुरांचा रोजगारही निघत नाही. वातानुकूलित पोल्ट्री उत्पादक अधिकच हतबल झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

खुल्या शेडच्या तुलनेत वातानुकूलित शेडसाठी विजेकरिता अधिक खर्च येत आहे. दरमहा २० ते २५ हजार रुपये वीजबिल येते. ‘कोरोना’मुळे खुपच फटका बसला आहे. खाद्य द्यायला परवडत नसल्याने काही पोल्ट्रीधारकांना पक्षी मारून टाकावे लागले. बकऱ्या किंवा मेंढ्या असतील तर त्यांना जास्त दिवस ठेवता येते. मात्र, कोंबडी योग्य वेळी विक्री करावी लागते. त्यामुळे व्यवसायिकांसमोर संकट वाढतच आहे. या पोल्ट्रीधारकांना शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. 
- सुरेंद्र शिळीमकर, वीरवाडी, नसरापूर, ता. भोर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com