राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 6 मे 2017

या वर्षीचे सर्वच घटक म्हणजे जमीन, पर्यावरण, समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान मॉन्सून अगमनास अनुकूल बनलेले असून, कोकणपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्यास ते निश्चितपणे अनुकूल बनत आहे. त्यामुळेच या वेळचे मॉन्सून आगमनात सध्यातरी अडथळा नाही. 

महाराष्ट्रातील मध्य व पूर्व भागावरील हवेचे दाब कमी होत असून, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचे भागावरील हवेचे दाब कमी होत असल्याने तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे निश्चितपणे हवामान बदल जाणवतील.

तारीख ८ मे रोजी विदर्भावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन तेथे १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी दाब होईल. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होईल. तारीख ९ मे रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विस्तारत असून, ते विदर्भ व मध्य महाराष्ट्रापर्यंतचे भागावर असेल. तारीख ११ मे रोजी परिस्थिती बदलेल आणि हवेचे दाब वाढतील.

त्यानुसार तारीख ७ मेपासून दिनांक १२ मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या भागात वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता राहील. संपूर्ण अरबी समुद्र आणि विषुववृत्तीय भागापासून उत्तरेस ४० ते ७० रेखांशामध्ये हिंदी महासागराचे आणि ८० ते १०० रेखांशामध्ये बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०३ ते ३०४ केलव्हिन्सपर्यंत वाढल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होऊन ढगनिर्मिती होईल आणि पूर्वमोसमी पावसासाठी वातावरण अतिशय अनुकूल बनेल.

त्यातच विदर्भात ६ मे ते ८ मे या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊन वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता राहील. या वर्षीचे सर्वच घटक म्हणजे जमीन, पर्यावरण, समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान मॉन्सून अगमनास अनुकूल बनलेले असून, कोकणपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्यास ते निश्चितपणे अनुकूल बनत आहे. त्यामुळेच या वेळचे मॉन्सून आगमनात सध्यातरी अडथळा नाही. 

१) कोकण : 
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ७९ टक्के राहील व रत्नागिरी जिल्ह्यात ८४ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ किलोमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात ६ किलोमीटर, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी ७ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. रायगड जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. 

२) उत्तर महाराष्ट्र : 
धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील मात्र जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांत आकाश अंशत: ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात २६ टक्के राही, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३६ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १२ टक्के इतकी कमी राहील. 

३) मराठवाडा : 
मराठवाड्यातील बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस, हिंगोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, नांदेड, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील. हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ टक्के राहील. नांदेड जिल्ह्यात २३ टक्के राहील; परभणी जिल्ह्यात २५ टक्के राहील, जालना जिल्ह्यात २६ टक्के राहील, बीड जिल्ह्यात २७ टक्के राहील, तर औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत २९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे ९ ते १३ टक्के राहील. 

४) पश्चिम विदर्भ : 
अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. अमरावती जिल्ह्यात आकाश पूर्णत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ५० टक्के राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ टक्के राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील. 

५) मध्य विदर्भ : 
मध्य विदर्भातील यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यात ५१ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. पावसाची शक्यता राहील. 

६) पूर्व विदर्भ : 
गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. 

७) दक्षिण - पश्चिम महाराष्ट्र : 
सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के राहील; तर सातारा जिल्ह्यात ७९ टक्के राहील. सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के राहील. उर्वरित सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४४ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा जिल्ह्यात २३ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १४ टक्के राहील. 

कृषी सल्ला : 
१) हळद व आले लागवड पूर्ण करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी हळदीचे २५ ते ३० क्विंटल मातृगड्डे लागतात, तर आले लागवडीसाठी हेक्टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. हळदीची लागवड ७५ सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी ३० सें.मी. अंतरावर मातीत गड्डे लावून करावी, तर आल्याची लागवड ९० सें.मी. रुंदीचे गादीवाफे तयार करून २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे बेणे लावून करावी. 
२) सुरू उसाला मोठ्या बांधणीसाठी भर द्यावी. भर देण्यापूर्वी हेक्टरी १०० किलो नत्र + ५५ किलो स्फुरद + ५५ किलो पालाश ही खते द्यावीत. खोडवा उसासाठी भर देण्यापूर्वी शिफारशीनुसार खते द्यावीत. 

(लेखक : ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

Web Title: Pre-monsoon showers likely in this week, says Dr. Ramchandra Sabale