esakal | किफायतशीर कुक्कुटपालन
sakal

बोलून बातमी शोधा

किफायतशीर कुक्कुटपालन

किफायतशीर कुक्कुटपालन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ. विषयांचे प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरी किंवा मजुरीच्या मागे न-पळता आपल्या भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रशांत त्याच्या स्वतःच्या अनुभावावरून सांगतो.      

पुण्यापासून ३५ किमी दूर सहजपूर (उरुळी कांचन जवळ) हे गाव तसं पुण्याचं उपनगरच आहे. येथे बरेच छोटे-मोठे उद्योगधंदे असल्याने लोकांच्या हाताला लागलेले काम, पैसा आणि त्या अनुषंगाने आलेले राजकारण हा येथील जीवनाचा एक भागच ! प्रशांतने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर काही दिवस एका कंपनीत हेल्पर म्हणून काम केलं. प्रशांतचा मोठा भाऊ एका कंपनीत तात्पुरत्या रोजंदारीवर काम करत होता. प्रशांतचं भविष्य यात नाही असं त्याचं ठाम मत होतं. प्रशांतने शिकून स्वतःचा उद्योगधंदा सूर करावा असं त्याला वाटायचं. याचवेळी प्रशांतच्या मामांना DBRT कोर्सची माहिती मिळाली आणि त्यांनी प्रशांतला विज्ञान आश्रमात शिकायला पाठविले.

आश्रमात आल्यानंतर प्रशांत तसा एकलकोंडा असायचा. शिवाय आश्रमातले नियम पाळायलाही त्याला बरेच कष्ट घ्यावे लागायचे . पण विज्ञान आश्रमात दर दिवशी संध्याकाळी होणाऱ्या आनापान साधना, इतर विद्यार्थांच्या अनुभवातून होणाऱ्या विचारमंथनाचा फायदा प्रशांतला हळूहळू मिळू लागला. एखाद्या विषयावर ठामपणे आपले मत कसे व्यक्त करायचे हे त्याला समजायला लागले आणि तशी कृतीही घडायला लागली. याचाच फायदा त्याला आज त्याच्या व्यवसायात मार्केटिंग करताना होतोय.

हळूहळू प्रशांत इतरांमध्ये मिसळायला लागला आणि त्याची मैत्री त्याच्याचसारख्या भावी उद्योजकांसोबत झाली. प्रशांतला शेती आणि पशुपालन विषयात गोडी होती. गावाच्या यात्रेत कुक्कुटपालन व्यवसायातून अनुभव मिळावा अशी योजना प्रशांतने त्याच्या मित्रांबरोबर आखली आणि उधारीवर पैशाची जमवाजमव केली. घराच्या मागच्या मोकळ्या जागेत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. या छोटेखानी व्यवसायातून मोठा अनुभव आणि आत्मविश्वास मिळाला. कमी खर्चातून सुरू केलेला त्याचा व्यवसाय आज ताठ मानेनं चांगलं आयुष्य जगण्यास त्याला मदत करत आहे. विज्ञान आश्रमाने त्याला प्रकल्प अहवाल लिहिण्यास सहयोग केलं.  

कुक्कुटपालन व्यवसायाची सुरवात
प्रशांत मेटल फॅब्रिकेशन करणे, मापं घेऊन ड्रॉइंग बनविणे ही कामे विज्ञान आश्रमात प्रात्यक्षिकातून शिकला. तसेच कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विविध कामांचा अनुभव मिळाला. त्याला स्वतःच पोल्ट्री शेड बांधताना त्याचा उपयोग झाला. त्याने कोर्समधील आपल्या कष्टाळू आणि हुशार मित्रांना सोबत घेऊन त्याने १५०० वर्ग फुटाचं शेड बांधल. तिथं लागणारे सारी इलेक्ट्रिकलची फिटिंग त्याने स्वतः केली. यातून पैशाची मोठी बचत झाली. तेच पैसे व्यवसाय चालविण्यासाठी वापरले. प्रशांतने गोल्डन एग्ज पोल्ट्री फार्म नावाने स्वतःच व्यवसाय सुरू केला. आज प्रशांतकडे १००० लेअर कोंबड्यांच युनिट आहे. त्यातून त्याला ७५०-८०० अंडी दिवसाला मिळतात. यातून त्याला ४० हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. भविष्यात अंड्यांचं उत्पादन २००० पर्यंत नेण्याचा त्याचा मानस आहे.

कुक्कुटपालनाचं गणित 
प्रकाशने १५०० वर्ग फुटांचं शेड बांधल आहे. त्यात ५.५ * ४७ फुटांच्या २ ओळी आहेत. कोंबड्या ठेवण्याकरिता पिंजरा बनविला आहे त्याचा साईज १.५ * २ फूट आहे. हे सर्व बनवायला प्रशांतला २ लाख ८० हजार रुपये इतका खर्च आला. लेअर कोंबडी १८ हफ्त्यांची असताना अंडी देण्यास तयार होते. त्यामुळे प्रशांतने १८ हफ्ते पूर्ण झालेल्या कोंबड्याच आणल्या.  १ लेअर कोंबडी २०० रुपयाला पडली. आज हा रेट १८० ते २१० रुपयेपर्यंत वरखाली  होतोय.  १ अंडे लोकल मार्केटमध्ये साधारणतः ४ रुपयाला विकल्या जातं. १ कोंबडीला १०० ग्राम खाद्य दार दिवशी दिल्या जातं. खाद्य म्हणून ५०% मका, सोया, ५ ते १० % मारबल (कॅल्शिअमसाठी) दिलं जातं. त्याचबरोबर लेअर कॉन्सन्ट्रेटेड हे स्पेशल लेअर खाद्य दिल जातं. ही ५० किलोची बॅग ११०० रुपयांना पडते. लेअर कोंबडीच अँड देण्याचं वय २ वर्षांनी संपते त्यानंतर ती कोंबडी निम्म्यादराने मांसासाठी विकली जाते.

प्रशांत नेवासे ९१६८३३५००४

loading image